आई …. दोनच शब्दात साऱ्या ब्रम्हांडाची ताकद सामावली आहे. देवाधिकातही आईला प्रथम स्थान आहे. जिच्यामुळे पाहिले हे सुंदर जग ती आई म्हणजे आपल्यासाठी पहिली देवी. आणि बाप हा देव. फक्त एका दिवसा पुरता गोड गोड बोलणे नव्हे तर आयुष्यभर तिच्या उपकाराची जाण ठेवणं म्हणजे जन्माचे सार्थक.
आजच्या या मातृ दिना निमित्त एक गोष्ट मी तुमच्याशी शेअर करतोय. जी नुकत्याच तीन महिन्यांपूर्वी घडली होती. ते सर्व प्रसंग आज मला सर्वांना सांगायचे आहेत ज्यांना ते माहीत नाहीत. ही गोष्ट माझ्या आईच्या आईची म्हणजेच माझ्या आजीची आहे.

दिवाडकरांची लेक गोसाव्याची सून झाली आणि पोमगावच्या मारुती गोसावी यांच्याशी तिचा ७० च्या दशकात विवाह झाला. पहिली मुलगी म्हणजे माझी आई, त्या नंतर माझे मामा आणि मग माझ्या तीन मावश्या. अश्या चार बहिणी आणि एक भाऊ असे पाच मुलांचे संगोपन मोठ्या हलाखीत झाले. इतकेच नाहीतर विठ्ठल आणि लक्ष्मण गोसावी हे लहान दिर देखील पाठच्या भावा प्रमाणे होते. सासू आणि सासर्याचे हित पाहून तिने संसार नेटाचा केला.

आजकाल सर्व सुखसोया आहेत. पण २० व्या शतकात खेडेगावात काय होत हो ? साधा रस्ता देखील शहराला जोडला नव्हता. जे काय दळणवळण असायचे ते धरणातून व्हायचे. मुळशी धरणातील लाँचेने गावखेडी जोडली गेली होती. पैसा तर बघण्यातच नसायचा. अश्या हलाखीच्या परिस्थितीत तिने सर्व मुलांना मोठे केले. आणि पुढे ज्याची त्याची लग्न होऊन संसार सुरू झाले.

साधारणपणे २१ व्या शतकात परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. कुटुंब वाढली होती. सुखसोयी गावात पोहोचल्या होत्या. जुन्या लोकांना जुने दिवस आठवत होते. पण नव्या पिढीला मोबाईलच्या नेटवर्क पुढे जुन्या दिवसातील त्रास कळणारा नव्हता. माझ्या आजीने लहानपणा पासून लेक, लेकी, नातवंड असं सर्वांना जीव लावला. त्यामुळे तिची माया कुणी विसरणार नाही. आता मी त्या प्रसंगावर येतो जो मला सांगायचा आहे.
फेब्रुवारी महिन्यात माझ्या बहिणीचे लग्न होते. नातीचे लग्न म्हणून माझी आजी शिळीमला आमच्या गावी आली होती. तसं सुरुवातीला तिला सर्दी होती. पण जस जसे लग्नाचे काही दिवस जवळ आले तिच्या सर्दीचे रूपांतर कफ मध्ये झाले. तिच्या छातीत हळूहळू कफ वाढू लागला होता. लग्नाच्या दोन दिवस आधी तिला आम्ही जवणला असलेल्या डॉक्टर कडे नेले होते. त्या डॉक्टरने वाफ दिली आजी औषध गोळ्या देऊन नॉर्मल असल्याचे सांगितले. यानंतर आजीला दोन दिवस काहीसे बरे वाटत होते.
लगीन घर असल्याने जो तो आपल्या घाईत आणि तंद्रीत होता. कार्यक्रम, विशेष रसम, बांगड्या, मेहंदी, सामानाची आवरा आवर, अक्षता, मंडप, लायटिंग, साऊंड, गाणी, उटणे, असे सर्व रसम असल्याने फारसे लक्ष आजीकडे जात नव्हते. मुळात ही वेळ अशी असते की कोणता पाहुणा कुठे असतो हे देखील कुणाला माहीत नसते. आणि इतक्या गडबडीत मात्र आजीचा दम वाढू लागला. तसे दिसताना ती नॉर्मल वाटत होती. कारण जेवतेय, बसतेय असं सर्व दिसत होतं.
लग्नाच्या दिवशी आजी लग्नालाही आली. लग्न पाहीले आणि रात्री घरी आलो. आणि त्या रात्री तिला खूप जास्त त्रास झाला. त्या रात्री ती शिंदू मावशीच्या घरी झोपली होती. रात्रभर तिला श्वास घेता येत नव्हता. मात्र कोणालाही कल्पना नव्हती की त्रास बळावला आहे. सकाळी तिने अंघोळ केली. थोडावेळ बसली आणि ती खाटेवर जाऊन झोपली. तिला प्रचंड दम लागला होता. कोणीतरी मला दवाखान्यात न्यावं असं तिला वाटत होतं. पण तिला जास्त बोलता येत नव्हते. मी, विकास, गणेश उशिरा उठलो होतो. आम्ही नाश्ता केला, पीक आप गाडी घेऊन मंडप वाल्याचे सामान पोहोचवले. दुपारचे जेवणही केले.
दुपारी कुंदा काकूने आजीची तब्येत पाहिली तेव्हा तिला जास्त त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर तिला पुन्हा एकदा डॉक्टर कडे न्यावे लागेल असे वाटले. विकासने पिक अप काढली आणि आजीला पवना नगरला नेले. सोबत काकू आणि गणेश होता.
पवना नगरला डॉक्टरानी तपासल्यानंतर छातीत खूप कफ झाला असून न्यूमोनिया झाला असल्याचे सांगितले. शिवाय एडमीट करून ऑक्सिजन लावावे लागेल असे सांगितले. यानंतर तिला घेऊन गेलेल्यांना तिची तब्येत खालावली असल्याचे समजून आले. यानंतर घरी फोन आला. घरी फोन आल्यानंतर वातावरण देखील बदलले. मी पटकन फोन करून माझ्या मित्राची गाडी बोलवली. पप्पा, रंगनाथ काका, आणि सुरेखा असे तिघे जण त्या गाडीतून कामशेतला निघाले.

कामशेत मधील एका मोठ्या खाजगी रुग्णालयात आजीवर उपचार सुरू झाले. आता घरात माझी आई, सुरेखा मावशी दोघेही चिंता करीत होते. बाळू मामा आणि बापू दोघेही बाईक घेऊन पोमगावला डॉक्युमेंट आणायला गेले होते. लोणावळ्याहुन उमेश मामा, रमेश मामा देखील कामशेतला आले होते.
घरी फक्त मी, आई, मावशी, राणी आणि अण्णा एवढेच होतो. त्यात अण्णा खूप जास्त पिले असल्याने त्यांनाही आम्हाला सांभाळावे लागत होते. गावात पाणी नसल्याने लग्नासाठी मागवलेला निम्मा टँकर खाली करून घरात रिकामे झालेले पाण्याचे ड्रम भरायचे होते. अंधार पडायच्या आत आम्ही सर्व पाणी भरले.
रात्री आठ वाजता मामा आणि बापू आले. यावेळी उमेश मामा चा बाळू मामा शी फोनवरून बोलणे झाले. तब्येत जास्त असल्याचे बाळू मामला समजले आणि मामा एकटेच वरहंड्यात बसून राहिले. खात्री साठी मी पप्पांना फोन केला. तर त्यांनी तब्येत ठीक आहे रिपोर्ट आले की आम्ही निघू असे सांगितले. मग गणेश सोबत बोललो. आणि मग उमेश मामाला विचारले. तोवर मामा आणि मावशी आई घरी नुसते अधून मधून रडत होते. खूप भावुक आणि नाजूक असं वातावरण होत. त्यात हे सर्व बीपीचे पेशंट असल्याने मला विशेष काळजी घ्यावी लागत होती. कारण मामा म्हणाले की तिचं काही खरं नाही. आणि तिथून मग तिघेही रडायला लागले.
उमेश मामा ला फोन लावल्या नंतर परिस्थिती समजली. आणि मी फोन स्पीकरला टाकला. तेव्हा आजी ठीक असल्याचे समजले आणि तिघेही शांत झाले. रात्री दहा वाजता हॉस्पिटलमध्ये गेलेली सर्व माणसे घरी आली. आम्ही सर्वांनी जेवण केले. आजीने आम्हाला माझ्या बहिणीच्या जागरण गोंधळाला जायला सांगितले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व तिकडे होतो.
तिसऱ्या दिवशी आम्ही सर्व आजीला पाहायला कामशेतला आलो होतो. हॉस्पिटलमध्ये मी आणि बापू आजीला भेटायला गेलो आणि ती पाहून रडायला लागली. तिला नीट बोलताही येत नव्हते. मी फक्त काळजी घे असं बोललो आणि तिथून निघून आलो. कारण डॉक्टर फार वेळ थांबू देत नाहीत. मात्र हॉस्पिटलमधून निघताना माझी आई, मावशी, मी आम्ही पुन्हा तिला भेटलो. कोणास ठाऊक ही भेट शेवटची ठरावी. कारण तिची किडनी निकामी होत असल्याचे डॉक्टर सांगत होते. कफ पूर्ण छातीत पसरला होता. मात्र आता काहीसा कमी झाल्याचे जाणवत होते.
आजीची सून माया मामी तिची विशेष काळजी घेत होती. मात्र हॉस्पिटलचे बिल जवळपास लाखभर रुपयांवर आले होते. हे हॉस्पिटल परवडणारे नसल्याने इथून दुसरीकडे शिफ्ट करण्याचे प्लॅनिंग सुरू होते. धोका मोठा होता. मात्र पाण्या सारखा पैसा हॉस्पिटल ओरबाडत होते.
चौथ्या दिवशी मी माझ्या बायकोला घेऊन सासरी आलो. कारण तिची तपासणी होती. त्याच दिवशी आजीला दुपार नंतर पुण्यातील सिम्बॉयसिस या मोठ्या मात्र नामांकित हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले. हॉस्पिटल बदलल्यानंतर तिच्या तब्येतीत आणखीन बिघाड झाल्याचे समजले. ती रात्र गेल्यानंतर तिच्या जगण्याची शक्यता धूसर झाली. आम्ही देखील दुसऱ्याच दिवशी बायकोचे चेकअप करून घ्यायचे ठरवले.
पाचव्या दिवशी सकाळीच आम्ही हडपसर कडे निघालो. उमेश मामा सोबत बोलणेही झाले. डॉक्टरानी जगण्याची शक्यता नसल्याचे सांगितले असून आता आजीला गावी नेण्याचे विचार असल्याचे सांगितले. गावी नेणार म्हणजे खेळ संपलेला आहे असाच थोडक्यात त्याचा अर्थ होता. बायकोचे चेकअप झाल्यानंतर आम्ही धनकवडी येथे नातेवाईकांकडे गौरी ताई कृष्णा कुरावले यांच्या घरी मुक्काम केला.
याच रात्री शिळीम मध्ये मोठा हाहाकार माजला होता. सर्व काही संपलं असे समजून माझी आई, काकू, मावशी सर्वजण रडायला लागले. दुसऱ्या दिवशी गाडी करून पोमगावला जायचे असे त्यांचे ठरले. आणि कसेबसे झोपले. रात्रभर कुणाच्या डोळ्याला डोळा नव्हता.
सातव्या दिवसाची सकाळ उजडताच सर्वांनी आवराआवर सुरू केली. आणि तितक्यात एक फोन कॉल पप्पांचा झाला.
“हा बोल उमेश. निघाले का तुम्ही तिकडून ?” पप्पांनी हलक्या आवाजात विचारले.
तोवर घरात आई आणि काकू कोमेजल्या चेहऱ्याने आवराआवर करीत होते. आणि इकडे घराबाहेर फोन सुरू होता.
“दाजी… अहो तुम्ही काय गडबड करू नका निघायची. आईची तब्येत आता वैशि बरिये.” उमेश मामा म्हणाले.
असे ऐकताच पप्पांना आश्चर्याचा धक्का बसला.
“डॉक्टर आलथे आता तपासायला ते म्हणाले पेशंटच्या तब्येतीत सुधारणा जाणवतेय. तुम्ही काही घाई करू नका अजून राहुद्यात इकडे” असे मामांनी सांगितले.
“अच्छा अच्छा वा… देवाला काळजी बाकी. बरं झालं. आता अक्का आणि आम्ही सगळे निघणार होतो थोड्या वेळानी नवनाथची गाडी करून” पप्पा म्हणाले.
हा फोन कॉल संपताच पप्पा ही बातमी सांगायला आतमध्ये आले.

“उमेशचा फोन होता. तो म्हणाला तुम्ही काय तिकडं येऊ नका. मामी आहेत ठीक” पप्पांनी आई आणि काकुला सांगितले.
हे ऐकताच त्यांना कानावर विश्वास बसेना झाला. कोमेजलेले चेहरे पुन्हा एकदा खुलले. आणि सर्वांनी देवाचे आभार मानले. सकाळी ९ वाजता मी देखील असाच कॉल उमेश मामाला केला. त्यांनी देखील मला असेच सांगितले. मलाही छान वाटले. हा एक दैवी चमत्कार होता असे आम्हाला सर्वांना आजही वाटते. मग पोमगावला न जाता आम्ही सरळ पुन्हा राजगुरूनगरला आलो.
दुसऱ्या म्हणजेच आठव्या दिवशी आजीची तब्येत आणखी सुधारली आणि तिला आयसीयू मधून जनरल वॉर्डात शिफ्ट केले. याचा अर्थ हा की धोका आता टळलेला होता. मी, बायको आणि माझे सासू, सासरे, मेव्हणा आम्ही तिला पहायला हॉस्पिटलमध्ये आलो. तिला भेटलो, बोललो, एकदम छान वाटलं. आणि दुसऱ्या दिवशीच आम्ही कल्याणला आलो.
पुढे काही दिवस आजी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत राहिली. सर्वांनी तिची खूप काळजी घेतली. सासू सुनेचे भांडण म्हणजे काही नवीन नाही. मात्र तरीही सून म्हणून माझ्या मामीने तिचे कर्तव्य बजावले. मामी दिवस रात्र तिच्या सोबत हॉस्पिटलमध्ये होती व अजूनही सेवा करीत आहे. अनेकांनी खूप धावपळ आणि मेहनत घेतली. आणि शेवटी काही दिवसानंतर आजीला डिस्चार्ज देण्यात आला.
आजी घरी तर आली पण आता नवा प्रश्न निर्माण झाला होता. ते म्हणजे तिला संडास येत नसल्याने तिचे पोट फुगत होते. शिवाय उलटी होत असल्याने पोटात अन्नही जात नव्हते. थोडाफार फळांचा रस, काहीतरी खाणे आणि पाणी यावरच ती जगत होती. तेव्हाही सर्व जण तिला बघून जात होते. आता काही दिवसांपूर्वी राणीने व्हिडिओ कॉल केला होता. ज्यात जवळपास तीन महिन्यांनंतर आजी आपल्या मूळ रुपात नऊ वारी साडीत आम्हाला दिसली होती. पूर्वी प्रमाणेच ती चालत आणि बसत होती. शिवाय जेवणही हळूहळू सुरू केले होते. म्हणजेच थोडक्यात आता ती पहिल्या सारखी होत आहे. देव करो आणि ती आधी सारखीच धड धाकट होवो.

स्वर्ग रिटर्न आहेस तू… असे अनेक जन तिला म्हणतात. कारण सर्व संपलेले असतानाही ती त्यातूनही सावरून बाहेर आली. तिची जगण्याची प्रचंड इच्छा, तिच्यासाठी प्रार्थना करणारे असंख्य हात, आजारपणातही देवाचा धावा करणारे तिचे मन, जागेवर पडूनही दुसऱ्यांच्या काळजीने खालीवर होणारा तिचा जीव. खरंच देवाच्याही मनात काहीतरी आलं असावं म्हणून देवाने तिला पुनर्जन्म दिला असावा असं आम्हाला वाटत. सारं काही संपलेलं असताना सारं काही सुरू राहतं यामागे कोणती मोठी दैवी शक्ती आहे ? हे आपल्या सारख्या सामान्य माणसाला कळणारे नाही.
आजच्या मातृ दिनाच्या निमित्ताने आज हा ताजा असलेला प्रसंग तुम्हाला मी आज सांगितला. कारण ती आईच असते जिच्या मायेच्या पंखात आम्ही विसावलेलो असतो. एकच सांगेल की जमत असेल तर शक्य तितकी काळजी घ्या, आणि जमत नसेल तर त्रास होणार नाही असे वागू नका. कारण स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी…
–संतोष दिवाडकर
