उल्हासनदी जतन व संवर्धनासाठी नदीमध्ये ग्रास कार्प व सिल्वर कार्प जातीच्या २०,००० माशांची पिल्ले आज सोडण्यात आली आहेत. सध्या या नदीत ठिकठिकाणी जलपर्णी वनस्पती इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली आहे कि त्यामुळे येथील मासेमारी करणारे ते सर्व साधारण स्थानिक पासून ते पालकमंत्र्यापर्यंत सर्वच सामाजिक घटक चिंतीत आले आहेत.
ग्रास कार्प व सिल्वर कार्प या दोन जातीचे मत्स्यबीज एकूण २०,००० नग कलकत्त्याहून विमानाने मुंबई पर्यंत आणण्यात आले. आज पहाटे रायते ब्रीज येथे या सर्व माशांची पिल्ले पोहोचली. या अभियानात लहानग्या पासुन मोठ्या पर्यंत, विविध समाजसेवी संस्थानी सहभाग दर्शविला.
कृषिरत्न चंद्रशेखर भडसावळे, कल्याण तालुका तहसीलदार दिपक आकडे, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक नितिन निकम, उल्हास नदी बचाव कृती समिती चे अश्विन भोईर, रविंद्र लिंगायत, विवेक गंभीरराव व वालधुनी बिरादरी चे शशिकांत दायमा, उल्हास नदी च्या दोन्ही बाजूच्या ग्रामपंचायत सदस्य. म्हारळ, वरप, कांबाचे बरेच नवनिर्वाचित सदस्य, द वॉटर फाउंडेशन चे पंकज गुरव व कुमार रेड्डीयार, तसेच अश्वमेध प्रतिष्ठान चे अविनाश हरड, तुषार पवार, दत्ता बोंबे आदि पर्यावरणप्रेमी, ऊमाई पुत्र या अभियानात सामील झाले होते.
उल्हास नदीचे वाढते प्रदूषण व त्यावरील उपाययोजना यावर कृषिरत्न चंद्रशेखर भडसावळे, सगुणा बाग नेरळ यांनी प्रमुख मार्गदर्शन केले तसेच प्रशासकीय पातळीवर उल्हास नदी बचावासाठी शक्य अश्या सर्व उपाययोजना व मदत केली जाइल अशी ग्वाही कल्याण तालुका तहसीलदार दिपक आकडे यांनी दिली.
मासे म्हटले की, फक्त खाण्यासाठी उपयोगात येत नसून ते पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी ही उपयोगी असतात असे नमूद करतांना मासे नदीत सोडत लहानग्यांनी सुद्धा सहभाग नोंदवला. आज सोडण्यात आलेल्या दोन्ही प्रजातींचे मासे हे पर्यावरणच नव्हे तर स्थानिकांचा रोजगार देखील बनणार आहे. तसेच या माश्यांची उत्पत्ती वाढल्याने हे मासे आसपासच्या गावातील लोकांच्या आहारात देखील सामावले जाऊ शकतात. या दोन्ही प्रजातींचे मासे हे एका वर्षाने एक किलो वजनाचे होऊ शकतात. तर हाच मासा जास्त जगला तर ४ किलो पर्यंत देखील भरू शकतो असा दावा केला गेला आहे. त्यामुळे या माशांची उत्पत्ती वाढली तर पुढच्या वर्षी मोठं मोठे मासे या नदीतून मिळतील हे नक्की.
