पावसाळा जवळ आला आहे, त्यातच कोरोना सारख्या आजाराने प्राणवायू आणि झाडांचं महत्व काय आहे ह्याची जाणीव कित्तेक लोकांना झाली आहे आणि येत्या पावसाळ्यात कित्तेक लोक वृक्षारोपण करण्याचा चंग बांधून आहेत. परंतु त्याच वेळी काही संधीसाधू लोकं आपल्या नर्सरी मधली कापुराची झाडं खपवण्यासाठी अशास्त्रीय दावे करत सुटली आहेत. ज्या मुळे भविष्यात भारतीय वनांची वाट लागणार आहे ह्याच भान त्यांना नाही.
सर्वच झाडं हवा शुद्ध करत असतात आणि त्यांची हवा शुद्ध करण्याची प्रक्रिया त्यांनी केलेल्या प्रकाश संस्लेशन प्रक्रियेवर अवलंबून असते. जी त्या झाडामध्ये किती प्रमाणात क्लोरोफिल पिगमेंट आहे ह्यावर अवलंबून असते. सर्वसामान्य माणसाच्या भाषेत सांगायचं झाल्यास जे झाड जेवढे अधिक गडद हिरवे तेवढे त्यात क्लोरोफिल पिगमेंट अधिक. आणि तेवढं त्याच प्राणवायू बनवण्याच प्रमाण अधिक.
सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वड पिंपळ ही झाडे सर्वाधिक हवा शुद्ध करतात. पण आपण त्याची लागवड करतच नाही. त्यांची लागवड करणे अत्यंत सोपे, आणि स्वस्त असते. पावसाळ्याच्या वेळी वडाच्या झाडाची चार एक फूट लांब फांदी. पारई ने नुसती जमिनीत खोवली तरी पुढल्या पावसाळ्यात वड मोठा झालेला असतो.
आता मूळ मुद्यावर येऊया कपूरचे झाड हे मूळचे जपान आणि चीन मधले. भारतीय आयुर्वेदात गेली कित्तेक वर्ष कापूर आपण वापरत असलो तरी कापुरची झाडं भारतात कधीच आयात केली गेली नव्हती. त्या ऐवजी कापूर आयात केला जात होता. कदाचित परदेशी वृक्ष लावू नयेत ह्याच पुरेपूर ज्ञान आपल्या ऋषीमुनींना असाव म्हणून त्यांनी कधी कापराची लागवड केली नव्हती. त्याऐवजी थेट कापूरच आयात केला जात असे.
आता थोडं कापुराच्या झाडा बद्दल जणून घेऊयात. कापुराचे झाड मूळचे जपान चीन आणि इंडोनेशिया मधले तेथील वनांमध्ये ही झाडे सापडतात काही दशकांपूर्वी कापुराची झाडे फ्लोरिडा राज्यात लावली गेली होती अगदी पाच दहा वर्षात त्यांची संख्या हाताबाहेर गेली आहे ज्या मुळे फ्लोरिडा मधील कीटक आणि परदेशी उपद्रवी वृक्ष निवारण मंडळाने कपुराच्या झाडाला क्रमांक एक चे आक्रमक झाड म्हणून घोषित केलं आहे.
त्या मागची कारणे देखील तशीच आहेत. हे झाड अगदी चटकन वाढते आणि स्थानिक हळु हळू वाढत असलेल्या झाडांशी स्पर्धा करते. उंच होते आणि जवळपास ५०% सूर्यप्रकाश अडवणारी सावली निर्माण करते. ज्या मुळे स्थानिक हळू हळू वाढत असलेली झाडं मरून जातात किव्वा त्यांची वाढ खुंटते. आता हे झाड मोठे झाल्या नंतर त्याला काळ्या रंगाची खूप सारी फळे येतात. जी पक्षांना आवडतात. ज्या मुळे पक्षी ही फळे खाऊन त्यांच्या बिया इतरत्र पसरवतात. आणि काही बिया जर वनांमध्ये जाऊन पडल्या तर तिथल्या सर्व वृक्षांसोबत स्पर्धा करतात. ज्या मुळे स्थानिक वाढ कमी असलेली वृक्ष स्पर्धेतून बाद होऊन त्यांच्यावर अवलंबून असलेले कित्तेक प्राणी नष्ट होतात. शिवाय कापुरच्या झाडांखाली तयार झालेल्या दाट सावली मुळे लहान मोठी झुडपे देखील वाढत नाही. ज्या मुळे पावसाळ्यात मातीची धूप होते. शिवाय कापुरचे झाड कमकुवत असल्याने सोसाट्याच्या वारा पावसात उन्मळून पडते आणि खाली वाढत असलेली कित्तेक स्थानिक वृक्षांची रोप मारून टाकते. जिथे कापुराची झाडं अधिक असतात तिथे भुसख्खलन होण्याचा संभव वाढतो. कारण त्यांच्या मुळे लहान सहान माती धरून ठेवणारी झुडुपे उगवत नाहीत.
तरी जर प्राणवायू हवा असेल तर वड, पिंपळ, अवदुंबर, कडुलिंब , फणस , आंबा, अशी मोठी वाढणारी कोणतीही स्थानिक जैवविविधता टिकवून ठेवणारी झाडे लावा. एवढी मोठी झाड लावणे शक्य नसल्यास स्थानिक बांबूचे बेट तयार केलं तरी चालेल. पण आणखी विदेशी वृक्ष नकोत. आधीच गलिरिसिडिया- गिरिपुष्प, विदेशी निलगिरी, घाणेरी, सारख्या झाडांनी भारतीय वनांची वाट लावली आहे त्यात आणखीन भर नको.
प्रा. भूषण वि. भोईर,
सह. प्रा. प्राणीशास्त्र विभाग,
सोनोपंत दांडेकर महाविद्यालय,
पालघर.
८२३७१५०५२३.