प्रेम करणं म्हणजे गुन्हा आहे असा तुमच्या मनाचा समज असेल तर ही गोष्ट तुमच्यासाठी आहे.
साधारणपणे २० व्या शतकात म्हणजेच आजपासून ५० वर्षांपूर्वी प्रेम करणं म्हणजे घोर पाप असे मानले जायचे. आज पाहायला गेलात तर अतिशय साधारण बाब बनली आहे. पण त्यातही अजूनही प्रेम म्हणजे घोर पाप आहे असं समजले जाण्याची काहींची मानसिकता आहे.
आपल्या मुलीने बाहेर प्रेम प्रकरण न करता आपल्या जातीतील आणि परिचयातील अथवा समाजातील व्यक्तीशीच विवाह करावा असे या पालकांना वाटत असते. त्यामुळे अश्या पाल्यांच्या मुली देखील आपल्या आई वडिलांच्या मान सन्मानासाठी प्रेम करण्यापासून चार हात लांब राहतात आणि घरच्यांच्या संमतीने लग्न करतात. त्यांना असे वाटते की घरच्यांचं नाक न कापता त्यांची मान ताठ रहावी.
खैरेवाडीची ही एक लहान पण मोठी वैचारिक गोष्ट. दोन लहानपणीच्या मैत्रिणी कोमल आणि जुलिशा. एकत्रितपणे शाळा कॉलेज शिकून मोठे झाल्या. मात्र जेव्हा कॉलेजची पायरी चढले त्यावेळी दोघीही प्रेमाच्या विरहात बुडून गेल्या.
कोमलच्या आयुष्यात आदित्य तर जुलिशाच्या आयुष्यात आकाशने घर केले होते. तसे दोघींच्याही घरचे प्रेम विवाहाच्या विरोधात होते. पुढे काही वर्षे अशीच शिक्षणात जात जोती. आणि हळूहळू सर्वांचे शिक्षण पूर्ण होऊन चौघेही चांगले नोकरीला लागले होते.
कोमल आणि जुलीशाच्या घरी लग्नाची बोलणी सुरू होती. कोमलने आदित्य विषयी सर्व काही घरी सांगून दिले होते. अगोदर घरच्यांनी प्रचंड विरोध दाखवला. मात्र या नंतर आदित्य बाबत कोमलच्या घरच्यांनी सर्व माहिती घ्यायला सुरुवात केली. आदित्य एका चांगल्या घरातील, सुसंस्कारि व चांगल्या हुद्द्यावर नोकरी करणारा युवक असल्याने घरच्यांनी या लग्नाला मान्यता दिली आणि कोमल आदित्यच्या प्रेमाचे लग्नात रूपांतर झाले.
कोमलच्या प्रेम विवाहामुळे जुलिशाच्या घरचे नाक मुरडत होते. त्यामुळे जुलिशा आकाश बद्दल घरात बोलण्यास घाबरत होती. ती आकाशला वेगळे होण्यासाठी समजावत होती.
अशाच एका एकांताच्या ठिकाणी दोघे बोलण्यासाठी भेटतात
“जुली तू एक प्रयत्न तर कर यार. आदित्य कोमलने समजावले ना तुला. तू प्रयत्न कर. आपले प्रेम आहे एकमेकांवर” भिजल्या डोळ्यांनी आकाश तिला विनवणी करत होता.
“आकाश… माझ्या घरचे या सर्वाला विरोधात आहेत रे. त्यांना ही सगळी फालतूगिरी वाटते रे. हे शक्यच नाही” जुलिशाही रडून सांगत होती.
“अग पण वाईट काय आहे माझ्यात ? तुझ्या शिवाय कधी कुणाचा विचार तरी केला का मी ? घरच्यांचा आदर करतो, वडील धाऱ्यांचा मान राखतो, चांगला सुशिक्षित आणि नोकरीला पण आहे ? कुठे कमी पडतोय मी ?” आकाश तिचा हात हातात घेऊन विचारत होता.
“नाही तू कमी नाही रे कुठेच. पण प्रेम विवाह ही पद्धतच मुळात माझ्या घरच्यांना नकोय. त्यांची बेइज्जती होईल गावात. माफ कर पण मला माझ्या आई वडिलांचा विचार आहे. आणि मी आधीपासूनच म्हणत आले की लग्ना बाबत मी तुला कोणताही शब्द नाही देऊ शकत” जुलिशा आपल्या पद्धतीने त्याला समजवत होती.
“जुलिशा एक प्रयत्न कर ग. कोमलच्या घरी काय वेगळं होत? बघतेस ना सहा महिने झाले किती छान सुरुये” आकाश तिला जवळ घेऊन बोलू लागला.
“प्लिज आकाश… मी माझ्या घरच्यांना समजवेल एवढी डेरिंग नाय माझ्यात. तू प्लिज समजून घे आणि इथेच थांब” रुमालाने स्वतःचे डोळे पुसत जुलिशा म्हणाली.
“जुलिशा… तू एकदा हिंमत दाखव ग फक्त. नायतर मी भेटतो तुझ्या वडिलांना.” आकाश स्वतः तिच्या जवळ जाऊन बोलला.
“आकाश तू असे काही करणार नाहीस. माझी शपथ आहे तुला” जुलीशाने त्याचा हात डोक्यावर ठेवला.
“जुलिशा… तू हे चुकीचं केलंस. ठीक आहे प्रेमा खातर मी तुझी शपथ मोडणार नाही. पण एक लक्षात ठेव. या जीवनात तू नाही तर कोणी नाही. आजन्म एकटाच राहील” असे म्हणत आकाश तिथून निघणार तोच जुलिशाचा भाऊ जयवंत समोर आला. त्याला पाहताच आकाश घाबरला. मात्र जयवंत जागेवर उभा असल्याने आकाश त्याच्या बाजूने निघून गेला. आकाश निघून जाताच जुलिशा पुरती घाबरली.
“दादा…. ते…. तो… माझा कॉलेजचा मित्र… आम्ही ते बोलायला भेटलो इथे… एक डिस्कशन…” पैलवान असलेल्या धिप्पाड भावा समोर उभा राहून जुलिशाची पाचावर धारण बसत नव्हती. तिला काय बोलावे सुचेना. ती रुमालाने डोळे आणि चेहरा पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागली. जयवंतने तसेच तिच्या हाताला धरून जीपमध्ये बसवले आणि घरा कडची वाट धरली.
गाडी रस्त्यातून पुढे आली आणि गावात घुसण्या ऐवजी त्याने सरळ नेली.
“दादा… आपण कुठे जातोय?” दबक्या आवाजात जुलिशाने प्रश्न केला.
मात्र जयवंत काही बोलला नाही. गाडी आकाशच्या गावाच्या दिशेने निघालेली पाहून जुलिशा घाबरली.
“दादा अरे तू मला सांग ना काय करतोयस ? प्लिज चल घरी दादा” जुलिशा रडू लागली.
जयवंत तिच्याकडे न पाहता काहीही न बोलता शांतपणे जीप चालवत होता. पाहता पाहता आकाशचे गाव आले आणि जीप त्याचे गाव सोडूनही पूढे निघाली. आधी आकाशला मारहाण होईल असे वाटत असताना दादा आता गाडी कुठे घेऊन चाललाय हे तिला कळेना.
काही वेळा नंतर एका गावातील वाडीत जयवंतने गाडी नेली आणि एका घरा समोर उभी केली. जयवंत गाडीतून उतरला तसे जुलिशाही त्याच्या मागे गेली.
“हे कुणाचं घर आहे दादा ? मला इथे का आणलं आहेस ?” जुलिशा विचारू लागली.
जयवंतने तिचा हात धरला आणि तिला घरात नेले. घरातील हॉल मध्ये एक फोटो लावला होता. त्यासमोर दोघेही उभे राहिले.
“दादा काय तरी बोल… कोण आहे ही ? मला का आणलेस इथे” जुलिशा फोटो कडे पाहून गोंधळून बोलली.
“वैष्णवी….” जयवंतच्या तोंडून पहिल्यांदा शब्द फुटले.
“वैष्णवी ??? कोण आहे ही ? मला काय कळेना दादा.” जुलिशाला काही सुचेना.
“माझी पोरगी आहे ती. माझी एकुलती एक लेक” पाठीमागून आलेल्या एका व्यक्तीने उत्तर दिले.
तसे जुलिशा मागे वळली. जयवंतची नजर मात्र फोटोवरून हटत नव्हती.
“मी गणपत ढोले पाटील… या गावचा पोलीस पाटील. एके काळचा राजा माणूस. आज पण पैशाने रुबाबाने राजाच आहे. पण पैसा असून हा राजा शेवटी भिकारीच आहे” असे म्हणून ती व्यक्ती ओसरीवर बसली. अंगात जॅकेट, खाली धोतर, डोक्यावर ऐटदार टोपी आणि चष्मा घालून तो व्यक्ती बसला होता.
“जुलिशा तुला काय वाटलं ? आकाश आणि तुझं प्रेम प्रकरण मला माहित नाही ? सगळं माहीत होतं मला. आज मुद्दाम तुमच्यातील बोलणं ऐकायला मी तिथे आलो होतो. पण तुमचं बोलणं ऐकून मला काय करावं कळेना. म्हणून तुला तुझ्या हातून नेमकं काय पाप घडतंय हे दाखवून द्यायला इथे आणलं” जयवंत बोलू लागला.
“दादा सॉरी पण आता मी तुम्ही सांगाल त्याच्याशी लग्न करणार आहे. मी आकाशला लग्नाचं वचन पण दिल नाही. आणि आमच्यात असं काही चुकीचं पण घडलं नाही कधी” जुलिशा बोलू लागली.
“जुलिशा तुला माहिती का हा फोटो कुणाचा आहे ते ?” जयवंतने पुन्हा तिचे लक्ष फोटोकडे वेधले.
“हा… या काकांची मुलगी आहे ना ती ? वारली ना” जुलिशा कुतूहलने बोलली.
“त्यांची मुलगी आहेच पण ही कदाचित तुझी वहिनी असती.” जयवंतच्या डोक्यात पाणी आले.
“काय दादा ??? तुझं हिच्या सोबत ?” जुलिशाला आश्चर्याचा धक्का बसला.
“होय… मघाशी तिथे आकाश बोलत होता… पण मला असं वाटत होतं की हा मीच आहे काय ? जो प्रेम मिळवण्यासाठी स्वतःचा जीव मारतोय. तो बाजूने गेला आणि मी बघतच राहिलो.” जयवंत ओसरीवर चालून बोलू लागला.
” पण दादा मग लग्न का नाही झालं?” जुलिशा विचारू लागली.
“माझ्यामुळे नाही झालं लग्न…” पाठीमागे बसलेल्या गणपत पाटलांनी बसल्या बसल्या खाली मान घालून उत्तर दिलं.
“म्हणजे काय काका ?” जुलिशा त्यांच्याकडे पाहून विचारू लागली.
“गावचा पाटील ना मी ? पाटलाला काळजी त्याच्या फेट्याची. माझा लेकीन मला कधी ही भानगड नाय कळू दिली. पण तुझा भाऊ जयवंतने एकदा स्वतः इथं येऊन माझ्या लेकीचा हात मागितला. गर्वाने माजलेला मी तुझ्या भावाला लाथा बुक्क्यांनी मारून घराबाहेर काढला. आणि त्याच लगीन सराईत लेकीच हात पिवळे करून लांबच्या गावी पाठवली. काय माज होता या पाटलाला. मिश्या ताणून गावात हिंडायचं म्हणजे जणू काय गावचा राजाच. पण एकुलत्या एका माझ्या लेकीच सुख नाय ओळखू शकलो. तिच्या काळजावर घाव करून तिला आमच्याच समाजातल्या एका तालेवार घरात दिली.” असे म्हणून गणपत पाटलांचे डोळे पाणावले.
“मग… पुढे काय झालं काका ?” जुलिशाने खाली बसून गणपत पाटलांच्या खांद्यावर हात ठेवून प्रश्न केला.
“जातीनी माझ्या पोरीची माती केली” असे म्हणत गणपतराव ढसा ढसा रडू लागले.
“काका… शांत व्हा… नक्की काय झालं ताई सोबत…” जुलिशा विचारू लागली.
“गळा दाबून मारून टाकलं तिच्या इज्जतदार नवऱ्याने.” जयवंतने पाठीमागून उत्तर दिले.
“दादा…… पण का ???” हे ऐकून जुलीशाला धक्का बसला.
“त्याला काय विचारते पोरी… या कमनशिबी बापाला विचार…” असे म्हणत ते आपले डोळे हाताने पुसू लागले.
“काका मला प्लिज नीट सांगा. मला काय कळेना. आधीच दादा इथे का घेऊन आला तेच समजेना” जुलिशा गोंधळून गेली.
“तिचा प्रेम विवाहाला विरोध करून जातीत लग्न लावून दिल. पण त्या सैतानानी माझ्या पोरीचं हाल हाल केलं. बापाची इज्जत राखावी म्हणून पोरगी एका शब्दाने बापाला काय बोलली नाही. वर्षभर संसार झाला आणि एका रात्रीत भाडखाऊ पक्का दारू पिऊन माझ्या लेकीला घाणघाण श्या देऊ लागला आई बापावरून. तिला काय ते ऐकवना. ती ओरडली त्याच्यव. त्या सैतानाने त्या दारूच्या नशेत कोयता फिरवला माझ्या बाळाच्या मानगुटीवरून…” गणपतराव ढसा ढसा रडू लागले.
“तळ हाताच्या फोडा सारखी जपली ग तिला. पण तीच सुख नाय ओळखु शकलो ग नाय ओळखू शकलो. असलं प्रेमाच लग्न लावावं तर गावात नाक कापलं जाईल वाटायचं. काय म्हणतील गावातली लोक ? असं वाटायचं. पण आज गणपत पाटील जेवलाय की मरून पडलाय घरात एक भाडखावं डोकवना गावातला माझ्याकडे. आणि यांचा विचार केला मी माझ्या पोरीसाठी” आपले दोन्ही हात फोटोकडे जोडून रडू लागले.
“आबा शांत व्हा… जे झालं ते झालं. आता ते बदलता येणार नाही. पण आपण दुसऱ्यांना पण बदलू शकतो ना.” असे म्हणत जयवंत ने गणपत पाटलांना सावरले.
“दादा तुला आता नेमकं काय म्हणायचं आहे?” जुलिशा त्याच्याकडे पाहत म्हणाली.
“सांगतो तुला… चल घरी..” असे म्हणत जयवंत जुलिशाला घेऊन घराकडे निघतो.
जयवंत जुलिशाच्या प्रेम प्रकरणा बद्दल घरात सर्व काही सांगून टाकतो. हे सर्व सांगितल्या नंतर त्याने त्याच्या प्रेम प्रकरणा बद्दल जे काही घडले ते ही त्याच्या घरात सांगितले. घरच्यांनी या गोष्टीवर खूप विचार केला आणि त्यांनी आकाशची माहितीही काढली. आकाश आपल्या व्यक्तीमत्वात कुठेच कमी पडत नव्हता. शिक्षण, नोकरी, घरदार या सर्वात त्याने स्वतःला घडवले असल्याने त्याला नाकारण्यासाठी प्रेम विवाह हेच एक कारण बनले होते. शेवटी सर्व बाजूने विचार केल्या नंतर कोमल आदित्य पाठोपाठ आकाश आणि जुलिशाचे प्रेम देखील विवाहात रुपांतरीत झाले.
आज शहरातील गाव खेड्यातील कित्येक पालक प्रेम विवाहाला अनेक कारण देऊन नाकारतात. कुणाची जात आडवी येते, कुणाची आर्थिक परिस्थिती तर इतर मतभेद. यामुळे जातीचा नादात कितीतरी मुलींचा आयुष्याची माती झाल्याचे नेहमी दबक्या कानांनी ऐकायाला मिळते. पण याचा अर्थ असा नाही की प्रेम विवाहच काय तो चांगला. बऱ्याचदा इथेही काही गोष्टी बदलतात. काही प्रेमविवाह देखील फसतात. त्यामुळे थेट परवानगी अथवा विरोध न करता काय योग्य आणि अयोग्य याची पारख करा आणि मगच आपल्या मुलीला योग्य घरात द्या. एक गोष्ट लक्षात घ्या. चार लोक काय म्हणतील हा विचार करू नका. ही चार लोक कधीच आपली नसतात. ना सुखात ना दुःखात. त्यामुळे आपल्या पुरता विचार करा, आपल्या लेकरांचा अगोदर विचार करा. लोकांना त्यांचा विचार करू देत. शेवटी चांगले केले तर जळणार आणि वाईट केले तर हसणार. ही चार लोक आहेच तशी.
समाप्त !!!
लेखन :- संतोष दिवाडकर
खूप छान आहे लेख.सध्याच्या जातीपातीच्या बेड्यांमध्ये गुरफटलेल्या आणि समाज काय म्हणेल?या विचारांचा पगडा असलेल्या लग्नाच्या मूलामुलींच्या आईवडिलांसाठी…
सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती झाली.त्यांनी यशवंत नावाच्या मुलाला दत्तक घेतले होते.सावित्रीबाई नि त्याचा आंतजातीय विवाह लावून दिला.या गोष्टीला अंदाजे150 वर्षे तरी झाली असतील..मग , 150 वर्षांपूर्वी सावित्रीबाई नी जातपात न पाहता विवाह लावला.आणि आपण अजून जातीपातीचे राजकारण करत बसलो आहोत.यातून बाहेर पडलंच पाहिजे.