लेख

उधारीच्या दुनियेतले साम्राज्य

उधार मागणे म्हणजे भीक मागणेच!

मिरची झोंबावी असं हे वाक्य आहे. होय पण हेच खरे आहे. उधार मागणे म्हणजे थोडक्यात तात्पुरत्या स्वरूपात मागितलेली भीकच. तात्पुरत्या का? तर आपण घेतलेले पैसे हे परत करणार असतो म्हणून. तात्पुरती पडलेली नड भागविण्यासाठी कुणाकडून तरी आपण कधी ना कधी पैसे घेत असतो. उधार घेणे हे काही गैर आहे हे असे अजिबात नाही. कारण प्रत्येकालाच केव्हा ना केव्हा उधार घेण्याची गरज पडते. गडेगंज पैशावाल्या माणसालाही कोणत्यातरी गोष्टी साठी हात पसरावेच लागतात. पण जर काहींना ही उधारी मागण्याची सवय जडली असेल तर ती मात्र एक घाणेरडी सवय. आणि त्यात घेतलेले पैसे वेळेवर न देणे आणि समजा न देताच बुडवले तर? या सगळ्या उधारीच्या दुनियेची ही आज आपण गोष्ट करणार आहोत. अवश्य वाचा शेवट पर्यंत.

पूर्वीच्या काळी जगण्यासाठी माणूस स्वतः मेहनत करून स्वतःचे अन्न स्वतः मिळवत होता. मूलभूत गरजा भागविण्यासाठी पुढे प्रत्येकाने काम वाटून घेतले आणि एकमेकांना वस्तूंची आदान प्रदान केली. उदा.शेतकरी शेती करून पिकवलेले अन्नधान्य घेऊन शिंप्याकडे जाई आणि त्या बदल्यात कपडे घेई. शिंप्याला देखील कपड्याच्या बदल्यात अन्नधान्य मिळे. परंतु वस्तूंची किंमत कमी जास्त असल्याने पुढे चलन अस्तित्वात आले आणि इथूनच आले पैशाला महत्त्व.

पुढील अनेक वर्षे पैशाला फारसे मोल नव्हते. मात्र अलिकडल्या काळात पैशाला माणसापेक्षा जास्त किंमत आली आहे. श्रीमंत होण्यासाठी, सर्व सुविधांचा उपभोग घेण्यासाठी पैसा असणे महत्त्वाचे आहे हा समज आता रूढ झाला आहे. किंबहुना तो खराही आहे. ज्याच्याजवळ जितका पैसा तशी त्याची लाइफस्टाइल. यावरून श्रीमंत आणि गरीब असे दोन वर्ग तयार झाले. आज आपण स्वतःला ने मिडल क्लास म्हणवतो त्यातही दोन प्रकार मोडतात. एक म्हणजे पैसा बाळगून असलेला आणि दुसरा कर्जबाजारी झालेला. आता याच दोघांमधील जो दुवा आहे त्याबद्दल थोडं बारीक समजून घेऊयात.

ज्यांच्याकडे भरपूर पैसे असतात असे लोक कधीही उधारी मागत नाहीत. पण काहीवेळेस चुकून समजा सोबत पैसे घ्यायला विसरले किंवा आजच्या ऑनलाइन युगात कोड स्कॅन करण्यासाठी काही अडथळा येत असेल तर अशा लोकांना नाईलाजाने उधारी घ्यावी लागते. पण अशा लोकांना डोळे झाकून उधारी देतात कारण लागलीच परत मिळण्याची खात्री असते. पण त्याचं काय ज्यांच्याकडे पैसाच नाही? परिस्थितीने जर डोके वर काढू दिले नसेल तर अशा व्यक्तीला उधारी मागण्याचा नाईलाज असतो. अर्थात सुरुवातीलाच आपण म्हटलो आहे की उधारी मागणे गैर नाही. मग नेमकं चुकीचं काय आहे? तर जाणून बुजून परिस्थिती स्वतः आपणहून खराब करणे आणि उधारी मागण्याची सवय लावून घेणे. याच प्रकारातल्या लोकांबद्दल थोडं माहीत करून घेणार आहोत.

आजच्या पुरता विचार करून जगणारे उधारीच्या मार्गावरून अजिबात हटत नाहीत. त्यांना या गोष्टीची कसलीही शरम नसते. किंवा त्यांना या गोष्टीची सवय लागलेली असते. याच जगण्याला ते जीवन मानतात. ते एक ना अनेक उधाऱ्या करून ठेवतात. शिवाय केलेल्या काही उधाऱ्या बुडवूनही टाकतात. यात काही हितसंबंध खराब तर करून घेतातच शिवाय नावालाही बट्टा लावून घेत नशिबाला दोष देतात. आपण जे करतोय ते चुकीचं आहे असे त्यांना कधीच वाटत नाही. परिस्थिती भाग पाडते अशी मनाची समजूत काढून ते आला दिवस लोटून देतात.

घेतलेले पैसे फेडण्यास असमर्थ ठरलेले काही लोक तर पहिले कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज उचलतात. कर्ज कसे फेडू शकतो? याचे यांना काहीच माहीत नसते तात्पुरती नड भागावी हा एवढाच तात्पुरता विचार करून ते आणखीन एक डोंगर डोक्यावर चढवून ठेवतात. आणि मग होतं काय परिस्थिती आणखीन बिकट होत जाते. मग एक दिवस गोचिडाकडून गैरव्यवहारी कर्ज उचलावे लागते. गोचीड म्हणजे काय? तर अव्वाच्या सव्वा व्याजाने पैसे देणारे मंडळी. लाखभर रुपयांची उचल केल्यानंतर 5-10% प्रतिमाह व्याजदराने हे पैसे देतात. त्याकरिता समोरच्याची किंमती वस्तू ठेऊन घेतात. कर्ज घेणारा एक रक्कमी कर्ज फेडू शकत नाही. बऱ्याचदा तर व्याजाचे पैसे फेडणेही त्याला अशक्य होऊन बसते. पुढे जाऊन त्या व्यक्तीकडून चक्रवाढ व्याजाच्या नावाखाली प्रतिदिन व्याज लावले जाते. परतावा न केल्यास वस्तू ठेऊन घेणे, दमदाटी करणे, वेळ पडल्यास मारहाण करणे अशाही गोष्टी घडतात. बिचाऱ्याला पैसे फेडता न आल्याने त्याची वस्तूही हातातून निघून जाते. थोडक्यात पूर्वी जे जुलुमी सावकारी चालायची ती अजूनही काही ठिकाणी संपलेली नाही. नियमबाह्य पद्धतीने कसलेही गणिती ज्ञान नसलेले व्याजदर लावून फक्त लुटपाट केली जाते. म्हणून व्हायचं ते होऊद्यात पण अशा गोचिडाच्या तावडीत फसू नका. हळूहळू करून तुमचं रक्त पिणे हेच काम त्यांना ठाऊक असते.

अतिमहत्त्वाच्या विषयाकडे आपण आता आलेलो आहोत. आपल्याकडे कुटुंब पद्धत आहे. कुटुंब म्हणजे काय तर आई वडील भाऊ बहीण बायका मुलं. एका पूरुषाच्या खांद्यावर त्याचं कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी असते. आजच्या युगात तर महिलाही ती जबाबदारी उचलतात. आता या कुटुंब पद्धतीने जगत असताना प्रत्येक जण आपल्या कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी झटत असतो. भवितव्यासाठी, मुला, मुलींचे शिक्षण लग्न, दवाखाना, हौसमौज यासाठी पैसे उभे करीत असतो. म्हणजे थोडक्यात काय तर तो कुटुंबाचे आर्थिक नियोजन करीत असतो. यात जर त्याच्याकडे एखाद्याने उधारी मागितली तर तो शक्य असेल तर देतोही. पण जर त्याला ती वेळेवर परत मिळाली नाही तर मात्र याचे नुकसान म्हणून त्याच्या कुटुंबाला ते सोसावे लागते. त्यामुळेच सर्वांचेच कुटुंब आहे. जो तो त्याचे नियोजन करीत असतो. तुमच्या उधारीमुळे नकळत तुम्ही दुसऱ्याच्या कुटुंबाचेही आर्थिक गणित बिघडवून टाकता.

याउलट काय करता येईल? तर सर्वप्रथम उधारी घेण्याची सवय सोडायला हवी. आधी घेतलेली उधारी परत करावी मग स्वतःची हौसमौज बघावी. कारण तुम्हाला पैसे देणारा लवकर परत मिळण्याची आस लावून असता. तुम्ही उधारी रखडवता म्हणजे उधार घेणाऱ्याला अंधारात ठेवता. तुम्हाला त्याने वेळेवर केलेल्या मदतीची जाण नसते. तुम्हाला तुमच्या निरर्थक गोष्टींवरचा खर्च बंद करावा लागेल. परिस्थिती बदले पर्यंत दिखाव्याच्या मागे न जाता अंथरून आहे तितकेच पाय पसरवावे. आणि दुसरीकडे चार पैसे कसे जास्त कमवता येतील यासाठी मेहनत करावी. इकडून तिकडून घेतलेले पैसे व्यवस्थित नियोजन करून परत करावे. ज्यादिवशी संपूर्ण देणी संपतील तेव्हा तुम्ही उधारी घेणारे नाही तर उधारी देणारे व्यक्ती बनला आहात याची तुम्हाला जाणीव होईल.

आता इथे कुणालाही उधार देण्याची चूक करू नका. माणुसकी म्हणून तुम्ही दुसऱ्याला उधार देता. पण तुमचेच पैसे तुम्हाला भिकाऱ्यासारखे मागावे लागतात. तुम्ही कुणाची उधारी लांबवली असेल तर तुम्हाला नक्कीच ते माहीत असेल. जो व्यक्ती खूप उधाऱ्या करतो, बुडवतो, रखडवतो. पैसे न कमवता कशावरही उडवतो अशा व्यक्तीला उधारी बिलकुल देऊ नका. परिस्थिती खूपच बेताची असेल, खूपच अडचण असेल, परत मिळण्याची खात्री असेल आणि तुमच्याकडेही अतिरिक्त असतील तर माणुसकी म्हणून द्यायला हरकत नाही. पण उधारीची सवय असलेल्या उधारखोराला पैसे देण्याची चूक अजिबात करू नका. तुम्ही कष्टाने कमवता, तुमचे कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडू शकते. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी स्वतःला अडकवून घेऊ नका. हाताशी आलेला पैसा आजच्या पुरता विचार करून उडवू नका तो उद्यासाठी जपून ठेवा. कुणासमोर हात पसरायची वेळ येणार नाही निदान इतके तरी पैसे जवळ ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहा.

रमेश आणि सुरेश दोन मित्रांपैकी एका मित्राला रमेशला ४० हजार पगार आहे. आणि दुसऱ्या मित्राला सुरेशला त्याच्या निम्माच. पण गंमत अशी आहे की ४० हजार पगार असूनही तो महिन्याच्या शेवटी हजार रुपयांची उधारी हमखास बनवतोच. का बरं असे? वीस हजार पगार असणारा हजार रुपये उधारी कसे देऊ शकतो?

ज्याच्याकडे वीस हजार पगार आहे त्या सुरेशला उधारी मागणे पटत नाही. कुणापुढे हात पसरावे लागतील अशी वेळ येऊ नये याची तजवीज त्याने केलेली असते. दरमहा घरखर्चाला घरी दहा हजार रुपये देऊन त्याच्याकडे दहा हजार उरलेले असत. त्यातलेही तो पाच हजार स्वतःसाठी वापरी. त्यात मग त्याचे काही मजाहजा, खरेदी सगळं आलंच. आणि उरलेले पाच हजार तो पद्धतशीरपणे सेविंगला सोडत. रमेशचं मात्र तसं नाही. रमेशला पगार चाळीस हजार असला तरी महिन्याला त्याच्या सुट्ट्या होत असत. त्यामुळे तिथेच पाच हजार त्याचे कापले जाई. ज्या दिवशी सुट्ट्या होई तेव्हा रमेश कुठेतरी मजाहजा करण्यासाठी गेलेला असे. त्यामुळे त्याचे तिथे चार पाच हजार आरामात खर्च होई. पुढे रमेशची महागडी बाईक जीचा वापर फारसा होत नाही. कारण रमेश तर रेल्वेने प्रवास करी. सुट्टीच्याच दिवशी काय वापर होईल तेवढाच. बाकी ती बाईक फक्त हप्ते भरण्यासाठीच त्याने विकत घेतली समजा. आणखीन एक ईएमआय म्हणजे रमेशच्या खिशातल्या टॉप मॉडेल आयफोनचा. थोडी श्रीमंती दिसावी म्हणून रमेशने तोही हप्ता बांधलाच होता. सुरेश प्रमाणे घरात खरखर्चाला तोही दहा हजार देतच होता. आता त्याचं गणित कसं बिघडले बघा. सुट्ट्यांमुळे त्याच्या हातात येई 35 हजार. त्यातले हप्त्यांना गेले 15 हजार, घरात दिले 10 हजार. उरलेले 10 हजार रमेश असेच मजेहजेसाठी खर्च करी. मग ते स्टारबक्समध्ये जाऊन कोफी पिऊ, की बर्गर किंग मध्ये जाऊन पिझा चावू. का विकेंडला मित्रांमध्ये दोन दोन बडवायजर ढकलो. सोबत चकण्याला कबाब, तंदुरी, लॉलीपॉप. मज्जोनी लाईफ. अशी लाइफस्टाइल रमेश जगत असेल तर शेवटच्या विकेंडनंतर रमेश मोकळा होऊन जात. मग त्याला गरज पडे सुरेशची. मित्र पैशावाला आहे, शिवाय पगार झाला की आपल्याला फिक्स रिटर्न करणार यामुळे उधारी द्यायला काही चिंता नव्हती.

चिंता करावी तर रमेशनेच करावी. श्रीमंत दिसण्यावर व लाइफस्टाइल जगण्यावर तो जो काही खर्च करतोय तो त्याचा बेजबाबदारपणा आहे. पुढे जाऊन रमेश आणि सुरेश दोघांचीही नोकरी जाते. 5-5 हजार बाजूला काढून सुरेशकडे लाखभर रुपये जमलेले असतात. श्रीमंत लाइफस्टाइल साठी घालवलेल्या पैशामुळे मात्र रमेशच्या खात्यात फक्त चाळीस हजारच असतात. ईएमआय भरून घेतलेला आयफोन आता जुना झालेला असतो. अर्धी किंमतही द्यायला कुणी तयार नसतो. घेतलेली स्पोर्ट्स बाईक एवढं पेट्रोल पिते की रमेशला पायी पायी जाणं योग्य वाटायला लागतं. नवी नोकरी मिळेपर्यंत चाळीस हजारात कसे गुजराण करावे या विचारात रमेशला वेड लागायची पाळी येते. याउलट सुरेशचा कसलाही मोठा खर्च नसतो. शिवाय लाखभर रुपयात तो वर्षही आरामात काढू शकतो.

सांगायचं तात्पर्य हेच की आजचा विचार न करता उद्यासाठीची तजवीज करून ठेवा. वेळ काळ सांगून येत नाही. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. विचारांना मोठे करा. जीवनात चढ आणि उतार या दोन्ही गोष्टी असतातच. सर्व गोष्टींची तयारी ठेवा. परिस्थिती बदलत नाही म्हणून नशिबाला दोष देऊन रडत बसू नका. ती बदलण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करा. सौ बात की एक बात, तुमचे कर्म चांगले ठेवा. कारण तुम्ही आज जे काही करणार आहात त्याचेच परिणाम तुम्हाला उद्या दिसणार आहेत. धन्यवाद !!!

विचार पटले तर आचरणात आणून बदल बघा, नाहीतर आहे तसेच उधारी मागून रडत जगा.

टीप : या लेखातून आजच्या सत्य परिस्थितीचे विश्लेषण करण्यात आले आहे. सत्य हे कडवट असल्यामुळे अनेकांना ह्या लेखामुळे कारल्याची चव चाखायला मिळाली असेल. म्हणजेच बोचलं असेल. हा लेख परिस्थितीमुळे हतबल होऊन उधारी घेणाऱ्यांसाठी नसून उधाऱ्या घेऊन स्वतःहूनच आपली परिस्थिती हतबल बनवणाऱ्यांचे डोळे उघडण्यासाठी होता. बाकी तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *