कथा

१६७० – एक रहस्यमय प्रवास; भाग पहिला

शिवाजी महाराज की जय !!! घोषणा देत दुर्गाडी किल्ल्यावरून मी माझ्या मित्रांसोबत निघालो. सोबत माझ्या चाळीतील काही शालेय शिक्षण घेणारी नवोदित पिढी होती. किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर शिवाजी महाराज या विषयावर आमच्या गप्पा सुरु होत्या. तसा शिवाजी महाराज हा विषय या अगोदरही आमच्यात सुरू होता. परंतु आजचा दिवस खास होता. हो आज शिवजयंती होतीच पण एक वेगळाच उत्साह आमच्या मध्ये होता. आता ते नेमकं काय ? हे पुढे तुम्हालाही समजणारच आहे.

मी, माझा मित्र सूरज, धिरज आणि चाळीतील काही शाळकरी मुलं चैतन्य, यश आणि आर्यन हे तिघे आमच्या सोबत होते. तशी आमची गॅंग खूप मोठी आहे पण या दिवशी सर्व व्यस्त होते. अलीकडे तर नेहमीच व्यस्त असत. ज्याठिकाणी आम्ही जाणार होतो ते ठिकाण अपरिचित होत. विज्ञानाच्या जगात आणि अज्ञानाच्या सावलीत अस वेगळं ते जग होत.

राघव शास्त्री हा एक आगळा वेगळा सर्वांपासून अलिप्त असलेला वैज्ञानिक भिवंडीत राहत होता. नासाला मागे टाकून त्याने स्वतःच वेगळंच जग तयार केलं होतं. ज्या गोष्टीची आपण फक्त कल्पना करतो व त्या वास्तवात नसतात त्या गोष्टी त्या व्यक्तीने सत्यात उतरवल्या होत्या. मात्र नासा आणि त्यातील संशोधना पासून तो चार हात दूर होता. यामुळेच तो सर्व सोडून भिवंडी सारख्या लहान शहरात राहत होता. तो अस काय जगावेगळं करत होता ? हे खरंतर आम्हालाही नव्हतं माहिती. पण जेव्हा सत्य समजलं तेव्हा या जगात सार काही शक्य आहे. कल्पनेपलीकडेही जग आहे हे समजले.

भिवंडी बायपासला झालेल्या दरोडेखोरांच्या एका हल्ल्यातून सूरजने त्याचे प्राण वाचवले असल्याने त्याने त्याचे सर्वात मोठे रहस्य सुरजला सांगितले. न राहवून सुरजने मला सांगितले. पण आता हे आणखी कुणाला कळू नये म्हणून आम्ही ते गुपित कायम ठेवले. मात्र आजच्या तारखेला ठरल्याप्रमाणे तो आमची एक इच्छा पुरी करणार होता. सूरजने त्याचे प्राण वाचविल्याची परतफेड त्याला करायची असल्याने तो यासाठी तयार झाला होता. फिरायला २ दिवस बाहेर जात आहोत असं घरी सांगून आम्ही भिवंडीत राघव शास्त्री कडे आलो.

“हॅलो राघव शास्त्री” दारातून सुरजने आवाज दिला.

“येस मिस्टर सूरज एन्ड टीम, प्लिज कम इनसाईड” असे म्हणत त्याने आम्हाला आत बोलावले.

आत गेल्यानंतर आम्ही तिथेच सोफ्यावर बसलो. आणि तो देखील आमच्या सोबत बसला.

“हम्म… तुम्ही सिक्रेट गोष्ट जर कुठे बोलाल तर मला सुसाईड करावं लागेल” असं त्याने आम्हाला स्पष्ट सांगितले.

“नो सर… आम्ही कुठेच बोलणार नाही.” मी त्याचा हातावर हात ठेवत वचन दिले.

राघव शास्त्री एक वैज्ञानिक होता. या पृथ्वीबाहेरील ग्रहांवर त्याचे संपर्क होते. त्याचा घरातील छुप्या लॅब मधून तो या सगळ्या गोष्टी करीत होता. आणि याची कल्पना बाहेरील जगाला नव्हती. ना नासाला ना इसरोला. तो जे करतो हे वास्तवात घडते यावर आमचा विश्वास नव्हता. पण आज तो आम्हाला विश्वास ठेवून प्रात्यक्षिक दाखवणार असल्याने आम्ही आतुर होतो.

“खरंतर सूरज मुळे मला नवा जन्म मिळाला. अन्यथा त्या दिवशी मी त्या हल्ल्यात बचावण्याची शक्यता नव्हतीच. मला वाटलं आता माझा एन्ड होणार पण सूरज मुळे वाचलो. याने वेळेवर येऊन त्याची बाईक पुढे आणून त्याच्या अंगावर चढवली जसा तो पडला मी पटकन सूरज बाईकवर बसलो. रॉकेट सारखी गाडी पळवली. म्हणून मी जीवावर उदार होऊन इथे बोलावलं आज तुम्हाला” असे म्हणत तो उठला. आणि आतल्या खोलीकडे जाऊ लागला. आम्ही देखील त्याच्या मागे उठलो.

“या आता माझ्या सोबत तुम्हाला लॅब मध्ये नेतो” असे म्हणत त्याने आम्हाला आतील खोलीत नेले. आतल्या खोलीत गेल्यानंतर त्याने त्याचा पलंग पुढे ढकलला. आणि जमिनीवर अंथरलेली रझई काढून बाजूला केली. आता समोर लाकडी प्लाउड दिसले. त्याने ते उचकटून बाजूला ठेवले. तोच आम्हाला खाली जाणारा अंधारा जिना दिसला. आम्ही मात्र आवक होऊन पाहतच राहिलो.

“चला माझ्या मागे ये. जस्ट फॉलो मी” शास्त्री उतरू लागला.

“संतोष दादा मी नाय येत. भीती वाटते” चैतन्य घाबरु लागला.

“अरे ये आम्ही आहोत ना सर्वे” धिरजने त्याला आधार दिला.

खरंतर पुढे काय आहे ? हे समजूनच आम्हाला भीती वाटत होती. कारण शास्त्री हा एक वयस्कर व्यक्ती होता. एक भिंगाचा चष्मा आणि पांढरा कोट घालून तो हळूहळू पुढे जिना उतरत होता. जिना उतरून झाल्यावर त्याने सेन्सर वर बोट टेकवले. तसे समोरील दरवाजा उघडला आणि आम्ही एक एक करून आत गेलो.

बापरे ! आत मधील दृश्य पाहून आम्ही हैराण झालो. काय ते दृश्य होते. सगळीकडे नुसता लखलखाट. अश्या वस्तू ज्या कधी पाहिल्या नाहीत त्या तिथे होत्या. काही रसायनं होती ज्यातून बुडबुडे निघत होते. तर काही हत्यार देखील होती.

“सर तुमचा लॅब खतरनाक आहे” सूरज म्हणाला.

“आईच्या गावात चैतन्य इकडे बघ काय आहे” यश काहीतरी दाखवू लागला.

“एक मिनिटं… कोणत्याही वस्तूला तुम्ही स्पर्श करू नका. मी दाखवेल तेच पहा आणि मी सांगेल तेव्हाच बोला. तुमचा आवाजही चालणार नाही.” शास्त्रीने सूचना दिली.

पण तो असं का म्हणला हे मी देखील त्याला खुणेने विचारले. यशने जे मशीन पाहिलं ते काहीसं विचित्रच होत. शास्त्रीने पुन्हा एक कोड दाबून मशीनची स्क्रीन ऑन केली. अचानक त्यावर एक बॉल दिसू लागला. आणि त्याने आम्हाला एक हेडफोन सारख यंत्र दिल जे त्याने आमच्या कानाला लावलं.

“हम्म आता तुम्ही बोलू शकता.” असे तो म्हणाला.

“सर हे काय आहे ? आम्ही का लावलं हे ? त्याशिवाय का नाही बोलू शकत?” मी विचारले.

“हा गोल दिसतोय ? हा एक ग्रह आहे मंगळ. जो मी तुम्हाला या लेबमधून दाखवतोय.” आणि तो आम्हाला दाखवू लागला.

“चू** बनवतो हा आपल्याला” आर्यन हळूच म्हणाला.

“ओ माय गॉड एलियन्स ?” चैतन्यने आश्चर्याने पाहत म्हटले.

“हिहीही दिस इज नॉट एलियन्स” शास्त्री हसून म्हणाला.

“सो मग हे कोण दिसत आहेत” धिरजने विचारले.

“एलियन्स हे नाव लोकांनी पाडलं आहे. मी खूप मोठ्या शोधातुन बाह्य जगाशी जोडलो गेलो आहे. मागील 20 वर्षे मी या जगातल्या लोकांचा एक ट्रस्टवर्थी पर्सन आहे.” तो सांगू लागला.

“म्हणजे यांना तुम्ही ओळखता?” यशने विचारले.

“हो प्रत्येक ग्रहाशी माझे सबंध आहेत” असे म्हणत पुढच्या क्षणी आम्हाला त्याने पर ग्रहावरील लोकांशी चर्चा करून दाखवली.

आम्हाला आमच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. हे स्वप्न आहे असेच वाटत होते. केवढं मोठं जग त्याच्या लॅब मध्ये आहे हे आम्हाला समजले. इतक्यात एका कोपऱ्यात असलेल्या चमकणाऱ्या काचेच्या कपाटावर माझी नजर गेली.

“सर ते काय आहे ? ग्रीन लाईट वाल?” मी विचारले.

“ते ना ? हा तेच ते टाइम मशीन. जी तुमची इच्छा पूर्ण करेन” तो म्हणाला.

“व्हॉट?” चैतन्यने विचारले.

“का विश्वास नाही?” त्याने हसून सवाल केला.

“हम्म सर मला विश्वास नव्हता. पण इतकं सर्व पाहतोय तर आता 100% विश्वास आहे. आणि आम्ही पूर्ण तयारीत आलो आहे.” मी सांगितले.

खरं तर मी सूरज आणि राघव शास्त्री मध्ये झालेलं बोलणं बाकीच्या तिघांना माहिती नव्हत. आणि जे बोलणं झालं होतं ते खरं ठरणार असा विश्वास झाल्याने आता आतुरता वाढली होती.

“ओके चला तुमची इच्छा मी पूर्ण करतो. परंतु त्यापूर्वी तुमच्या अंगावर असलेले किमती वस्तू, दागिने, मोबाईल सर्व काढून बाहेर ठेवा. एन्ड डोन्ट वरी. इथे कोणी येत नाही.” शास्त्रीने सांगितले.

“अरे हा चोर तर नाय ना ?” आर्यन हळूच बोलला.

“जर माझ्यावर विश्वास नसेल तर जाऊ शकता. किंवा वस्तू घेऊन आत या. पण मशीन मध्ये आल्या नंतर तुमच्या वस्तू अपोआप गायब होतील नष्ट होतील.” शास्त्री म्हणाला.

“नो सर आम्ही ठेवतो.” मी विश्वास दाखवला.

असे म्हणत आम्ही सर्वांनी आमचे फोन, पाकीट, दागिने, गाडीच्या चाव्या सर्व काही बाहेर ठेवले. आणि मशीनच्या जवळ आलो. थोड्या वेळात शास्त्री वेगळंच काहीतरी घालून आमच्या समोर आला. त्याला असा पाहून आम्ही घाबरलो.

“हा हा हा तुम्ही सर्व कपडे काढा?” शास्त्री म्हणाला.

“सर आता कपडे तरी राहुद्या” सूरज लाजून म्हणाला.

“अरे मग जाताना घालणार काय ? तुमचा शरीर सोडून शरीरावर असणारी प्रत्येक निर्जीव गोष्ट गायब होणार” शास्त्री म्हणाला.

लाजत काजत आम्ही त्याचे बोलणे ऐकले आणि त्याने दिलेला विचित्र जॅकेट घालून आम्ही मशीन जवळ आलो. त्याने दरवाजा उघडला आणि आत मध्ये प्रवेश केला. त्याच्या पाठोपाठ आम्ही देखील आत शिरलो. एक लिफ्ट सारखी ती जागा होती. सर्वत्र वेगवेगळ्या लाईट्स, वायरींचा गुंथा, रेडिओ सिग्नलचे आवाज. यामुळे आम्ही घाबरून गेलो होतो. इतक्यात त्याने एका कोपऱ्यात जाऊन काहीसे आकडे दाबले. वेगळीच भाषा होती ती. आणि मशीन मध्ये आवाज यायला लागला. तो आवाज मशिन सुरू झाल्याचा होता. मशीन बाहेर मिट्ट काळोख दिसत होता. कुठे आहोत कळत नव्हतं. मनात भीती होती की परत घरी जाऊ की नाही. सोबत जी मूलं होती त्यांचे चेहरे काळजीने आणि भीतीने गंभीर झाले होते.

“सर हा आवाज कसला होत आहे” सुरजने विचारले.

“तुम्ही सांगितले तिथे जात आहोत” शास्त्री हसून म्हणाला.

“म्हणजे सर आपण निघालो पण?” मी म्हणालो

“येस… आपण टाइम ट्रॅव्हल करतोय” त्याने सांगितले.

“ओ माय गॉड… खरं का काय ?” धिरज म्हणाला.

“सर म्हणजे आपण आता कुठे आहोत नक्की? म्हणजे आपली मशीन लॅब मध्ये आहे की अजून कुठे?” चैतन्यने विचारले.

“आपली मशीन लॅबमधून कधीच निघाली. आता आपण सर्व जगातून दूर आहोत. आपण कुठंच नाहीत. सध्या तरी हे मशीनच आपलं जग” शास्त्री म्हणाला.

“सर आधीच फाटली.. अस काय बोलू नका.” सूरज म्हणाला.

इकडे सर्वांचे चेहरे चिंताग्रस्त झाले होते.

“दादा मी तर बोलतो नको… आपण घरीच जाऊ. हे खूप डेंजर आहे” यश म्हणायला लागला.

“एक मिनिटं तुम्ही किती उड्या मारल्या तरी या मशीनचा दरवाजा माझ्या परवानगी शिवाय उघडत नाही” शास्त्री आणखीन घाबरवू लागला.

“सर प्लिज मुलं घाबरतील. तुम्हाला सवय आहे आमच्यासाठी हे खूप अजब आहे” मी सांगितले.

“माझे इंस्टा रील टाकायची वेळ झाली संतो” सूरजने मुद्दामच विनोद केला.

बराचवेळ मशीन मधून आवाज येत होते. ते आवाज शब्दात न सांगणारे होते. इतक्यात त्याने स्क्रीन पाहिली.

“हम्म…. पोरानो पोचलो बरं आपण” शास्त्री म्हणाला.

“कुठे पोचवल म्हाताऱ्या” भेदरलेल्या आर्यनने रागाने विचारले.

“तुझ्यामुळे मशीनवर लोड आला. तुला मी रिटर्न नेतच नाय बघ आता” शास्त्री म्हणाला.

“नो सर सॉरी सॉरी… ” आर्यन बोलला.

काही वेळ आम्हाला हसण्याची संधी मिळाली.

“सूरज… कुठे नेऊ तुम्हाला ?” शास्त्रीने विचारले.

“सर जिकडे तुम्हाला न्यायला सांगितले त्या काळात” सूरज म्हणाला.

“हो आपण त्याच काळात आहोत. पण कोणत्या ठिकाणी जायचे आहे? आपली मशीन आता त्याच काळात आहे.” शास्त्री म्हणाला.

“नेमकं कोणत्या जमान्यात आहोत सांगू शकाल का ?” मी विचारले.

“उमम…. हा… आपण 1670 मध्ये आहोत” त्याने स्क्रीन वाचून सांगितले.

“ओहह तेरी… म्हणजे 350 वर्षे मागे” सूरज म्हणाला.

“जिथे तुम्ही आन म्हणाला तिथे आलो. तुम्ही म्हणाले असते की आमचा लहानपण दाखवा तर पटकन दाखवले असते. 2 मिनिटात पोहोचलो असतो. त्यात 350 वर्षे मागे यायचे म्हणजे वेळ जाणार. शिवाय 500 वर्षा पेक्षा मागे मशीन येत नाही” शास्त्री म्हणाला.

“सर मला माझं फ्युचर बघायचं होत” चैतन्य म्हणाला.

“नेलं असत. 50 वर्षे पुढे आणि 500 वर्षे मागे चालते ही मशिन. बट सूरज म्हणाला तिथे मी आलो घेऊन” शास्त्रीने सांगितले.

“काय दादा पुढे समजले असते ना कसले कसले गेम्स खेळतात. आणि आपण कसे आहोत. आपली सिटी कशी आहे” आर्यन सुरजला म्हणू लागला.

“अरे आपलं फ्युचर आपल्याला नंतर पण दिसेल. पण ज्यांच्या मुळे आपण आज आहोत आणि उद्या फ्युचर बघणार आहोत. त्यांचा काळ कुठे बघायला मिळणार आहे आपल्याला पुढे?” मी म्हणालो.

“दादा नक्की काय आहे बाहेर?” धिरजने विचारले.

“तुम्हाला समजलं नाही का ? 1670 म्हणजे शिवाजी महाराजांचा काळ” मी सांगितले.

“काय ??? म्हणजे शिवाजी महाराज असतील इथे ? खरोखरचे?” चैतन्यने तोंड वासून विचारले.

“हो मग” मी म्हणालो.

“ते ठीक पण सूरज नेमकं लॅन्ड कुठे करू मशीनला ? हे मशीन कोणाला दिसलं तर प्रॉब्लेम होणार” शास्त्रीने चिंता व्यक्त केली.

शास्त्रीने मशीनमध्ये पाहून नेमकं कुठे आहोत याबाबत सांगितले. पण सोईस्कर आणि कुणाला न कळणारी जागा मिळणे अवघड होते. शेवटी शास्त्रीने मशीनला एका ठिकाणी उतरवले आणि एलबर्टने पुन्हा स्क्रीनवरून पाहणी केली. आजूबाजूला कोणी नसल्याची त्याने खात्री केली.

“सर नक्की काय प्रॉब्लेम आता? आम्हाला लवकर पाहायचं आहे सर्व” मी आतुरता दाखवली.

“हे बघा तुम्हाला इथे प्रॉब्लेम येतील. कारण तुम्ही साधारण लोक नाहीत. तुम्ही 2022 मधून टाइम ट्रॅव्हल करून आलेले आहात. तेव्हा तुमची जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्हाला मला परत न्यायचं आहे.” शास्त्री म्हणाला.

शास्त्रीने मशिनला एका खड्ड्यात उतरवले. आणि काही वेळाने ग्रीन बटन प्रेस केले. बटन दाबताच मशिन बाहेर दिसणारा काळोख दूर झाला. आणि शास्त्रीने पुन्हा दार खोलले.

“तुम्ही इथेच थांबा. जोवर मी येत नाही कोणी हलणार नाही इथून” शास्त्री तिथून निघून गेला.

शास्त्री बराचवेळ झाला तरी परतत नव्हता. त्यामुळे आमच्या मनात वेगवेगळे विचार येत होते.

“काय सिन आहे सूरज दादा… हा माणूस कुठं गेला. नक्की आलोय शिवाजी महाराजांच्या काळात की चू** बनवतोय आपल्याला” आर्यन म्हणाला.

“कोण म्हणलं इथे काय आता?” आतमध्ये येत शास्त्रीने विचारले.

“सर तुम्ही खूप वेळ बाहेर होतात म्हणून पोर वैतागली असतील. जाउद्यात” सूरज म्हणाला.

“सर हे काय आणलंत ?” मी विचारले.

शास्त्रीने एका कापडात गुंडाळून काहीतरी आणले होते. त्यात कपडे होती त्या काळात घातली जाणारी. शिवाय काही चांदीचे दागिने, माळा, पटके असे साहित्य त्यात होते.

“ते जॅकेट काढा आणि पटापट ही कपडे घाला” शास्त्रीने सांगितले.

आम्ही पटापट सगळी कपडे घातली. आम्ही कसे दिसतो हे आम्हाला माहीत नव्हते. आम्ही फक्त एकमेकांना बघत होतो. पण स्वतः कसे दिसतो ही आतुरता होती. डोक्यावर पटके, अंगावर सदरा, पायजमा, हातात चांदीचं सलकडं, पायात तांब्याचे तोडे, आणि चामड्याच्या वहाणा असा आमचा पेहराव झाला.

“सर हे कुठून आणलं तुम्ही.” धिरजने विचारले.

“हे मशीन इथल्या बाजारपेठ पासून थोडंफार दूरच्या अंतरावर घनदाट झाडीत उतरवले आहे. मग बाजारात जाऊन तिथून एका दुकानातून चोरी करून आणले.” शास्त्री म्हणाला.

“सर आपण आलोय कुठे ? आणि तुम्ही चोरीने सुरुवात ?” मी विचारले.

“आपला नाईलाज आहे. त्याशिवाय मार्ग नाही. आपल्याकडे येथील चलन नाही” शास्त्री म्हणाला.

“चलन काय असत सूरज दा?” चैतन्यने विचारले.

“करन्सी रे” सूरज म्हणाला.

“बर आता आपण बाहेर पडुयात. आणि या खड्ड्यावर काहीतरी टाकून लपवूयात. सकाळ झाली की आपण कुठे तरी जाऊन राजगडावर जाण्याचा प्लॅन करू.” शास्त्री म्हणाला.

एक एक करून मशीन मधून सर्व जण बाहेर पडले. खड्ड्यातून बाहेर पडलो आणि एक नजर फिरवली. ही नजर 2022 मधून 1670 वर होती. आज माझ्या नजरेत मी 1670 पाहत होतो. अंधारी रात्र असल्याने फारस काही दिसत नव्हतं पण जाणवत होतं. ते म्हणजे कडाक्याची थंडी. सगळे कुडकुडत होते. पण आता शरीरात भिननारा प्रत्येक श्वास हा शिवकालीन होता. यामुळे थंडीचा विसर पडत होता. शिवाजी महाराजांच्या घोषणा देऊ वाटत होत्या. पण शास्त्रीने आम्हाला असे काही न करण्यास व अतिउत्साहीपणा न करण्यास सांगितले होते.

“अरे दादा आपण निघालो तेव्हा दुपार झाली होती. आपल्याला 1 तास गेला. म्हणजे आपल्याकडे आता दुपारचा एक वाजला असेल. पण इकडे तर पहाट आहे.” चैतन्य पुन्हा केल्क्युलेशन करू लागला.

“सूरज दादा माझा जेवायचा टाइम झालाय” आर्यनने सांगितले.

“थोडा वेळ थांब आर्यन बाबा तू” सूरज हसून म्हणाला.

“सर आता पुढे काय ? महाराजांना कसं पाहणार भेटणार ?” मी आतुरतेने विचारू लागलो.

“काही वेळातच सकाळ होईल. माझा नाईलाज होता. म्हणून मी अंधारात मशीन लॅन्ड केलं. आणि तुमच्या जेवणाच खाण्याचं बघुयात कुठे काय होत का ? आणि नाहीच काय झालं तर आपण निघू परत.” शास्त्री म्हणाला.

“सर महाराजांना डोळे भरून पाहिल्या शिवाय कसं बर कोण निघेल? आणि 2 दिवस बाहेर आहोत हे सांगून आलोय ना आम्ही” मी सांगितले.

“ठीक आहे. पण बोलताना भाषा नीट वापरा. नायतर काही बोलू नका. बाकीचे कसे बोलतात तसे बोला.” शास्त्री म्हणाला.

“मराठीच बोलायचं ना पण ?” यशने विचारले.

“मराठीच बोलायचं पण भाषा शैली वेगळी. शुद्ध बोलू नका. त्या काळात असल्या सारखे बोला.” शास्त्री म्हणाले.

“म्हणजे कसं बोलायचं आम्हाला नाय जमणार सर” धिरज म्हणाला.

“अरे तू पावनखिंड बघितला ना ?” मी धिरजला विचारले.

“हो बघितला ना दादा. त्यात बोलतात तसं ना?” त्याने विचारले.

काहीवेळ बसून गप्पा मारल्यानंतर हळूहळू उजेड पडू लागला. दाही दिशा प्रकाशमय होऊ लागल्या. पक्षांचा किलबिलाट, वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज कानी पडू लागले. आणि तितक्यात 1670 च्या सूर्य नारायनाणे डोके वर केले आणि पहिले कवडसे आमच्या अंगावर पडले. त्याच प्रकाशात आम्ही दूरवर दिसणाऱ्या राजगडावर नजर मारली. मनात खूप आनंद होता. कधीही न पूर्ण होणार स्वप्न सत्यात उतरणार यामुळे आम्ही सर्व खूपच भारावून गेलो होतो. आणि आम्ही राजगडाच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली.

पायाला चावणार्या आणि सवय नसल्याने बोचणार्या चामड्याच्या चपला घालून चालताना सर्वच जण आतुरतेने एक एक पाऊल टाकत होते. महाराजांच्या काळातील माती आणि जमिनीवर आम्ही चालत असल्याने जवळपास जगातली सारी सुख प्राप्त झाल्याचं समाधान होत. पण आता पुढे काय होणार ? हे अजूनही आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही गावाच्या बाजारपेठे कडे चालत निघालो. जेणेकरून काही खाण्याचा बंदोबस्त व्हावा. इतक्यात आम्हाला समोर काही तरी दिसले.

आमच्या सारखाच पेहराव केलेली एक रांगडी व्यक्ती आमच्या समोर अचानक उभी राहिली. त्याच्या पिळदार मिशा आणि रुबाबदार चेहरा पाहून आम्ही अचंबित झालो. आम्ही सर्वे त्याच्या समोर उभे राहिलो. आणि तो आम्हा सर्वांकडे रोखून नजर फिरवत होता. आता पुढे काय होणार ? याची चिंता आम्हाला लागू लागली.

1670 मध्ये भेटलेली ती पहिली व्यक्ती कोण होती ? आणि पुढे काय घडणार ? यासाठी वाचा कथेचा दुसरा भाग.

क्रमशः ……

( Shivaji Maharaj Story )

Note : सदर कथा काल्पनिक असून ती तुम्हाला कशी वाटली ? याबाबत मला नक्की कमेंट द्या. कारण कथा तुम्ही वाचली आहे हे सांगितल्या शिवाय मला समजणार नाही. ती कथा तुम्हाला कशी वाटत आहे हे मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. तुमच्या कमेंट्स नुसार पुढचा भाग आणखीन रंगतदार व्हायला मदत मिळेल. जर मी मोठ्या कथा लिहू शकतो तर छोटीशी कमेंट लिहायला तुम्हाला कितीसा वेळ जातोय ? तुमची प्रतिक्रिया लाख मोलाची. धन्यवाद !!!

About Author

One thought on "१६७० – एक रहस्यमय प्रवास; भाग पहिला"

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *