Dombivli Dahihandi : दीपेश म्हात्रे फाउंडेशनच्या वतीने ‘स्वराज्य दहीकाला उत्सव’ या वर्षी तिसऱ्यांदा सम्राट चौक, डोंबिवली पश्चिम येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या वर्षीचा दहीहंडी फोडण्याचा मान रिक्षा चालकांना देण्यात येणार आहे. डोंबिवली शहरातील नागरिकांची सेवा, कोरोना काळातील उल्लेखनीय कार्य तसेच अनेकदा अॅम्बुलन्स पोहोचण्यापूर्वीच नागरिकांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचे काम रिक्षा चालक करतात. या अद्वितीय कार्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ त्यांना या वर्षीचा दहीहंडी फोडण्याचा मान देण्यात येत असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दहीहंडी महोत्सवाच्या संध्याकाळी ‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोड यांचा लाईव्ह परफॉर्मन्स होणार आहे. तसेच प्रसिद्ध युट्युबर विनायक माळी देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. या वर्षीच्या दहीहंडी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक एक लाख रुपये असून ते सर्वांसाठी खुले असणार आहे. द्वितीय पारितोषिक देखील एक लाख रुपये असून ते मात्र डोंबिवलीतील मंडळांसाठीच आरक्षित असेल. 26 ऑगस्टच्या रात्री 11 वाजता कृष्ण जन्मोत्सव पारंपरिक भजनांच्या माध्यमातून आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे. तरी, या उत्सवात सहभागी होऊन दहीहंडीचा आनंद सर्व नागरिकांनी घ्यावा, असे दीपेश म्हात्रे फाउंडेशनकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
सण उत्सवात विविध पक्ष रस्त्यावर कमानी उभ्या करतात, मोठमोठे होर्डिंग्ज आणि बॅनर लावतात. सध्या रस्त्यांची सर्वत्र दुरावस्था झाल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे कमानी उभारून वाहतुकीला अडथळा निर्माण करू नका असा संदेश दीपेश म्हात्रे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आहे.
Dombivli Dahihandi : This year Dipesh Mhatre will give the honor of breaking Dahihandi to the rickshaw drivers
