कल्याण-डोंबिवली घडामोडी लेख

मावळ : वाघेश्वर शिवमंदिर परिसरातील धरणात बुडून युवकाचा मृत्यू

मावळ तालुक्यातील वाघेश्वर येथील प्राचीन शिवमंदिर प्रसिद्धीच्या झोतात आल्या नंतर येथे पर्यटकांची सध्या मोठी रीघ लागली आहे. मात्र त्याचबरोबर या मंदिरात भेट देण्यासाठी आलेल्या एका युवकाचा परिसरातील धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची पहिली घटना समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वाघेश्वर येथे एक प्राचीन शिवमंदिर आहे. स्थानिक तरुणांनी समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल केल्याने आता बाहेरील लोक देखील मंदिराला भेट देण्यासाठी गर्दी करीत आहेत. यासंबंधीत लेख MH मराठीने मागील महिन्यात प्रसिद्ध केला होता. शनिवार,रविवार आणि सोमवार हे तीन दिवस या मंदिरात प्रचंड गर्दी होत असते. मुळातच हे मंदिर पवना धरण क्षेत्रात असल्याने वर्षातून निम्मा काळ हे मंदिर पाण्याखाली असते. आणि जवळच असलेल्या पवना धरणाच्या जलाशयात बुडून एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची पहिली घटना समोर आली आहे.

रविवारी पुण्यातील खडकी येथील राहणारा शुभम दुधाळ हा २१ वर्षीय तरुण आपल्या सहा मित्रांसोबत या मंदिराला भेट देण्यासाठी आला होता. मंदिर पाहून त्याने दर्शन केले आणि या मित्रांनी आपल्या मोबाईलमध्ये काही फोटो देखील घेतले. मात्र मंदिरा जवळ असलेल्या पवना धरणाच्या विहंगम दृश्याने त्यांना मोहित केले. आणि येथूनच पाण्यात पोहण्याची इच्छा झाली. दुपारच्या सुमारास शुभम पाण्यात उतरला. मंदिरा जवळील धरण क्षेत्रात ओढ्यातून वाहून आलेला गाळ अधिक प्रमाणात असतो हे स्थानिकांना माहीत आहे. शिवाय येथील पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम पाण्यात बुडाला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंदिरा समोरून वाहणाऱ्या ओढ्याच्या पलीकडल्या बाजूस साधारणपणे एक किमी पासून दूरवर असलेल्या भागात ही घटना घडली असल्याची माहिती स्थानिक व्यापाऱ्याकडून देण्यात आली.

तरुण पाण्यात बुडाल्याची माहिती समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचप्रमाणे पोलिसांना पाचारण करण्यात आले. स्थानिक तरुणांनी बोटीच्या सहाय्याने पाण्यात उतरून शोध घेत मृतदेह शोधून काढला. घटनेचा पुढील तपास आता पोलीस करीत आहेत. दर्शनासाठी आलेल्या एखाद्या युवकाचा बुडून मृत्यू होण्याची ही पहिली घटना आहे. मात्र असे असले तरी भविष्यात आणखी घटना घडतील याची शक्यता नाकारता येत नाही.

पर्यटनाला गेल्या नंतर निष्काळजीपणामुळे जीव गेल्याच्या अनेक घटना अनेक ठिकाणी घडत असतात. मग पाण्यात बुडुन मृत्यू असो की पाय घसरून खोल दरीत झालेला अपघात. या घटना वारंवार घडत असतात तरीही पर्यटक जीव धोक्यात घालणे काही कमी करीत नाहीत. वाघेश्वर शीव मंदिराला भेट दिल्यानंतर पवनेचा जलाशय जवळपासच असल्याने पाण्यात उतरण्याचा मोह जीवावर बेतू नये यासाठी पुढील वर्षी (मंदिर पाण्यातून बाहेर पडल्यानंतर) स्थानिकांच्या मदतीने ठोस उपाययोजना राबवणे प्रशासनाला जास्त गरजेचे असणार आहे हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

-संतोष दिवाडकर

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *