खरं तर न राहवून काही तरी सांगावंसं वाटलं आणि बरेच दिवस काही लिहल नव्हतं म्हणून मुद्दामच हे लिहतोय. आज माझ्या ऑफिसमधील स्टाफ सोबत मी एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. खूप गर्दी असल्याने आम्ही फक्त मुख दर्शनच केले. ज्यावेळी दर्शन करीत होतो त्यावेळी सर्व जण हाताला येतील तितके पैसे दहा, वीस, पन्नास , शंभर आईच्या चरणी वाहत होते. (Experience aai ekvira)
आता खरं सांगतो मी देवाच्या चरणी कधीही एकही रुपया दान न करणारा व्यक्ती असल्याने मी याही वेळी असे काही केले नाही. पण आशीर्वाद घेताना जे मागितले त्यावरून फक्त आईला इतकेच बोललो की मी काही पैसे वाहणार नाही आणि तुला त्याची गरज पण नाहीये. तू फक्त आशीर्वाद दे आणि माझ्याकडून गरजूंची मदत करून घे. हे मी मनातल्या मनातच बोललो. मुखदर्शन केले माथा टेकला आणि तिथून निघालो. थोडे फार फोटो सेशन झाले आणि आम्ही सर्व खाली उतरायला सुरुवात केली.
यादरम्यान आमच्यातील तिघे जण पुढे निघून गेले. मी आणि माझा सहकारी मित्र विशाल आम्ही मागून चालत होतो. या दरम्यान पायर्यांवर अनेक जन भेटले. त्यात काही महिला परडी हातात घेऊन दक्षिणा घेत होत्या, काही जण देवाच्या नावाने भिक्षा मागत होते. पण या ठिकाणी मी कधीच दान करीत नसल्याने हात जोडून पूढे निघालो.
जिथून पायऱ्या सुरू होतात त्या ठिकाणी आल्या नंतर एका बाजूला बसलेल्या वयस्कर आदिवासी महिलेने आवाज दिला, दिसायला अशक्त वाटत होती. अंगावर ठाकरी पेहराव म्हणजे ब्लाउज आणि कंबरे खाली साडी असे काहीतरी.
“दादा… आर खायला दे र कायतरी… दे दे चिक्की तरी दे…” तिचे आवाज ऐकून मी थांबलो आणि पटकन पिशवी उचकटून तिला एक चिक्कीचे पाकीट काढून दिले.
“पाणी हाय का रं? खूप वेळ तहानली हाय… दे र दादा पाणी…” तिने पाण्याची मागणी केली.
आमच्याकडे पाणी नव्हते. थोडे पाठीमागेच एक हॉटेल होते. तिथून एक पाण्याची बाटली घेतली आणि त्या महिले पर्यंत आलो. त्यांना म्हटलं…
“हे घ्या पाणी…”
हातात पाण्याची बाटली घेत तिने माझा हात ओढला आणि डोक्याला लावला. त्या आजी बाईने थेट माझ्या पायाला हात लावून पाया पडू लागली. न राहवून मी मागे सरकलो. आणि वाकून तिने पायाला हात लावल्या बद्दल तिच्या पाया पडलो. तिच्या डोळ्यात अश्रू पाहून मला जाणीव झाली की ही महिला पाण्यासाठी कासावीस झाली होती.
“नको नको राहुद्या… पाया नका पडू” त्या महिलेला मी थांबवले.
का कुणास ठाऊक मी तिथून निघालो तरी जोरजोरात जिवाच्या आकांताने ती ओरडत होती…
” बाळा… लय मोठा होशील र तू… देव तुझं भलं करील… तू लय मोठा होशील…” संपूर्ण पायऱ्या संपे पर्यंत ती बाई हेच सांगत होती. का कुणास ठाऊक मी मागेही वळून पाहिले नाही. एकदा हात जोडून निघालो तर पुन्हा मागेही पाहिले नाही. माझा मित्र विशालनेही माझ्या या कृत्या बद्दल मला शाबासकी दिली.
सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की खरं दान हे दानपेटीत नाही तर प्रत्यक्ष गरजू व्यक्तीला मदत करणे आहे. एकविरा मातेला फक्त म्हणालो की मी दान म्हणून इथे पैसे देणार नाही. माझ्या कडून एखाद्याची मदत करवून घे. आणि देवी मातेने हे पुण्यकर्म शेवटी जाता जाता तिच्याच दारात करवूनही घेतलं. ही माझी परीक्षा होती का आणखी काही माहीत नाही. पण हा अनुभव आणि हा प्रसंग लक्षात राहणारा ठरला आहे.
एकविरा माते की जय !!!
-संतोष दिवाडकर
An experience at the base of Aai Ekvira