कल्याण-डोंबिवली घडामोडी

कल्याण मधील युवकाचा अपघाती मृत्यू की घातपात ? नातेवाईकांसमवेत आमदारांचा यंत्रणेवर गंभीर आरोप

धुलीवंदनाच्या दिवशी चिंचपाडा कल्याण येथील आनंद मुकुंदे हा युवक होळी खेळायच्या निमित्ताने बाहेर गेला असता अचानकपणे बेपत्ता झाला. मात्र दुसऱ्याच दिवशी त्याचा मृतदेह अंबरनाथ चिखलोली धरणाच्या काठावर आढळून आला होता. पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांनी केली असली तरी त्याची हत्या झाली असल्याचा आरोप त्याचे नातेवाईक करीत आहेत. यादरम्यान आनंद राहत असलेल्या ठिकाणचे स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी देखील संबंधीत यंत्रणेच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

३० मार्च रोजी एक मृतदेह धरणा काठी आढळून आला होता. ओळख न पटल्याने शिवाजी नगर पोलिसांनी पंचनामा करीत तो मृतदेह शवविच्छेदनासाठी सेंट्रल रुग्णालयात पाठविला होता. यानंतर पोलिसांनी फोटो व्हायरल करताच तरुणाची ओळख पटली. हा मृतदेह आनंद मुकुंदे या युवकाचा असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी आनंदच्या नातेवाईकांनी त्याच्या शरीरावर जखमा असल्याचे सांगत त्याची हत्या झाली असून पोलीस व रुग्णालय प्रशासनाने खोटा अहवाल बनवत हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप केला आहे. शिवाय आनंद बेपत्ता असल्याची तक्रार घेण्यास देखील पोलिसांनी टाळाटाळ केली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी देखील रुग्णालयात धाव घेतली आणि आनंद सोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. मृतदेह सापडल्यानंतर ओळख पटे पर्यंत किमान दोन दिवस वाट पाहणे अपेक्षित असताना पोलिसांनी तात्काळ बेवारस जाहीर करीत शवविच्छेदन केले कसे ? असा सवाल आमदारांनी उपस्थित करत पोलीस अधिकारी आणि रुग्णालयातील अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्याच्या मागणी बाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी मात्र सर्व आरोपांचे खंडन करीत आनंदचा मृत्यू पाण्यातच बुडून झाला असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले. सध्या नातेवाईकांच्या मागणीनुसार मृतदेह शिवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठविण्यात आला असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाचा पुढील उलगडा होणार आहे.

संपूर्ण व्हिडीओ मध्ये पहा काय केलेत नातेवाईक आणि आमदारांनी आरोप :-

Report by Aadiraj Media

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *