घडामोडी लेख

वर्ल्डकपच्या भारतीय संघात मुंबई इंडियन्सचे सहा खेळाडू; तर चेन्नई बेंगलोरच्या फक्त एकालाच स्थान

आयपीएल स्पर्धेचा गतविजेता संघ मुंबई इंडियन्स सध्या स्पर्धेतून बाद झाल्याने समाज माध्यमांवर मिम्सचा पाऊस विरोधी संघाच्या चाहत्यांनी सुरू केला आहे. मात्र मुंबई संघाचे फेन्स देखील त्यांच्या या टीकेला तोडीस तोड अशी उत्तरे देताना दिसत आहेत. मुंबईच्या संघाने 1552 बस पकडून घरी जावे असे मुंबईचे विरोधी फेन्स म्हणत आहेत तर आमची अर्धी टीम वर्ल्डकप साठी खेळणार आहे तेव्हा तुमच्याच खेळाडूंना आयपीएल नंतर बॅगा भरायला लावा असे उत्तर मुंबई समर्थक देत आहेत. पण नक्की काय आहे या उत्तरा मागील गमक ? ज्यामुळे चेन्नई आणि बेंगलोरच्या समर्थकांना काहीसा कमीपणा घ्यावा लागतो हे जाणून घेऊयात.

आयपीएल २०२०, आयपीएल २०२१ चा पहिला टप्पा आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांतील खेळाच्या परफॉर्मन्सनुसार बीसीसीआयने भारताच्या संघाची टी20 वर्ल्डकप 2021 साठी निवड केली आहे. यात 15 खेळाडूंची नावे आहेत. तसे पाहता आयपीएल संपल्यानंतर सर्व खेळाडू हे आपल्या देशासाठी एका रंगात खेळत असतात. यात कोणत्याही आयपीएल संघाचा कसलाही संबंध नसतो. मात्र सध्या आयपीएल मधून बाद झाल्या नंतर चेन्नई बेंगलोरच्या फेन्सने मुंबईसाठी ‘घरी जा’ असे मिम्स बनवल्याने मुंबईचे समर्थक त्यांना समर्पक उत्तर देताना दिसत आहेत.

आयपीएल संघा नुसार पहायचे झाले तर भारतीय संघात निवड झालेल्या 15 खेळाडूंपैकी 6 खेळाडू हे सध्याच्या मुंबई इंडियन्स संघासाठी खेळलेल्या पैकी आहेत. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, सुर्यकुमार यादव, ईशन किशन, राहुल चहर हे ते सहा खेळाडू. याउलट चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांचा प्रत्येकी एक-एकच खेळाडू वर्ल्डकप साठी निवडण्यात आला आहे. ते म्हणजे रवींद्र जडेजा आणि कर्णधार विराट कोहली. पंजाब किंग्स चे केएल राहुल, मोहम्मद शमी. दिल्ली कॅपिटल्सचा ऋषभ पंत, आर अश्विन, अक्षर पटेल. कोलकाता नाईट रायडर्सचा वरुण चक्रवर्ती आणि सनरायजर्स हैदराबादचा भुवनेश्वर कुमार अशी आयपीएल नुसार विगतवारी करता येईल. दुर्दैव म्हणजे राजस्थान रॉयल्स ही एकच टीम अशी आहे ज्याचा एकही खेळाडू वर्ल्डकपच्या भारतीय संघात नाही.

15 ऑक्टोबरला आयपीएल संपताच 17 ऑक्टोबर पासून ओमन येथून वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. तर 24 ऑक्टोबर रोजी भारताचा संघ पाकिस्तान विरुद्ध आपला पहिला सामना खेळताना दिसणार आहे. या दिवशी संपूर्ण आयपीएल समर्थक भारतीय संघाला समर्थन करताना दिसतील. मात्र तोपर्यंत हा मिम्स वोर असाच सुरू राहणार यात काही शंका नाही.

-संतोष दिवाडकर

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *