कल्याण : कल्याण डोंबिवली मनपा रिंगरूट प्रकल्पात ८४५ नागरिक बेघर होत असल्याने मनपा विरोधात मागील दहा दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. बाधित नागरिकांचे हे उपोषण सुरू असून दहा दिवसांपासून मनपा अधिकाऱ्यांनी या उपोषण कर्त्यांकडे ढुंकूनही पाहिले नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे उपोषण कर्त्यांनी मनपाचा निषेध करत मुंडन केले आहे. तेराव्या दिवसा पर्यंत मनपा प्रशासनाने निर्णय घेतला नाही तर महिला देखील कल्याण डोंबिवली मनपा कार्यालयासमोर मुंडन करणार असल्याचा इशारा जालिंदर बर्वे आणि आंदोलन कर्त्या महिलांनी दिला आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील टिटवाळा ते दुर्गाडी या रिंगरुंटमध्ये बाधीत होणाऱ्या ८४५ रहिवाशांचे पुर्नवसन करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विस्थापित कुटूंबियांनी मंत्रालयात भेट घेऊन त्याचे पुनर्वसन करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व पुनवर्सन समितीचे अध्यक्ष सपना देवनपल्ली कोळी यांना दिले आहेत. पुनर्वसनाच्या मागणीसाठी महानगरपालिकेला अनेक पत्र व्यवहार करुन देखिल महापालिका आयुक्त व संबंधीत अधिकारी पुर्नवसन करण्यासाठी कोणतीही हालचाल करत नसल्याने प्रशासनाकडे अनेक वर्षापासून रहिवाशी संस्थेच्या माध्यमातून मोर्चे, अंदोलन, पत्र व्यवहार केला आहे.
पुनर्वसनाच्या मागणीसाठी पब्लिकन पक्ष व अटाळी आंबिवली सामाजिक संस्थेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष जालिंदर बर्वे, सचिव संदीप घाडगे व महिला पदाधिकारी व राहिवाश्यानी सोमवार पासून पालिकेच्या या प्रभाग क्षेत्र वडवली कार्यालया समोर साखळी उपोषण सुरू केले आहे. टिटवाळा – अटाळी -आंबिवली या विभागातील रिंगरुटमध्ये बाधीत होणाऱ्या ८४५ कुटूंबियांचे पुर्नवसन बी.एस.युपी या योजनेतुन करण्यात यावे. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने १९९६चे पुर्नवसन पात्र धोरणात बदल करुन ते २०१६ पर्यंत करण्यात यावे. जो पर्यंत पुर्नवसन होत नाही तो पर्यंत तोडक कारवाई करु नये. रिंगरुट मध्ये बाधीत होणाऱ्या कुटुंबियांच्या पुर्नवसनाच्या प्रश्नावर तोडगा निघत नाही, तो पर्यंत रिंगरुट चे काम बंद करण्यात यावे आदी प्रमुख मागण्या उपोषणकर्त्यांनी यावेळी केल्या असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरु राहणार असल्याचे उपोषणकर्त्या सर्व रहिवाशांनी सांगितले आहे.
-रोशन उबाळे
जनहितार्थ असलेल्या जागा संपादित करतांना बेघर होणाऱ्या रहिवाशांना पुनर्वसनासाठी विलंब का ?