जवळपास नऊ वर्षापूर्वी म्हणजेच २०१२ साली कल्याण मधील टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाल्यांकडून शिर्डी साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी एक गाडी बुक झाली होती. मात्र या वाहनचालकाची हत्या झाली आणि संशयितांविरोधात कोर्टात खटला उभा राहिला. जवळ्पास नऊ वर्ष चाललेल्या या खटल्याचा निकाल लागला असून गुन्ह्यातील चारही आरोपींना आता कोर्टाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
कल्याण येथील टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणारे रेवणकर यांच्याकडे वाहन चालक म्हणून घनश्याम पाठक हे काम करीत होते. २०१२ साली शिर्डी साईबाबा देवस्थानाचे दर्शन घेण्याकरिता चार जणांनी गाडी बुक केली आणि प्रवासाला सुरुवात केली. प्रवास सुरु असतानाच या चौघांच्या डोक्यात जी डाळ शिजत होती ती वाहनचालकाला अनाकलनीय होती. शिर्डीला जातानाच ओतूर येथे थांबून त्यांनी रश्शी विकत घेतली. ही रश्शी कशासाठी घेतली याची कल्पना ड्रायव्हरला मात्र नव्हती. शिर्डीला जाऊन त्यांनी दर्शन घेतले. आणि नंतर पेटपूजा करून परतीचा प्रवास सुरू केला.

नाशिक येथे आल्या नंतर आडबाजूला वाहन चालकाला गाडी थांबविण्याची सूचना त्या चौघांनी केली. कस्टमरच्या सुचनेचे पालन करीत वाहनचालक घनश्याम पाठक (५३) यांनी वाहन रस्त्याहून बाजूला केले. वाहन थांबवल्या नंतर रश्शीने या चारही आरोपींनी त्याचा गळा आवळला. ड्रायव्हरची जिवाच्या आकांताने तरफड सुरू होती. मात्र चौघांच्या कचाट्यातून त्याला मानेभोवती गुंडाळलेला मृत्यूचा दोर सोडवता आला नाही आणि त्यातच त्याने दम तोडला. चौघांपैकी एकाने गाडीवर ताबा घेतला आणि नाशिक ते कसारा प्रवास करीत असताना त्यांनी मृतदेहाला मधोमध बसवीले. पुढे गाडी कसारा घाटात आणली आणि वाहनचालक घनश्याम पाठकचा मृतदेह निर्दयीपणे खोल दरीत फेकून दिला.
इकडे वाहन चालक व वाहन दोन्ही गायब असल्याने टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या मालकांची चिंता वाढली. काहीही शोध लागत नसल्याने त्यांनी थेट महात्मा फुले चौक पोलिस ठाणे गाठले आणि आपली तक्रार नोंदवली. वाहनचालक विश्वासू असल्याने त्यांनी अपहरण झाल्या संदर्भात गुन्हा दाखल केला. वाहन व चालक मिळून येत नसल्याने महात्मा फुले चौक पोलिस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळा कुंभार व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी तांत्रिक माहिती व शिर्डी येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार आरोपींबरोबर वाहनचालक ही आढळून आल्याचे तपासात निष्पन्न झाले. मात्र पोलिसांकडे या हत्येसंदर्भात प्रथमदर्शी असा कोणताही पुरावा नव्हता.
पोलिसांनी आपल्या गुप्त बातमीदारांमार्फत व तांत्रिक तपासावर शहापूर मध्ये राहत असणारे चारही आरोपी गजाआड करण्यात आले. आकाश गजानन साळुंखे, सचिन उर्फ बटाट्या उर्फ सुभाष नीचीते, सचिन उर्फ सच्या सुभाष नीचीते व दिनेश काळूराम फर्डे अशी त्या चौघांची नावे. यातील तीन जणांना कालांतराने न्यायालयाने जामिनावर सोडले होते. तर एक आरोपी कारागृहातच होता. केवळ गाडी चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली होती. शहापूर येथे राहत असणाऱ्या आरोपीच्या वतीने कल्याणातील २ ख्यातनाम वकील केस लढवित होते. तब्बल नऊ वर्ष कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.बी.कचरे यांच्या दालनात काल अंतिम सुनावणी झाली आणि इतक्या वर्षांनंतर मृत व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला. गुन्हा सिद्ध झाल्याने वाहनचालकाची हत्या करणाऱ्या शहापूर मधील चारही आरोपींना न्यायालयाने आता संपूर्ण जन्मभर तुरुंगवासाची सजा सुनावली आहे.
एक चारचाकी वाहन जे मिळवण्यासाठी चार व्यक्ती एका निष्पाप जीवाचा बळी घेतात. ज्यामुळे त्या व्यक्तीच कुटुंब देखील अंधारात येत. शिवाय काही लाखांच्या गाडीसाठी चार लोकांना आजन्म कारावास होऊन त्यांची कुटुंबाना देखील त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे चार पैसे मिळवण्याची ही हाव माणसाला कुठच्या कुठे घेऊन जाते हे या घटनेतून समोर आले आहे. त्यामुळे नऊ वर्षाने का होईना अखेर न्याय निवाडा झालाच. सदर तक्रार महात्मा फुले पोलीस ठाण्यात २०१२ साली नोंदवली होती. मात्र नुकतेच तीन-चार दिवसांपूर्वी देखील याच पोलीस ठाण्यात अगदी अशीच तक्रार नोंदवली गेली आहे. ज्यात गाडी चोरी साठी उबेर चालकाची हत्या करून त्याचा मृतदेह कसारा घाटात फेकला गेला आहे.
♏♓ वृत्तांकन :- रोशन उबाळे
♏♓ पुनर्लेखन :- संतोष दिवाडकर
गाडीच्या चोरीसाठी उबेर चालकाची हत्या. क्लिक करा खालील लिंकवर