कल्याण : कल्याण मध्ये माणुसकीची शाळा सुरु झाली असून शाहीर संभाजी भगत यांनी हि माणुसकीची शाळा घेतली. कल्याण पश्चिमेतील उंबर्डे येथील सम्राट अशोक नगर नालंदा बुद्ध विहार येथे राजू काऊतकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माणुसकीची शाळा ही संकल्पना शाहिरी जलसाचे निर्माते लोकशाहीर संभाजी भगत यांची असून त्यांच्या हस्तेच या माणूसकीच्या शाळेचे लोकार्पण करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक माणुसकिचे दुत यावेळी उपस्थित होते.
लोकशाहीर संभाजी भगत यांनी माणुसकीची शाळा या संकल्पनेवर बोलत असतांना सांगितले कि, प्रत्येक समाजामध्ये माणसातील माणूसपण कमी होत चालले आहे. समाजात वावरताना समाजामध्ये फूट पडलेली जाणवत आहे. जात धर्म पंथ याचे याचे जोडे बाहेर काढून माणसांनी माणसातील माणुसकी जतन केली पाहिजे. या देशात एक मिनिटांत सोळा लोक आत्महत्या करीत आहेत. असे एका तज्ञानी हे मत व्यक केले आहे. कारण माणसावर येणारे वेगवेगळ्या प्रकारच्या ताण तणाव निर्माण होऊन या घटना घडत आहेत. म्हणून प्रत्येक माणसांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी विचाराची देवाणघेवाण करणे गरजेचे आहे.
या देशातील आर्थिक घडी विस्कळीत झाल्यामुळे माणसांना बारा ते सोळा तास काम करण्याची वेळ आली असून यामुळे माणसं डिप्रेशनमध्ये जात आहेत. माणुसकीच्या शाळेमध्ये फक्त एका विशिष्ट जातीपूर्ती मर्यादित नसून सर्व जाती धर्माच्या लोकांपर्यंत ही माणुसकीची शाळा पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. यामध्ये नवतरुण महिला आणि आबालवृद्ध यांची देखील शाळा सुरू केली असल्याचे भगत यांनी सांगितले.यावेळी शाहीर संभाजी भगत यांच्यासह सेवानिवृत्त शिक्षक आनंद नागरे, सामाजिक कार्यकर्ते मारुती शेरकर, साक्षी डोळस, अनिता कदम, मीरा वासनिक, वर्षा काळे आदींनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. माणुसकी शाळेचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार राजू काऊतकर, माधुरी सपकाळे, आम्रपाली भालेराव, कविता काऊतकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.
-कुणाल म्हात्रे