होम

Kalyan मध्ये Dengue मुळे एकाचा मृत्यू

Dengue in kalyan: शहरात मागील काही दिवसांपासून डेंगूने डोके वर काढले असून कल्याण पूर्वेत एका तरुणाचा डेंगूमुळे मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. विलास म्हात्रे Vilas Mhatre (३१) असे या मृत तरुणाचे नाव असून त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात दोन दिवसांपासून उपचार सुरू होते. दरम्यान गुरुवारी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. डेंगूच्या वाढत्या फैलावा संदर्भात मनसेने दोन दिवसांपूर्वीच महापालिका आयुक्तांची भेट घेतली होती. आता तरुणाच्या मृत्यूनंतर मनसेने अधिक संताप व्यक्त केला आहे.

डेंग्यू, मलेरियाच्या संसर्गामुळे नागरिकांचे आरोग्य सध्या धोक्यात आले असल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिकेचे ड्रेनेज बाबतीत व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे अनेक ठिकाणी सांडपाणी साठत आहे. यामुळे काही ठिकाणी पाण्याची डबकी तयार होतात. अशाच साठलेल्या पाण्यातून डेंगूच्या डासांचा प्रादुर्भाव अधिक होतो. त्यामुळे महापालिकेने काटेकोरपणे नालेसफाई करायला हवी अशी मागणीही मनसेने केली होती. या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत धूर व कीटकनाशक फवारणी करायला हवी, तसेच घरोघरी डेंग्यू प्रतिबंधक जनजागृती मोहीम राबवावी अशा संदर्भाचे निवेदन मनसेने महापालिका आयुक्तांना नुकतेच दिले आहे.

नागरिकांनी घ्यावी ही काळजी

डेंग्यूचे डास हे साचलेल्या पाण्यातूनच उत्पन्न होतात. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा. पाण्याने भरलेल्या कुंड्या, टायर मध्ये साठलेले पाणी, झाडा झुडपांजवळ साठलेले डबके अशा ठिकाणी डेंगूचे डास मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होतात. त्यामुळे नागरिकांनी अशा पध्दतीने पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. घरात डासांचा शिरकाव टाळण्यासाठी संध्याकाळी खिडक्या, दारे शक्यतो लावून घ्याव्यात. डासांपासून बचाव करणाऱ्या संसाधनांचा वापर करावा. डासांचे अधिक प्रमाण असल्यास मच्छरदाणीचा वापर अवश्य करावा.

डेंगूची लक्षणे काय आहेत ?

अचानक ताप येणे, तीव्र डोकेदुखी, अंगदुखी आणि सांधेदुखी, थकवा, काहींना मळमळ आणि उलट्या, काहींच्या त्वचेवर पुरळ येणे अशी लक्षणे सुरुवातीला आढळून येतात. सौम्य डेंग्यूमध्ये, ताप ६-७ दिवसांनी कमी होतो. गंभीर प्रकरणांमध्ये पुनर्प्राप्तीस २-३ आठवडे लागू शकतात.

“पावसाळ्यात डेंग्यूची लक्षणे ओळखणे महत्वाचे आहे. लक्षणे दिसल्यास सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळ वाया घालवू नये. त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. रक्त व सर्व तपासण्या करून घ्याव्यात. डेंग्यूची लागण झाल्यावर योग्य उपचार आणि विश्रांती घेणे आवश्यक आहे.”

डॉ.प्रमोद बैरागी-वैष्णव, वरिष्ठ चिकित्सक

“डेंगूमुळे मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी झालो होतो. नुकतेच आम्ही महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. मात्र यांच्याकडे डेंगूच्या रुग्णांचा आकडाही नाही. रुग्णालयांची दयनीय अवस्था आहे. अशी परिस्थिती असेल तर मनसे मोठे जन आंदोलन करणार.

– प्रकाश भोईर, माजी आमदार मनसे

“नागरिकांनी विशेषतः पावसाळ्यात आठवड्यातुन एकदा ड्राय डे करायला हवा. या दिवशी साठवलेले पाणी संपूर्णपणे रिकामे करून नव्याने पाणीसाठा करायला हवा. २५ मे पासून आमचा सर्वे सुरू असून दीड लाख घरांचा सर्वे झालेला आहे. यातील ३०० हुन अधिक कंटेनर मध्ये आम्हाला डासांच्या अळ्या आढळून आल्या. ही फक्त महापालिकेची जबाबदारी नसून नागरिकांनीही सहकार्य करायला हवे.”

 – हर्षल गायकवाड, अतिरिक्त आयुक्त क.डों.म.पा.

One dies due to dengue in Kalyan

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *