कल्याण हे ऐतिहासिक शहर असून यामध्ये अनेक ऐतिहासिक तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यापैकीच एक असलेला तलाव म्हणजे भटाळे तलाव. ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या समोर असलेल्या या तलावात देखील भूमाफियांनी अतिक्रमण केले असून याविरोधात निर्भय सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. या संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयपाल कांबळे आणि ठाणे जिल्हा अध्यक्षा आसीया रिझवी हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषणाला बसले आहेत.
कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्या समोर ऐतिहासिक शिवकालीन भटाळे तलाव होता. केडीएमसीच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी भूमाफियांशी संगनमत करून तो तलाव अतिक्रमणाच्या रूपाने भूमाफियांच्या घशात घातला असल्याचा आरोप निर्भय सामाजिक सेवाभावी संस्थेने केला आहे. अशा भ्रष्ट अधिकारी आणि भूमाफियांवर गुन्हा नोंद करून भटाळे तलाव पूर्ववत बांधून त्याचे सुशोभिकरण करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.
देशाच्या प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये समाविष्ट असलेले कल्याण मधील बी. के. बिर्ला महाविद्यालय हे आपल्या स्थापनेच्या ५० व्या वर्षात प्रवेश करत आहे. महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीने हे वर्ष सुवर्ण जयंती वर्षाच्या रूपात साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचे उद्घाटन आज महाविद्यालयाच्या मुख्य संरक्षक पद्मभूषण राजश्री बिर्ला यांच्याहस्ते ऑनलाईन झाले.
याप्रसंगी त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले व महाविद्यालयाच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे संस्थापक बसंत कुमार बिर्ला यांचे हे जन्मशताब्दी वर्ष देखील आहे. या सोहळ्यात महाविद्यालयातर्फे या शैक्षणिक वर्षात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातील.
या आयोजनामध्ये शिक्षण, संस्कृती आणि खेळ जगतातील गणमान्य व्यक्तींना निमंत्रित करण्याची योजना केली गेली आहे. महाविद्यालयाच्या सुवर्ण वर्ष जयंती निमित्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह आहे.
कल्याण पश्चिमेतील ऊंर्बेड गावातील अमर भंडारी यांच्या कोंबड्याच्या खुराड्यात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सहा फुटी लांब नाग आढळल्याने उपस्थितीताची भितीने धांदल उडाली. तातडीने घटनास्थळी सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी पोहचत सहा फुटी पुर्ण वाढ झालेल्या विषारी नागास पकडल्याने उपस्थितीतांचा जीव भांड्यात पडला.
कल्याण पश्चिमेतील महाराष्ट्र नगर परिसरातील चायनीजच्या गाडीच्या खोक्यात साडे सहा फुटी नाग जाऊन बसल्याचे रहिवाशी अजित यांना आढळल्याने दुकानदारासह बघ्यांची पाचावर धारण झाली. सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी चार वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी तातडीने पोहचत विषारी नागाला पकडल्याचे पाहुन उपस्थितानी सुटकेचा निश्वास टाकला.
तर कल्याण पश्चिमेतील हिना गार्डन परिसरातील मंगेशी सुष्टी सोसयटीच्या आवारात पाच वाजण्याच्या सुमारास नऊ फुटी साप दिसल्याने सोसयटीच्या रहिवाशामध्ये पळता भुई उडाली. सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी घटनास्थळी पोहचत नऊ फुटी धामण या बीन विषारी सापास पकडुन धामण सापा बाबतीत उपस्थित रहिवाशांमध्ये जनजागृती केली. दोन दिवस कोसळलेल्या पावासामुळे सापाची बीळे पाण्याने भरल्यामुळे साप हे सुरक्षित आडोसासाठी सापांनी आसारा घेतला आसावा, “पकडलेल्या दोन नाग, एक धामण यांना वन विभागाच्या ताब्यात देऊन ते जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचे सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी सांगितले.
“ड” प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या अनाधिकृत बांधकाम पथकाने अनाधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उचलित पुनालिंक परिसरातील दोन गाळे दोन रूमवर हातोडा चालवित तोडक कारवाई केली.
कल्याण पूर्वेतील पुनालिंक रोड जवळील अर्पणा डेअरी परिसरात अनाधिकृतपणे बांधलेल्या दोन गाळे, दोन रूमवर कारवाईचा बडगा उचलित “ड” प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल अनाधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाने हातोडा चालवित अनाधिकृत बांधकाम निष्कसित केल्याने अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानानुसार अनाधिकृत बांधकामवर कारवाई मोहिम सुरू असुन अनाधिकृत बांधकाम उप आयुक्त अनंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अनाधिकृत बांधकाम वर तोडक कारवाईचा बडगा सुरू राहणार असल्याचे ड प्रभाग अधिकारी सुधीर मोकल यांनी सांगितले.
कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्याच्या नजीक असलेल्या दुर्गा माता चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची आणि स्मारकाची दुरावस्था झाली असून त्याची डागडुजी करण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
५ जून रोजी “मराठी एकीकरण समिती कल्याण डोंबिवली” विभागाकडून ०६ जून रोजी झालेल्या “शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून दुर्गामाता चौक (दुर्गाडी) येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या पुतळ्याची आणि पुतळ्याच्या बाजुला असलेल्या स्मारकाची स्वच्छता ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि बाजार पेठ पोलीस स्टेशन यांची रीतसर परवानगी घेऊन ही स्वच्छता करण्यात आली.
हि स्वच्छता करतांना मराठी एकीकरण समिती कल्याण डोंबिवली विभागाच्या शिलेदारांना छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या पुतळ्याची तथा बाजूला असलेल्या स्मारकाची दयनीय अवस्था दिसून आली. कल्याण शहरात प्रवेश करतांना डोळे स्वतःहून ज्याठिकाणी वळतात ते महाराष्ट्र राज्याचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या अश्वारूढ पुतळ्यावर तथा छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या स्मारकावर आणि सदर स्मारकाची अवस्था पाहून कल्याण आणि डोंबिवली महानगरपालिकेबद्दल शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.
यामुळे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या पुतळ्याची आणि स्मारकाची डागडुजी करण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने आयुक्तांकडे पत्राद्वारे केली असून काही सूचना देखील केल्या आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या पायाला बुरशी सदृश्य पदार्थ निर्माण होत आहे. पायाच्या भागातून पुतळ्याचे पापुद्रे खाली पडत आहे. पुतळ्याच्या बाजूला असलेल्या स्मारकाच्या बाजूचे लोखंडी कुंपण हे तुटलेल्या अवस्थे मध्ये आहे. राज्याचे प्रतीक असलेली राजमुद्रा चे रंग निघून बेरंग अवस्थेमध्ये आहे. दगडी स्मारकाला लावलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या शिल्पाचे रंग निघून गेले आहे,शिल्पाचा काही भाग हा खाली पडत आहे.
स्मारकाच्या बाजूला खड्डे निर्माण होऊन त्यात पाणी साचून संपूर्ण कचरा आणि गाळ हा पाण्यात साचत आहे. स्मारकातील गवतावर लावलेले सर्व दिवे हे बंद तथा अकार्यक्षम झालेले आहे. पुतळ्याच्या मागे असलेले पांढरे दिवे हे पूर्णपणे कार्यरत नाहीत. पुतळ्यावर प्रकाश पाडणारे दिवे हे अकार्यक्षम झालेले आहे. पुतळ्याखाली असलेल्या खोलीत पाणी गळत आहे. स्मारकाच्या आत मध्ये असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या नकाशाचा रंग खराब होऊन नकाशाची शोभा खराब करत आहे. त्यामुळे यासर्व बाबींवर लक्ष देऊन योग्य ती डागडुजी करण्याची मागणी मराठी एकीकरण समितीचे कल्याण शहर समन्वयक भूषण पवार यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
दरम्यान ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन शासनाच्यावतीने साजरा करण्यात येत असतांना ५ जून रोजी या पुतळ्याची आणि स्मारकाची स्वच्छता करण्यासाठी अग्निशमन विभागाकडून २ हजार रुपये आकारण्यात आले होते. हि बाब आयुक्तांना समजल्यावर हे पैसे परत करण्यात आलेअसले तरी हे निंदनीय असून आता या पुतळा आणि स्मारकाच्या डागडुजीसाठी प्रयत्नशील असून पालिका प्रशासनाने त्वरितयाकडे लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते उल्हास जामदार यांनी केली आहे.
मावळ तालुक्यातील वाघेश्वर येथील प्राचीन शिवमंदिर आता प्रसिद्धीच्या एका झोतात उतरले आहे. गावातील तरुणांच्या व्हॉट्स अप स्टेट्स आणि इन्स्टाग्रामच्या स्टोरी मुळे हे मंदिर इतकं लोकांपर्यंत पोहोचलं आहे की पुण्यातील लोक या मंदिराकडे आता गर्दी करू लागले आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पर्यटकांचा वावर हा मागील १० वर्षांपासून प्रचंड वाढीस लागला आहे. त्याचे कारण म्हणजे या तालुक्याला निसर्गाने दिलेल्या सौन्दर्याची देणं. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी म्हणून मावळ तालुका ओळखला जातो. आणि स्वराज्यातीलच काही महत्त्वाचे किल्ले याच तालुक्यात ताठ मानेने आभाळ स्पर्शीत आहेत. लोहगड, विसापूर, तिकोणा, तुंग सारखे अभेद्य किल्ले, भुशी आणि पवना सारखी धरण, टायगर, लायन पॉईंट सारखी उंच ठिकाण, कारल्याची एकविरा देवी, येथील लेण्या आणि जंगले येथील पर्यटनाचे मुख्य स्रोत आहेत. यामुळे ऋतू कोणताही असो ईथे पर्यटन संपत नाही. मुंबई पुण्याहून येणाऱ्या पाव्हन्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी दर शनिवारी रविवार हा मावळ प्रांत जणू काही सज्जच असतो.
काय आहे मंदिराचा इतिहास ?
Courtesy – Being Maharashtrian FB
मावळ तालुक्यातील पवना धरणा जवळ असलेले शिळीम हे गाव. या धरणाला लागून असलेल्या वाघेश्वर या खेडेगावावरून येथील एका पुरातन मंदिराला वाघेश्वर शिवमंदिर म्हणून ओळख मिळाली आहे. तिकोणा किल्ल्याच्या डोंगराच्या पायथ्यापासून बरोबर समोरच हे मंदिर उभे आहे. काही जाणकारांनी हे मंदिर शिवाजी महाराजांच्या काळातील असल्याचे सांगितले तर काहींनी हे मंदिर त्याही पेक्षा पुरातन म्हणजे हेमाडपंथी असल्याचा दावा केला आहे. हे मंदिर नेमके कधी बांधले ? हा शोध लावण्यासाठी अद्याप कोणत्याही इतिहास संशोधकाने या मंदिराला भेट दिली असल्याचे ऐकण्यात नाही. त्याचे कारण म्हणजे मुख्य रस्त्या पासून आडबाजूला हे मंदिर उभे आहे.
सोशल मीडियामुळे मंदिर प्रसिद्ध
पवना धरणाची निर्मिती झाल्या नंतर पावसाळ्या पासून वर्षातील अर्ध्यापेक्षा जास्त काळ हे मंदिर खोल पाण्यात सामावलेले असते. फक्त उन्हाळ्यातच मंदिर कोरडे असते. महाशिवरात्रीच्या काळात पाणी ओसरून मंदिराच्या कळसाचे दर्शन शिवभक्त घेऊ शकतात. यंदाच्या महाशिवरात्रीला काही तरुण शिवभक्त कंबरभर पाण्यातून महादेवाला अभिषेक करण्यासाठी गेले होते. आणि इथूनच सुरू झाले इंस्टा आणि व्हॉट्सअपवर स्टेट्स पडणे. एखाद्याने स्टेट्स पाहिल्यानंतर त्याचे मित्र देखील मागायचे. अलीकडे सोमवारी महादेवाला स्टेट्स टाकणे एक ट्रँड बनला आहे. आणि याच ट्रेण्डमुळे हे मंदिर देखील ट्रेंड मध्ये आले आणि लोकांनी प्रत्यक्ष मंदिर पाहावे असा बेत आखला.
वाघेश्वर येथील प्राचीन शिवमंदिर हे तसे पाहता फारसे कुणाला माहिती नव्हते. गावात एखाद्याच्या घरी पाव्हने आले की त्यांना गाव फिरवता फिरवता सर्वात आधी हे मंदिर दाखवण्यासाठी गावकरी नेत असत. गावाशी संबंध असलेली माणसं सोडली तर हे मंदिर संपूर्ण जगापासून लपून राहिलेले होते. पण २०२१ मध्ये सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या नंतर आता मात्र मंदिरात लोकांची गर्दी होऊ लागली आहे. परंतु या आधी क्वचित एखादाच माणूस दिवसा गेला तर जाई. सर्व गावांपासून दूर धरणात असल्याने फारसे कुणाची रेलचेल नसे.
मंदिरात प्रथमच तोब्बा गर्दीआणि रांगा
अनलोकची प्रक्रिया सुरू झाल्या पासून अनेक दिवस घरात असलेले लोक आता पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. सर्व मंदिरे बंद असल्याने कायम खुल्या असलेल्या महादेवाच्या या मंदिरात भक्तगण देखील गर्दी करू लागले आहेत. जवळच्याच शिळीम गावातील गावकऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार शनिवार, रविवार आणि सोमवार या तीन दिवसांत शेकडो गाड्या येत असतात. पाचशे ते सहाशे माणसं येत असतात. या मंदिरात होणारी गर्दी इतकी वाढली आहे की आता दर्शनासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. काहीवेळेस तर पोलिसांना सुद्धा या ठिकाणी गस्त करावी लागत आहे. मंदिरात अचानकपणे होणारी पर्यटकांची गर्दी पाहता ग्रामस्थ देखील अवाक झाले आहेत. कारण अगोदर कधीही इतकी गर्दी झाली नाही. पुणे शहरातील लोक सध्या गर्दी करतच आहेत मात्र भविष्यात मुंबई सह महाराष्ट्रातुन इथे प्रचंड गर्दी उफाळू शकते.
नुकतीच झाली मंदिराची डागडुजी
२०१९ साली एका शिवभक्ताने राजस्थानहुन काही कारागीर आणून या पडझड झालेल्या मंदिराची कसलाही गाजावाजा न करता डागडुजी करून घेतली होती. खोदकाम करून माती खाली गेलेल्या पायऱ्या बाहेर केल्या. त्यामुळे हे मंदिर आता काहीसे चांगल्या स्थितीत वाटत आहे. आता पावसाळा सुरू झालं असून महिन्याभरात पुन्हा हे मंदिर पवनेच्या जलाशयात गायब होणार आहे. ते थेट २०२२ सालातच दृष्टीस येणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी मात्र मोठी गर्दी इथे उसळू शकते. यासाठी स्थानिक आमदार, ग्रामपंचायत आणि राज्यसरकार या सर्व यंत्रणांना सज्ज रहावे लागणार आहे.
भविष्यात व्यवसायाला मिळणार चालना
लवकरच हे मंदिर पर्यटनक्षेत्र म्हणून घोषित होईल. त्यामुळे दररोज पर्यटक आणि त्यातल्या त्यात शिवभक्त इथे मोठ्या संख्येने येऊ शकतात. असे झाल्यास इथे मोठ्या प्रमाणावर व्यावसायास चालना मिळेल. फुलांचे स्टोल, प्रसादाचे स्टोल, दुग्धजन्य पदार्थांची विक्री, चहा नाश्त्यासाठीचे स्टोल, जेवणासाठी हॉटेल्स अश्या सर्व व्यवसायांना येथे भविष्यात चालना मिळणार आहे. आणि हे सर्व व्यावसाय कुणी बाहेरून येणाऱ्या लोकांनी थाटायचा आत गावकऱ्यांनीच उभारले तर जवळपासच्या गावातील तरुणांसाठी हा एक रोजगार देखील ठरणार आहे. आता या मंदिरामुळे आणखी काय काय बदल भविष्यात घडून येणार आहेत हे आपण पाहूच.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त मनसेचे नेते तथा आमदार राजु पाटील यांच्या मार्गदर्शनाने मनसे डोंबिवली शहराच्या वतीने डोंबिवलीकर नागरीकांना विविध फुलझाडांचे मोफत वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला. यंदा राज ठाकरेंचा ५३ वा वाढदिवस असल्याने १०५३ फुलझाडांचे वाटप मनसे डोंबिवली शहरातर्फे करण्यात आले.
गेली दिड वर्ष कोरोना सारख्या महामारीने संपुर्ण जग त्रासलेले असताना हळुहळु जनजीवन पुर्वपदावर येऊन पुर्वीप्रमाणेच लोकांचे जीवन उत्साहाने भारलेले, टवटवीत, सुगंधी व रंगीबेरंगी व्हावे यासाठी गुलाब, मोगरा, जास्वंद अशी मनमोहक फुलझाडे वाटुन लोकांच्या जीवनात या दिवसानिमित्ताने चैतन्य जागृत होऊन नैराश्य व मरगळ दूर व्हावी तसेच या माध्यमातून झाडे लावा,झाडे जगवा हा सामाजिक संदेश घरोघरी जावा असा हेतू ठेवून सदर उपक्रम राबविल्याचे मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज प्रकाश घरत यांनी यावेळी सांगितले.
डोंबिवलीकर नागरीकांनी या उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी केवळ १ तासात तब्बल १०५३ रोपांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी मनसे शहरसंघटक योगेश रोहिदास पाटील यांनी विशेष सहकार्य केले.
कोरोनाच्या तिस-या लाटेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका सज्ज होत असून कोरोना संक्रमित बालकांकरीता शाळांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करून ‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ संकल्पना आता राबविण्यात येणार आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी महापालिका अविरत विविध उपाययोजना करीत आहेत. तथापी वैदयकीय तज्ञांच्या अंदाजानुसार कोविड-19 ची तिसरी लाट अपेक्षित असून त्यामध्ये विशेषत: लहान बालके कोरोना विषाणूमुळे संक्रमित होण्याची दाट शक्यता वर्तविली आहे. या अनुषंगाने बालकांचे शाळेशी असलेले वेगळे नाते विचारात घेता कोविड संक्रमित काळात त्यांचे भावनिक व मानसिक संतुलन पोषक राहण्यासाठी मुलांच्या शाळाच मुख्य भूमिका पार पाडू शकणार आहेत.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेनुसार कोरोना संक्रमित बालकांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची आवश्यकता भासल्यास मोठया व्यक्तिंसाठी असलेल्या विलगीकरण कक्ष/कोविड केअर सेंटरपेक्षा मुलांना त्यांच्या शाळेत विलगीकरण कक्ष निर्माण करुन तेथे व्यवस्था केल्यास त्यांचे मन तेथे सहज रमेल. याच दृष्टीने महापालिका क्षेत्रातील कोविड-19 संसर्गाची लागण होणा-या 8 ते 12 वयोगटातील बालकांची काळजी घेण्यासाठी आणि वैदयकीय उपचारासाठी महापालिका कार्यक्षेत्रात महापालिकेची प्राथमिक विदयालये आणि खाजगी प्राथमिक व माध्यमिक विदयालयांमध्ये बालकांकरीता “विलगीकरण कक्ष/कोविड केअर सेंटर ” ची संकल्पना आता राबविण्यात येणार आहे.
त्यानुसार महापालिकेची सर्व प्राथमिक विदयालये, खाजगी प्राथमिक व माध्यमिक विदयालये यांच्या मुख्यध्यापकांकडून शाळेची संपूर्ण माहिती (मुख्यध्यापकांचे नाव,मेल आयडी, व्हॉटॲप क्रमांक,शाळेचा संपूर्ण पत्ता, शाळेतील मुलांची संख्या इ.) उपलब्ध करुन घेणेबाबत तसेच “बालकांकरीता विलगीकरण कक्ष/कोविड केअर सेंटर “या संकल्पनेची माहिती संबधित मुख्याध्यापकास उपलब्ध करुन देणेबाबत प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग यांस कळविण्यात आले आहे.
यासाठी महापालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक विदयालयातील मुख्याध्यापकांना, त्यांनी ” माझा विदयार्थी ,माझी जबाबदारी ” या संकल्पनेस अनुलक्षून राष्ट्रीय कर्तव्याचा भाग म्हणून विलगीकरण कक्ष/कोविड केअर सेंटर मध्ये भरती होणा-या मुलांच्या मनोरंजनासाठी आवश्यक उपाययोजना (वाचनालये, भिंतीवर कार्टुनची चित्रे, लहान बालकांची गाणी , बैठी सुरक्षित खेळणी इ.) करणेबाबत कळविण्यात आले आहे. या सेंटरमध्ये दाखल असलेल्या मुलांची मानसिकता व मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने सर्व प्राथमिक विदयालयातील मुख्याध्यापकांना वेळोवेळी दुरदृश्य प्रणालीद्वारे महापालिका आयुक्त यांचेमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे.
कोविडशिल्ड लस घेतल्यानंतर शरीरात विशिष्ट चुंबकीय शक्ती संचारते व त्यामुळे ज्या ठिकाणी लस घेतली आहे त्या भागात व त्या आजूबाजूला चुंबकत्व आल्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. अशा प्रकारचा दावा करून एकप्रकारे बुवाबाजीला समर्थन केल्यासारखे होत आहे. याची पोल खोल शाहिर स्वप्निल शिरसाठ यांनी केली आहे.
लसीमुळे अंगात चुंबकीय शक्ती येऊन फक्त घरातील उथळ भांडे, चमचे, कॉईन हे चिपकत असतील तर अर्धा किलो ते एक किलोचे वजन ही चिपकायला हवे. तसेच दुकानात असलेले मोजमाप करण्यासाठी वापरण्यात येणारे ५० ग्राम पासून पुढे सर्व वजने ही चिपकायला हवीत फक्त स्टेनलेस स्टील चिपकलेले दिसत आहेत. विज्ञान निरीक्षण, अनुमान, तर्क, प्रचिती, प्रयोग यांवर विश्वास ठेवते. व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागे कोणत्याही प्रकारची साधना व दैवी शक्ती नाही हे समजुन घ्यायची गरज असल्याचे स्वप्नील शिरसाठ यांनी सांगितले.
चमत्कार मागे हातचालाखी किंवा विज्ञान ह्या दोन गोष्टी असतात. ह्याच विज्ञानाचा आधार घेऊन चमत्कार केले जातात ज्याला दैवी शक्तीचं नाव दिले जाते. मानवी शरीर हे मलमूत्रची गटार आहे. विविध मार्गातून शरीरातील द्रव्ये ही बाहेर टाकली जातात. त्याचप्रमाणे घामामध्ये “सिबम” नावाचा चिकट द्रव्य असतो. तो घामावाटे शरीरातून बाहेर पडतो व त्वचेवर राहतो. जर खरोखरच अंगामध्ये चुंबकीय शक्ती असेल तर जमिनीवर ठेवलेल्या वस्तू ही बोटाने स्पर्श करून उचलता यायला हव्यात. तसेच अंगात चुंबकीय शक्ती असल्याचा दावा करणाऱ्यांनी घरात थांबू नये कारण घरातील किंवा आसपासच्या सर्व वस्तू अंगावर येऊन चिपकतील. तरीही डोळस होऊन एखाद्या चमत्कारामागील कारणमीमांसा समजुन घ्यायला हवी असेही शाहीर स्वप्नील शिरसाठ यांनी सांगितले.
गेल्या तीन वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन व जागर विज्ञानाचा कार्यक्रम शाहिर स्वप्नील शिरसाठ हे ठिकठिकाणी सादर करत असतात त्यात ते विविध चमत्कारांची उकल ही करत असतात. बुवाबाजी विरोधात संघर्ष करणाऱ्यांनी स्वतःवर ठाम विश्वास ठेवायला हवा. भूलथापांना बळी पडू नये चिकित्सक होऊन एखाद्या गोष्टींमगील कारणे शोधली पाहीजेत. स्वतःला व इतरांनाही बुवाबाजी पासून दूर ठेवण्याची गरज आहे. कारण संतांनी समाजसुधारकांनी त्यासाठीच आपले आयुष्य वेचले होते असेही ह्यावेळी शाहिर स्वप्निल शिरसाठ यांनी सांगितले.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अतिवृष्टीमुळे मुरबाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांची पडझड झाली असून गरीब कुटुंबांना त्याचा चांगलाच फटका बसला आहे.
मुरबाड तालुक्यात अनेक आदिवासी खेडी पाडी असून त्यातील बहुतांश गावातील लोकांची घरे ही आजही कौलारू आहेत. निसर्गाचाच्या बदलांचा फटका या भागाला नेहमीच बसत असतो .बहुतांश या भागातील लोक हे भात शेतीवर अवलबून आहेत. इतर वेळी मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या भागातील काही गावांमध्ये लोकांच्या राहत्या घरांचे मोठे नुकसान झाले.
अशीच एक दुर्घटना शुक्रवारी धसई जवळील महाज गावा मध्ये घडली असून आनंद नागवंशी यांचे घर मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे जमीनदोस्त झाले आहे. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जिवीत हानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच सध्या लॉकडाऊन मुळे कामधंदे नसल्या कारणाने पुन्हा घर कसे उभे करायचे हा प्रश्न सध्या आनंद नागवंशी याच्या पुढे येऊन ठेपलाय. स्थानिक प्रशासनाकडे त्यांनी अनेक वेळा घरकुल योजनेसाठी पाठ पुरावा केला होता. मात्र स्थानिक प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे त्यांना या योजेने पासून आजही वंचित ठेवण्यात आले असल्याचे ते सांगतात. सदर घराची मी घरपट्टी भरत असून देखील मला घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही या उलट जे गावात कित्येक वर्षापासून राहत नाही अश्या कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिल्याचा आरोप नागवंशी यांनी स्थानिक प्रशासनावर केला आहे. सदर घटनेचा स्थानिक प्रशासनाने पंचनामा करून मला तत्काळ आर्थिक मदत शासना कडून मिळवून द्यावी एवढी माफक अपेक्षा नागवंशी यांनी केली आहे.