बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात ४ फेब्रुवारी रोजी मुद्देमाल चोरीला गेली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. गुन्हा घडल्यानंतर पाच तासांच्या आतच पोलिसांना गुन्ह्याची उकल करण्यात यश आले आहे. यात आरोपी कंपनीतलाच कामगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका कुरियर कंपनीत अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला होता. कंपनीत शिरून अज्ञात चोरट्यांनी २,४५,७०५ रुपये असलेली लोखंडी तिजोरी लंपास केली. शिवाय चोरीचा सुगावा न लागावा यासाठी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज जिथे सेव्ह होते ती २००० रुपये किंमतीची डिव्हीआर मशीन देखील काढून नेली. चोरी झालेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज नसल्याने पोलिसांनी अथक मेहनत घेतली आणि चोरांच्या येण्या जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर गुप्त माहीतगारा कडून पोलिसांनी माहिती मिळवली आणि काही तासांतच पाच आरोपींचा शोध लावला. त्यातील दोन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आणि त्यांच्या कडून तिजोरी हस्तगत करण्यात आली.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कंपनीतील ३५ कामगारांची चौकशी केली. यातील एका कामगारावर पोलिसांना संशय बळावला. अधिक सखोल तपास केला असता या चोरीशी त्याचा सबंध असल्याचे उघड झाले. तो याच कुरियर कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम करीत होता. कंपनीतील सर्व माहिती त्याला असल्याने त्याने बाहेरील साथीदारांना सोबत घेऊन कट रचला आणि चोरी केली. परंतु हि चोरी आता उघड झाल्याने त्याला आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.
गुन्ह्यातील आरोपींवर बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात भा.दं. वि. कलम ३८०,४५४ व ४५७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.