लेख

‘कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण’चा कोकणातील आपत्ती ग्रस्तांना मदतीचा हात; भाग १

‘कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण’ कडून कोकणात आलेल्या पुरातील नुकसानग्रस्त लोकांना मदतीचा हात पुढे करण्यात आला होता. मंडळातील लोकांनी मदत गोळा करून जवळपास ३५ टन जीवनावश्यक साहित्य कोकणातील गरजूंना वाटप केले. साहित्य गोळा करण्यापासून वाटप करून परतण्या पर्यंतचा एक धावता प्रवास सर्वांना माहीत व्हावा या दृष्टीने लिहलेला हा लेख.

कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण’ची स्थापना :- ‘कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण – कल्याण,महाराष्ट्र’ मागील अनेक वर्षांपासून कल्याण शहरात कार्यरत आहेत. स्वतःचे जीवन घडवण्यासाठी कोकणातून शहरात आलेल्या लोकांनी एकत्र येऊन या प्रतिष्ठाणची स्थापना केली. राजकारणाला थोडंस लांब ढकलून गावच्या मातीचा आभास शहरात व्हावा यासाठी कोकणातील मातीशी नाळ असलेल्या कल्याण शहरातील कोकणकरांना समाजसेवक संजय बाबुराव मोरे यांनी एकत्र करून या संस्थेची स्थापना केली. आणि कल्याण मध्ये भव्य दिव्य असा कोकण महोत्सव सुरू झाला. कोकणातील संस्कृतीचे दर्शन कोकणात न जाता कल्याणकरांना घडू लागले. कोकणातील जीवनपद्धती, कोकणातील आहार, एकंदरीत हापूस आंबा सोडला तर सर्वच गोष्टी या महोत्सवात मिळत कारण साधारण जानेवारी महिन्यात हा महोत्सव होत असे जेव्हा हापूस झाडावर बहरायचा कालावधी सुरू असतो.

कोकणात जाण्याचा आखला बेत :- मागील दोन वर्षात कोरोनाने थैमान घातल्याने कोकण महोत्सव होऊ शकला नाही. त्यामुळे कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणचे पदाधिकारी व कार्यकर्ते काही काळासाठी विखुरले गेले होते. २१ व २२ जुलैच्या पावसाने कोकणाला झोडपून काढले. नदी ओढे ओसंडून वाहू लागले. दरडी कोसळल्या, पुरात लोकांची घर बुडाली तर दरडीत कुटुंबच्या कुटुंब मातीत गाडली गेली. कोकणावर आस्मानी संकट कोसळलेले. अशा परिस्थितीत महाराष्ट्र भरातून कोकणात मदतीचा हात पुढे केला गेला. आणि कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण देखील आपल्या गावाच्या मदतीसाठी सज्ज झाली. फोन फिरले… संस्थेचे सर्व पदाधिकारी गोळा झाले… मीटिंग झाल्या आणि पुढच्या कामाची आखणी कागदावर झाली.

प्रतिष्ठाणच्या सभासदांनी तसेच पदाधिकार्यांनी मदतीसाठी आवाहन केले. शक्य तितकी मदत लोक करू लागले. काहींनी धान्य दिले, काहींनी इतर जीवनावश्यक वस्तू सुपूर्द केल्या. वस्तू जमा झाल्या खरे पण आता त्या नेमक्या कुठे वाटप करायचा याबाबत महत्त्वाचा विचार करण्यात आला. कारण कोकणात महाराष्ट्र भरातून मदत होत होती. आणि जिथे नुकसान झालं नाही अश्या लोकांची देखील घरं सामानांनी भरली होती. वर्षभर बसून खातील इतके समान एका एका घरात साठले होते. बाहेरून आलेला ट्रक शहरातच कुठेतरी जवळपास थांबून येईल त्याला सामान देऊन निघून जात होते. त्यामुळे कोकणात ज्याचे काही नुकसान झाले नाही त्यांचे मोठे फावले होते.

कमिटीचे व्यवस्थापन :- ही बाब कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या निदर्शनास आली होती. म्हणून संस्थेने मदत कुणाला करायची याचा एक सर्वे केला. कोणत्या भागात नुकसान झालंय त्या गावातील लोकांची यादी बनवली गेली व यासाठी प्रत्यक्ष कोकणात संपर्क साधला गेला. दुसरीकडे मदतीचे सामान देखील जमा होत होते. मंडळातील पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी शक्य तितकी मदत केली. जाणीव सामाजिक संस्था, कल्याण पूर्व मधील व्यापारी संघटना अशा अनेक मंडळ व संस्थांनी मदतीचा हातभार लावला. उद्योजकांनी देखील आर्थिक मदत केली. कल्याणच्या आमदारांनी देखील मदत वाटपासाठी आर्थिक मदत संस्थेला दिली. यानंतर पुढील धोरण आखून मदतीचे दिवस आणि ठिकाण तसेच इतर गोष्टींचं व्यवस्थापन करण्यात आले.

प्रवासाची पहिली रात्र :- गुरुवार दि.२९ जुलै रोजी सकाळ पासूनच ट्रक मध्ये सामान भरायला सुरुवात झाली. साधारणपणे ३५ टन च्या आसपास माल असल्याने सर्व ट्रक भरण्यास संध्याकाळ झाली. कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी ट्रकचे पूजन करून सर्व गाड्यांना मार्गस्थ केले. सामानांचे मोठे ट्रक, केटरर्सची पिकअप सह पाच सहा गाड्यांच्या ताफ्यात जवळपास २५-३० लोकांची टीम सायंकाळी कोकणाकडे रवाना झाली. इतक्या लोकांचा ताफा असल्याने अडीअडचणी येणे देखील स्वाभाविक होते. इतक्या लोकांच्या जेवणाची जबाबदारी प्रितेश आचरेकर यांच्या केटरर्स टीम वर सोपवली होती. मात्र नागोठणे जवळच त्यांची पीकअप बंद पडली आणि वेळ व्यवस्थापण साधून त्यांनी तिथेच एका गेरेजच्या वर्कशॉप बाहेर जेवण बनवले. गरमागरम पुलावभात आणि लॉन्च पापड खाऊन तृप्त झालेली माणसं पुन्हा गाडीत बसून कोकणाकडे निघाली. जेवण होई पर्यंत आचरेकर यांची केटरर्सची व्हेन देखील गेरेजमधून रिपयेर होऊन आली होती.

कोकणातील महाड येथील उतेकर यांच्या गावातील बंगल्यावर पहिली रात्र जाणार होती. पण तिथे पोहोचे पर्यन्त पहाटेचे साडे चार वाजले होते. कारण रात्रीची वेळ असल्याने ताफ्यातील गाड्या मागे पुढे राहत होत्या. टेम्पो वाल्यांना आणायला पुन्हा मागे जावे लागत होते. असे करत करत ताफा महाड येथील उतेकर यांच्या बंगल्यावर पोहोचला. लाईट नसल्याने जनरेटर सुरू झाला. आणि पाच वाजता सर्वजण मिळेल त्या जागेत झोपी गेले. जनरेटरच्या आवाजाने झोप घेणे सोपे नव्हते. तरीही काही तासांची झोप घेऊन सकाळी सर्वांनी आवरले. चहा पोह्यांचा नाश्ता झाला. बाहेर पावसाने हजेरी लावली होती.

आमदार गणपत गायकवाड झाले पथकात सामील :- सकाळी उशिराच्या दरम्यान कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड आपल्या काही सहकाऱ्यांसमवेत महाड येथे येत कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणला जॉईन झाले. दरम्यान स्थानिक आमदार भरत गोगावले हे देखील भेटीसाठी आले होते. त्यांच्या भेटीनंतर मदतकार्यासाठी प्रतिष्ठाणची टीम रवाना झाली. महाडमधील खरवळी, ब्राह्मण आळी नवले, भोई, असनपोई, आकले बौद्धवाडी येथील सावित्री व काळ नदीच्या पुराने बधितांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. या सर्व भागात मदत पोहोचल्यानंतर पुन्हा संपूर्ण ताफा उतेकर यांच्या बंगल्यावर परतला. यानंतर जेवण करण्यात आले आणि दुपारच्या दरम्यान एक टीम कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांच्या समवेत तळई दुर्घटनेच्या ठिकाणी भेट देण्यासाठी गेली. यावेळी आमदारांनी संस्थे समवेत मातीखाली गेलेल्या गावाला भेट दिली तसेच मृतकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याचबरोबर बचावलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांची भेट घेत त्यांना मदतीचा हात पुढे केला. यानंतर सायंकाळी संपूर्ण टीम खेड तालुक्याकडे निघाली.

दुसऱ्या दिवशी सायंकाळी खेड तालुक्यातील संजय बाबुराव मोरे यांच्या निवासस्थानी संपूर्ण टीम रवाना झाली. आधल्या दिवशी व्यवस्थित झोप न झाल्याने तसेच दिवसभरातील धावपळीत २४ तासांचा शीण इथे घालवण्यात आला. व त्यानंतर रात्री व्यवस्थितपणे झोप झाली. दुसऱ्या दिवशी कशा पद्धतीने मदतवाटप झाले आणि कोणत्या अडचणींचा सामना झाला यासाठी वाचा MH मराठीचा उद्याचा लेख. धन्यवाद !!!

-संतोष दिवाडकर

About Author

One thought on “‘कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण’चा कोकणातील आपत्ती ग्रस्तांना मदतीचा हात; भाग १

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *