Kalyan to pandharpur bus msrtc : कल्याण व आसपासच्या शहरी व ग्रामीण भागातील भाविकांसाठी एसटी महामंडळाने विशेष नियोजन केले आहे. त्यानुसार यंदा कल्याण व विठ्ठलवाडी एसटी आगारातुन आजपासून (दि.४) जवळपास १६ एसटी बसेस मार्गस्थ होणार आहेत. याचा लाभ कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा येथील भाविकांना मिळणार आहे.
आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून हरी नामाचा जप करीत हजारो वारकरी भाविक भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होतात. रविवारी दि.६ जुलै रोजी पंढरपूरात होणाऱ्या सोहळ्यासाठी भक्तगण रेल्वे, एसटी, खाजगी गाड्या अशा मिळेल त्या वाहनाने दाखल होतात. या भाविक भक्तांची विशेष सोय म्हणून एसटी महामंडळ दरवर्षी राज्यातील कानाकोपऱ्यातून एसटी बसेसचे नियोजन करीत असते.
दोन्ही एसटी आगारांचे चार दिवसांचे नियोजन ठरलेले असून ठाणे विभागातून मिळालेल्या सूचनांनुसार त्याचे पालन केले जाणार आहे. कल्याण आगारातून ११ तर विठ्ठलवाडी एसटी आगारातुन एकूण ५ गाड्या मार्गस्थ होणार आहेत. मार्गस्थ होत असलेल्या या बसेसमध्ये नियमित, जादा व ग्रुप बुकिंग अशा प्रकारच्या गाड्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त विठ्ठलवाडी एसटी आगाराच्या आणखीन ४ बसेस भिवंडी येथून तर कल्याण आगाराच्या ६ बसेस शहापूर येथून पंढरपूर वारी करणार आहेत. ठरलेल्या निर्धारित वेळेनुसार सर्व गाड्या मार्गस्थ होत असून ग्रुप बुकिंग असलेल्या बसेस मात्र प्रवाशांनी मागणी केलेल्या वेळेत सोडण्यात येतील. कल्याण आगाराच्या एसटी गाड्या तारकपूर मार्गे जाणार असून विठ्ठलवाडी एसटी आगाराच्या गाड्या चांदणी चौक मार्गे जाणार आहेत.
कल्याण एसटी आगाराचे नियोजन
स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरू असल्याने कल्याण एसटी आगार तात्पुरत्या स्वरूपात विठ्ठलवाडी एसटी आगारात स्थलांतरीत केला असला तरी कल्याणच्या जुन्या आगारा मागील बास्केटबॉल कोर्ट परिसरात तात्पुरते बस स्थानक उभारण्यात आले आहे.
शुक्रवार – एकूण गाड्या – २
नियमित – १
निर्धारित वेळ – स.७ वा.
शनिवार- एकूण गाड्या – ७
नियमित – २
निर्धारित वेळ – स.६, स.७ व इतर ठराविक वेळात
रविवार- एकूण गाड्या – २
नियमित – १
निर्धारित वेळ – स.७ वा.
विठ्ठलवाडी एसटी आगाराचे नियोजन
दि.४ – एकूण गाड्या – २
नियमित १
निर्धारित वेळ – स.७ वा.
दि.५ – एकूण गाड्या – २
नियमित १
निर्धारित वेळ – स.७ वा.
दि.६ – एकूण गाड्या – १
नियमित १
निर्धारित वेळ – स.७ वा.
असा असणार परतीचा प्रवास
मागील तीन ते चार दिवसांत भाविकांना घेऊन पंढरपूरात गेलेल्या सर्व एसटी गाड्या आषाढी सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.७) पुन्हा कल्याणच्या दिशेने परतणार आहेत. पंढरपूरच्या चंद्रभागा स्थानकातून या सर्व गाड्या तेथील ठरलेल्या वेळेनुसार सुटतील. याकरिता कल्याण एसटी आगाराच्या ६ गाड्या आरक्षित झाल्या असून आणखीन ७ गाड्या प्रवाशांच्या गर्दीनुसार म्हणजेच प्रवासी घेऊन शक्य तशा वेळेत आगारात परतणार असल्याची माहिती कल्याण आगार व्यवस्थापक महेश भोये यांनी दिली आहे. तर विठ्ठलवाडी एसटी आगाराच्या ५ गाड्यांचे परतीचे आरक्षण झाले असल्याची माहिती विठ्ठलवाडी आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांनी दिली आहे.
विठ्ठलवाडी एसटी आगारातुन बारमाही पंढरपूर वारी
आषाढी एकादशी निमित्ताने जादा गाड्या सोडण्यात येत असल्या तरी विठ्ठलवाडी एसटी आगारातून दररोज पंढरपूर साठी एक एसटी नियमित रवाना होते. स.७ वाजता ही एसटी विठ्ठलवाडी येथून मार्गस्थ होत कल्याण, डोंबिवली स्थानकातून प्रवासी घेत चांदणी चौक मार्गे पुढे जात दुपारी ४ ते ५ दरम्यान पंढरपूर गाठते. तर हीच गाडी पुन्हा विठ्ठलवाडीसाठी पहाटे ५ वाजता परतीचा प्रवास सुरु करत दुपारी २ ते ३ दरम्यान परतते. विठ्ठलवाडी येथून सकाळी ८ वाजता सुटणाऱ्या कलेढोण एसटीनेही फलटण पर्यंत प्रवास करीत पुढे वाहन बदलून पंढरपूरला पोहोचता येते.
Kalyan to pandharpur bus msrtc : Kalyan, Vitthalwadi ST depot ready for Ashadhi Pandharpur Wari