डोंबिवली (Dombivli Crime) : शहरातील मानपाडा पोलिसांच्या हद्दीत असलेल्या शिवम हॉटेल जवळील मैदानात अमली पदार्थ विकण्यासाठी एक इसम येणार असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. यानंतर तात्काळ मानपाडा पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे यांनी पोलिसांसह सापळा रचून आनंद शंकर देवकर या 32 वर्षीय इसमाला 20 किलो 300 ग्राम गांजाच्या दोन गोण्यासह एनडीपीएस एक्ट अंतर्गत अटक करून पुढील तपास सुरू केला.
पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या गांजाच्या गोणी धुळे जिल्ह्यातील शिरपूर या आदिवासी अति दुर्गम भागातून आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मानपाडा पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे यांचे पथक थेट शिरपूर येथील अतिदुर्गम भागात पोहोचले आणि त्यांनी रेमन डुल्या पावरा, संदीप छोटू पावरा या दोघांना अटक करून डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात आणले. हा गांजा डोंबिवलीतील कॉलेज परिसरामध्ये विद्यार्थ्यांसाठी दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघड केला आहे. अशा प्रकारचे कोणतेही गांजा विकणारी टोळी आढळल्यास ठाणे नियंत्रण कक्ष किंवा कल्याण नियंत्रण कक्ष येथे संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कॉलेजात शिकणारी तरुण पिढी गांजाच्या आहारी गेल्याने गांजाची मोठी मागणी शहरी भागात वाढली आहे. यामुळे अतिदुर्गम भागात गांजाची लागवड करून तो माल शहरी भागात आणला जातो. शहरी भागात विविध ठिकाणी गांजा विक्रीचे छुपे अड्डे बनवून त्याची विक्री केली जाते. अशा प्रकारची विक्री कोठे होते याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-संतोष दिवाडकर
Three arrested for supplying cannabis to college students in Dombivali