लेख

‘कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणचा’ कोकणातील आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात; भाग २

कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणने केलेली मदतीची सुरुवात आणि त्यांच्या टीमचा पहिल्या दोन दिवसांचा प्रवास तर आपण जाणून घेतलातच आता पहा पुढे नेमकं काय घडलं ? परंतु ज्यांनी पहिला भाग वाचला नाही त्यांनी पुढील लिंकवर आधी तो वाचावा. https://mhmarathi.in/?p=954

शनिवार दि.३१ जुलै… मदतकार्याचा तिसरा दिवस. खेड तालुक्यातील संजय मोरे यांच्या निवासस्थाना पासून मदतीसाठी संपूर्ण ताफा पुढील ठिकानी रवाना झाला. सुसेरी अलसुरे मोहल्ला, शिव, भोसते येथील पूरग्रस्तांच्या भेटी घेऊन त्यांना अन्नधान्य किट व इतर वस्तुंचे किट देण्यात आले. जगडुबी नदीच्या पुराने या लोकांचे प्रचंड नुकसान झाले होते. काहींची भातशेती वाहून गेली होती. रस्ते उखडले, घरे कोसळली. या सर्व भागात मदत दिल्यानंतर संपूर्ण ताफा खेड तालुक्यातील अतिदुर्गम भागात जायला निघाला.

उपाशीपोटी अतिदुर्गम भागाकडे रवाना :- दुपारचे तीन वाजले होते. कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांच्या समवेत अतिदुर्गम भागाकडे निघाले आणि प्रवास सुरु झाला. काही लोकांनी सकाळचा नाश्ता केला नव्हता. शिवाय दुपार झाली असल्याने पोटात भुकेचे कावळे ओरडू लागले होते. मदतकार्य करता करता पोटात भुकेने गोळा उठला होता. मात्र आता प्रवास सुरु झाला होता. खेड तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या बिरमिनी गावाकडे हा ताफा निघाला होता. येथीलच मु.पो.वडगाव गावात दरड कोसळून एका दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यावेळी कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण तसेच आमदार गणपत गायकवाड यांनी नातेवाईकांची भेट घेतली. त्याचप्रमाणे मदतीचा हात पुढे केला.

मोबाईल टॉवर साठी करणार आमदार प्रयत्न :- गावखेड्यातील संपूर्ण प्रवासात मोबाईलला कसलेही नेटवर्क आढळले नाही. येथील लोक एका मोठ्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. ही बाब त्यांनी आमदार गणपत गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिली. आपण मोबाईल टॉवर लावण्यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी यावेळी गावकऱ्यांना सांगितले. यानंतर ताफा निघाला आणि येथील एक जागृत देवस्थान देवी इवराई मानाई देवीच्या दर्शनासाठी काहीवेळ थांबला. देवदर्शन करून पुन्हा ताफा खेडकडे जिथे वास्तव्य होते त्या ठिकाणी निघाला. सायंकाळचे सहा वाजत आले होते. शनिवारचा निरंकार उपवास घडल्याने सर्वजन जेवणावर तुटून पडले.

दोन दिवसांच्या मदतकार्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांच्या समवेत आलेला ताफा पुन्हा कल्याणकडे निघाला. दुसऱ्या दिवशी रविवारचा जनता दरबार आणि इतर नियोजित कार्यक्रम असल्याने ते आपल्या मतदारसंघात परतण्यासाठी सर्वांचा निरोप घेऊन जाणीव संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश सावंत यांच्या समवेत निघाले. यानंतर रात्री थोडेफार जेवण करून सर्वजण झोपी गेले.

दिवस चौथा – चिपळूण :- रविवार दि. १ ऑगस्ट … मदतकार्याचा चौथा दिवस. सकाळी आवरून उर्वरित मालाच्या टेम्पोसह दोन गट करून चिपळूण येथे मदत वाटण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी निघाले. चिपळूण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याची आर्थिक राजधानीच. वाशिष्ठी नदीच्या पुरामुळे येथील पूल देखील वाहून गेला. मात्र डागडुजीनंतर आता वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. परशुराम घाटापासून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. यामुळे काही गावांचा संपर्क अजूनही तुटलेलाच आहे. १९६५ नंतर आलेल्या भयावह पुरामुळे तालुक्यातील बाजारपेठ, जवळपास असणाऱ्या वसाहती साधारण १२ फूट पाण्यात गेल्या होत्या. काही ठिकाणी नदी प्रवाह बदलल्याने पूर परिस्थिती ओढावली असल्याचे तेथील लोक सांगत होते. कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणने त्या ठिकाणी जाऊन मदतीचा एक हात पुढे केला.

खेर्डी येथील दत्तवाडी, विकासवाडी, सती, समर्थ नगर, बाजारपेठ मोहल्ला वस्ती, माप, खिंड, वाणी, आळी, कलबसते अश्या ठिकाणी जाऊन जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले गेले. चिपळूण तालुक्यातील दुर्गम भागातील पोसरे गावच्या बौद्ध वाडीवर दरड कोसळून जिवीतहानी झाली होती. याही ठिकाणी अध्यक्ष मोरे यांनी सहकाऱ्यांसमवेत जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्याचबरोबर जवळपास असलेल्या सापील्दी, धामणगाव, खोपिगाव, दसपटी येथील ओवाळी, धनगरवाडी, कडवड गावांना कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणने मदतीचा हात दिला. चार दिवसांच्या व चार तालुक्यातील या संपूर्ण मदतकार्यात कोकण वासीयांनी संपूर्ण कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणचे आभार मानले. कल्याणहुन आलेली ही मदत महाड,पोलादपूर,खेड आणि चिपळूण तालुक्यातील प्रत्यक्ष गरजूंनाच देण्यात आली. त्यामुळे मदत करण्यापेक्षा मदत कोणाला करीत आहोत या बाबीवर प्रतिष्ठाण भर दिल्याने मदत योग्य हातात गेली असल्याचे समाधान यावेळी व्यक्त करण्यात आले.

प्रतिष्ठाणच्या मदतीने भारावले कोकणकर:- संपुर्ण ४ दिवस मदत वाटप करीत असताना आपत्तीग्रस्त नागरिकांनी संस्थेच्या लोकांना तसेच सहभागी झालेल्या आमदारांसमोर आपल्या व्यथा मांडल्या. काही ठिकाणी मोबाईल टॉवरची मागणी असोत किंवा काही ठिकाणी एसटी थांब्याकरीता निवारा मिळण्याची अपेक्षा करण्यात आली. सरकार आमच्याकडून बस थांब्याच्या निवाऱ्याकरिता पैसे मागतात असे म्हणत तुम्ही काहीतरी प्रयत्न करावा अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. ज्याठिकाणी आजपर्यंत कोणीही मदतीसाठी पोहोचलं नव्हतं सरकार देखील इथे आलं नसेल अशा भागात तुम्ही मदत घेऊन आलात. ही आम्हाला मिळालेली पहिली मदत आहे. कारण बाकीचे लोक शहरातच मदत वाटून निघून जातात पण आमच्या दुर्गम भागात कधी कोणी आलं नव्हतं. तुमची ही मदत खरोखरच लाखमोलाची आहे. अशा शब्दांत गावकऱ्यांनी प्रतिष्ठाणचे आभार मानले. शिवाय गावकऱ्यांनी मांडलेल्या व्यथा आणि प्रश्न यावर नक्कीच मार्ग काढला जाणार असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष संजय मोरे यांनी गावकऱ्यांना दर्शवला.

मदतकार्यात सहभागी सेवेकरी :- कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या या मदतकार्यात कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड, प्रतिष्ठाणचे संस्थापक/अध्यक्ष संजय बाबुराव मोरे, कार्याध्यक्ष रमाकांत देवळेकर, उपाध्यक्ष सुभाष म्हस्के, सचिव संदीप तांबे, उपखजिनदार अजय पवार, सल्लागार तसेच प्रसिद्धी प्रमुख शरद शिंदे, त्याचप्रमाणे दीपक गायकवाड, जाणीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश सावंत, अनिल राऊत, राहुल कासारे, योगेंद्र यादव, प्रदीप उपाध्याय, सदानंद शिंदे, संतोष परब, संतोष गुरव, रुपेश साळुंखे, मंगेश पवार, मंगेश सकपाळ, गणेश शिंदे, अविनाश शिरकर, मनीष पाटील, सचिन कुरणे, रदणेश महाडिक, अजय महाडिक, इलाखी कोनार, प्रशांत पवार, प्रितेश आचरेकर, साहिल मोरे, संतोष दिवाडकर, तिसाई ग्रुपचे अरुण दिघे, मनोज माळी, संदीप सरवणकर, अमीत धानजी, विशाल जोगदंड, अज्जू गायकवाड, नितीन शिंदे, प्रमोद माने, तुकाराम मापरी, साजीत खान, सूरज भारद्वाज, गौरव सरवणकर, रामदास तळपदे तसेच कल्याण कल्याण पूर्व व्यापारी संघटना आणि इतर सहकाऱ्यांचे प्रत्यक्ष योगदान कोकण दौऱ्यात लाभले. मदत करताना द्यावयाचे सामान व मदत देण्याचे ठिकाण आगोदर निश्चित करण्याचे आवाहन कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण यांच्या कडून इतर संस्थांना करण्यात येत आहे.

-संतोष दिवाडकर

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *