कथा लेख

गावखेड्यांचा कायापालट; अर्थात हरवत चाललेलं गावपन, भाग दुसरा

आजपासून दोन दशकांपूर्वी म्हणजे २० वर्षांपूर्वीचं माझं गाव आणि आताचं माझं गाव. यात खूप मोठा फरक पडला आहे. म्हणूनच काही जुन्या आठवणींवर उजाळा टाकण्यासाठी त्याचबरोबर आजच्या पिढीला जरा पाठीमागचा आरसा दाखवण्यासाठी म्हणून मी ही नवीन लेख मालिका सुरू केली आहे. तसे फारसे अवघड शब्द न वापरता सोप्या शब्दात परंतु वाचकाला त्या काळात घेऊन जाणे हेच प्रथम उद्दिष्ट. मुळात वाचकाला त्या काळात नेण्या आधी लेखकाला त्या काळात जावे लागते. मागील लेखाला मिळालेला प्रतिसाद पाहता पुढील भाग आणखीन सुंदर बनतील असा आशावाद मला नक्की आहे. परंतु ज्यांनी मागील पहिला भाग वाचला नसेल त्यांनी लिंकवर क्लिक करून आधी तो वाचावा. लिंक https://mhmarathi.in/shilim-village-the-lost-of-rurality/

पूर्वी जी गावाकडची ओढ असायची ती आता कमी होऊ लागली आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे गावाचे हरवत चाललेलं गावपन. गाव आणि शहर यातील फरक हा तोच व्यक्ती सांगू शकतो ज्याने शहरी आणि ग्रामीण जीवनपद्धती लहान पणापासून जगलेली आहे. गावातील पिढीला आपला गाव बदलला आहे एवढेच फक्त जाणवू शकते. या कथा मालिकेतून आपला गाव आणि शहर या दोघांमध्ये काय फरक होता याचेही दर्शन घडणार आहे. तर आता मागील भागापासून पुढे जाऊयात.

शहरातून गावाला पोहोचल्यानंतर अंगणात पोहोचे पर्यंत जवळपास दुपारचे दोन वाजलेले असे. डोक्यावर रनरनत ऊन जरी असलं. तरी फारसे उकडत नसे. शिवाय कोणत्याही दिशेने येणारा सोसाट्याचा वारा हवा घालण्याचे काम करीत होता. वाऱ्यामुळे झाडांची पाने खळखळून आवाज करीत होते. जसे की स्वागताला टाळ्या. उंच उंच फांद्या वाऱ्यावर डोलत होत्या. आणि मध्येच काही चाफ्याची फुल पुष्पवृष्टी करीत होती.

काल्पनिक प्रतिमा

अंगणाच्या पुढे एका बाजूला भला मोठा खड्डा. त्याला म्हणतात उकिरडा. उकिरड्यात काय ? तर घरातील केर कचरा, जेवणातील खरकटे आणि जनावरांचे शेण. सहज सांगायचं तर डंपिंग ग्राउंड. परंतु कसलाही दुर्गंध न सोडणारं.

आणि त्याच्याच जवळपास एका मांडवा खाली उभी असलेली पाखर्या पपट्याची बैल जोडी. दावणीला बांधून असलेली ही काळी कुट्ट बैल आलेल्या पाव्हण्यांकडे बघत राही. आकर्षण असे की त्यांच्या वेसणीला धरून मी त्यांना गोंजारत असे. तसा पाखऱ्या माझा लाडका बैल. कारण तो शांत आणि समजदार होता. आणि पपट्या जवळ गेला तरी फुसकरायचा. लहानपणी चुकून मी माझा हात दावणी समोरील आडव्या खांबावर ठेवला तर त्याने माझं बोटावर शिंग आदळलं होतं. म्हणून पपट्याचा राग यायचा. पण एक सांगू का तो जो गंध यायचा ना बैलांचा आणि शेणाचा त्याच्या पुढे आजचे रूम फ्रेशनरही फिक्केच. एक वेगळाच गंध होता तो. त्यात कुठेतरी आपलेपणा होता.

पाखऱ्या पपट्या

गावात तेव्हा सगळ्यात जास्त चिवचिवाट कोंबड्या आणि त्यांची पिल्ले करायची. ज्याच्या त्याच्या घरात १०-१५ कोंबड्या असायचा. दिवसा मोकळ्या सोडल्या जात असल्याने अंगणात किंवा उकिरड्यात पायाने माती हुसकून दाणे टिपायचा. कधी कधी बैलाच्या समोर टाकलेल्या पेंढ्यातही उस्तरायला जात होत्या. प्रत्येक कोंबडीच्या मागे तिची आठ नऊ पिल्ले. आणि त्या पिल्लां मागे धावणारा मी. कोंबड्या असो किंवा अजून कुठला प्राणी. मला लहानपणापासून त्यांच्या सोबत खेळायचा नाद बनला आहे.

बराच वेळ अंगणातच थांबल्याने घरातून आजी बाहेर यायची.
“बये आला बाई माझा बच्चा, ये बाळा उन्हात नको खेळू घरात ये. जेवून घे ये” अशी आजीची हाक.
शेणाने सारवलेले मातीचे अंगण आणि डोक्यावर गवताच्या झावळीचा मांडव खूप छान सावली देत होता. लाकडाच्या मेढ्या (खांब) जमिनीत रोवून त्यावर मेसकाट (बांबू) बांधून त्याच्यावर पत्र्यां ऐवजी गवताच्या झावळी पसरल्या जायचा. हे मांडव पावसाळा संपला की बनवले जायचे. आणि तीच खरी थंडगार सावली.

काल्पनिक

घरात जाण्यापूर्वी पहिली पायरी म्हणजे एक भला मोठा दगड. हीच घराची पहिली पायरी. त्या चौकोनी दगडावर पाय देऊन लाकडी दाराचा उंबरा ओलांडून घरात प्रवेश व्हायचा. शेणाच्या सारवलेल्या जमिनीवर ना गरमी जाणवत होती ना गारवा. कपडे घाण होतील असे कधी मनातही यायचे नाही. प्लॅस्टिक खुर्ची वगैरे असले काही नव्हते त्या काळी. लाकडी फळ्यांची बनवलेली एक खाट आमच्या घरात होती. गावातील सुताराकडून तासून तासून ती आजोबांनी बनवुन घेतली होती. आणि त्याच आजोबांचा फोटो एका खांडा खाली तिरका लटकत होता. आता खांड म्हणजे काय ? तर ज्याला आज आपण पिलर म्हणतो. दगड माती पासून उभ्या असलेल्या आमच्या घराला लाकडी फळ्यांचा माळा होता. आणि घराला संपूर्ण कौल. या काळात सिमेंटचे पत्रे वगैरे असे खेडोपाडी पोहोचलेच नव्हते.

एका उंचवट्यावर असलेलं आमचं उंच घर. आणि ते ही तितकेच प्रशस्त होते. घरात बैलांचा गोठा, त्यासमोर एक पडघी. पडघी म्हणजे अशी जागा जिथे काही पेंढा, लाकूड फाटा असे काही सामान ठेवतात. आणि त्यानंतर आमची ओटी. आजच्या भाषेत आपण हॉल म्हणतो. तसे पाहता ओट्या सारख्या वाटणाऱ्या भागाला ही ओटी म्हणतात. परंतु आमची ओटी अथवा हॉल हा प्रशस्त होता. आणि मधोमध एका रांगेत सर्व खांब. ज्यावर सुतारांनी त्यांच्या केलेचे उत्तम प्रदर्शन करून नक्षीकाम केलेले होते. या खांबांना ऑइल पेंट मारून अथवा इतर कोणते रंग मारून सजवले जात असे.

काल्पनिक

पुढे उजव्या हाताला एक खोली होती. ज्याला आम्ही आतलं घर म्हणायचो. आजच्या भाषेत त्याला म्हणतील बेड रूम. त्या आतल्या खोलीच्या भिंतींना लागून धान्याचे डबे रचून ठेवले जाई. तसेच एका कोपर्याला जमिनीवर देवघर असे. आणि ओटीच्या डाव्या बाजूला स्वयंपाक घर.

स्वयंपाक घराला लागूनच पुढे मोरी असे. आज सहजपणे बाथरूम बोलतो आपण. तेव्हा मोरीच म्हटले जाई. आताही म्हणतात म्हणा गावाला काही लोक. ती मोरी पण पूर्ण नाही. तर अर्धीच बांधलेली असे. एका कोपऱ्यात अर्धी भिंत बांधली आणि तिला हॉल काढून पाणी बाहेर जायला आउटलेट दिलं की झालं काम. घरातील महिला पुरुष उठण्या पूर्वी आंघोळी आटपत. आणि तिथेच पुढे स्वयंपाकाला बसत. मुळात बसून अंघोळ करीत असल्याने मोरीच्या भिंती अर्ध्या होत्या. आणि त्या अर्ध्या भिंतीवर हंडे कळशी एकावर एक रचून ठेवले जाई. म्हणजे मोरीच्या अर्ध्या भिंतीवर पाणीसाठा केला जायचा. आता असे चित्र दिसणे दुर्लभ.

काल्पनिक

मोरीच्या जवळ लागूनच दुहेरी चूल होती. तशा चुली आताही आहेतच. पण अजून किती काळ असतील सांगू शकत नाही. दुहेरी चूल म्हणजे सर्वसामान्य. एक तोंड आणि दोन बाजू. एका बाजूला कालवण कढत (शिजत) असेल तर एका बाजूला तव्यावर भाकरी भाजल्या जाई. ही भाकर थोडी कच्ची ठेवून तिला चुलीच्या तोंडावर शेकवले जाते. आणि याच चुलीच्या शेजारी कोवळाभर (हातात मावतील एवढी) फाटी (चुलीला जाळायची लाकडं) रचलेली असायची. एखादं फाट जळून संपलं की लगेच दुसरं लावायचं. ही फाटी क्रॉस जाळली जातात. जेणेकरून दोन्ही बाजूला आग पसरेल असं. याच चुलीच्या वरच्या बाजूला लागून असलेल्या भिंती धुराने काळ्या पडलेल्या असायचा.

काल्पनिक

स्वयंपाक घरातील भिंती शेणामातीने रंगवल्या जायचा. याच भिंतीवर बत्त्या लटकवलेल्या असायचा. आता बत्त्या म्हणजे काय ? तर औषधाच्या किंवा दारूच्या बारक्या बाटलीत रॉकेल ओतून त्याच्या झाकणाला हॉल पाडून त्यातून चिंधीची वात करून सोडली जाई. जसं की आपण देवाला दिवा लावतो तसे. पण त्या बत्त्या असायचा रॉकेलच्या. त्या काळात गावागावांत रात्रीच्या वेळी तासनतास लाईट जायची. त्यावेळी या बत्त्या घरोघरी पेटवून ओटीवर ठेवल्या जायचा.

स्वयंपाक घराला दार असायचे. ते म्हणजे घराचे मागचे दार. माझ्या आजोबांनी इथेही एक अंगण बनवले होते. आणि याच ठिकानी तुळस उभारली होती. तर उंच उंच डोलणारी निलगिरीची भलीमोठी झाडं काही अंतरांवर उभी होती.

घरातील एका कोपऱ्यात अण्णांनी म्हणजे माझ्या चूलत्यांनी एक लाकडी शोकेस टाइप कपाट बनवले होते. ज्यावर ब्लॅक एन्ड व्हाइट टीव्ही ठेवला होता. त्याकाळी गावात टीव्ही हा प्रकार कुणा कडेही नसे. रेडिओ जरी असला तरी खूप मोठे आपरुक मानले जाई. घराच्या प्रत्येक भिंतीला चौकोनी अथवा त्रिकोणी देवळ्या होत्या. देवळी म्हणजे काही वस्तू ठेवता येईल अशी जागा. एखाद्या देवळी मध्ये देव पुजलेले असायचे तर एखाद्या देवळीत काचेचा कंदील. तर कुणाचं पाटी पुस्तक.

काल्पनिक

एवढं मोठं घर आणि घरात एकही पंखा त्याकाळी नव्हता. उलट उन्हाळा असला तरी अंगावर घेऊन झोपायला लागते. जे आता कमी होऊ लागले आहे. आता काही लोक आम्हाला टेबल फेन शिवाय झोप येत नाही असे सांगतात. त्याकाळी शहरात असलेली पांढरी शुभ्र ट्युबलाईट अजूनही गावखेड्यात पोहोचली नव्हती. पिवळ्या रंगाचा ब्लब हाच सर्व काही होता. आणि त्याची बटनही एकदम निराळीच होती.

जेवताना सगळी मंडळी सगळं जेवण घेऊन एकत्र बसत. प्रत्येकाच्या ताटात पाहिजे तसं जेवण वाढलं जाई. आता जेवण काय ? तर आमचा गावात भाजीपाला नसायचा. रानात भाज्या असायचा त्या पण पावसाळ्यात. मग उन्हाळ्याच काय जेवण ? उन्हाळ्यात डाळ, मसूर, वाल, काळा घेवडा, काळा वाटाणा अशी वाळवलेली कडधान्याची आमटी असे. भाकरीला पण तीच आणि भाताला पण तीच. पण तोंडी लावायला प्रत्येकाच्या भाकरीच्या टोपलीत एक भला मोठा मिरचीचा गोळा असायचा. लाल मिरच्या पाट्यावर ठेचून, त्यात लसूण, मीठ असं काही टाकून तयार केलेली चटणी. घरात काही भाजी नसेल तर हीच चटणी भाकरीवर घ्यायची आणि लावून लावून खायची. किंवा आणखीन एक म्हणजे तीळकुटाची चटणी. जी आजही गावाला खायला मिळते त्याला आपण भुगी म्हणतो. तेव्हा आम्हाला भूक लागली तर आमची आजी त्या भुगीमध्ये तेल टाकून आम्हाला चपाती बरोबर खायला देई. तेलामुळे ओलावा मिळे आणि तिखटपणा कमी होई. तसं शहरात भूक लागली तर आम्ही जॅम चपाती खायचो. पण गावाला गेलो की मिळेल ते गोड लागायचं. जेवणात फारसे मसाले मिष्टान्न नव्हतं. पण प्रत्येक पदार्थाला आणि कालवणाला एक वेगळीच चव असायची. ती चव पिजा बर्गर समोर पण फेलच.

आता ही सर्व झाली घराची रचना आणि एकंदर राहणीमान. यातील किती गोष्टी तुम्हाला आठवल्या ? तुमचं घर तुम्हाला कस दिसलं ? वीस वर्षांपूर्वी मागचा प्रवास करून तुम्हाला कसं वाटलं ? आणि शहरी भागातील ज्यांनी हा अनुभव घेतला नाही. त्यांना हे चित्र कसं वाटलं ? हे सर्व मला पर्सनली सांगायला विसरू नका. तुम्हाला वाचताना काय अनुभव येतोय हे मला कळण जास्त गरजेचं आहे. भले तुम्ही माझ्यासाठी ओळखीचे असोत किंवा अनोळखी. पण तुमच्या शब्दात मला तुमचा अभिप्राय कळवा. काही लोकांना सांगायचं तर असतं पण लिहायचा कंटाळा करतात पण तुम्ही मला भावना कळल्या नाहीत तर तुम्ही लेख वाचत आहात हे मला अजिबात समजणार नाही. २००३ पासून सुरू झालेल्या या मागच्या प्रवासात कोण कोण सामील आहे हे मलाही बघायला आवडेल. पुढील भागात करूयात नवी सैर एका वेगळ्या प्रसंगासह. तूर्तास धन्यवाद !!!

-संतोष दिवाडकर ( 8767948054 )
या माझ्या व्हॉट्सऍप वर आपल्या कमेंट पोहोचवा.

शिंदेवाडी होळीमाळ येथील जुना फोटो. बैलगाडी पुढे नामदेव शिंदे. बैलगाडीत बसलेले पांढऱ्या वेशात नारायण दिवाडकर, खंडू शिंदे आणि तेव्हाची तरुण पिढी.

या लेखाबद्दल वाचकांनी व्यक्त केलेल्या निवडक भावना

“लहान होता तेव्हा गावाकडं खुप मजा मस्ती केली. आणि मोबाईल नव्हता त्यामुळे पूर्ण वेळ खेळण्यात जायचा. आता सगळे एकत्र बसले तरी प्रत्येकाच्या हातात फोन असतो.”

– दिपाली शिंदे

“वा खुपच छान लिहिलं आहेस तू लहानपणी चा संपूर्ण प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला आम्ही पण शिळिंम ला मामाच्या गावाला जाण्यासाठी खुप आतुर असायचो खूपच छान होते ते लहानपणी चे दिवस आणि गाव आणि गावाकडची प्रेमळ स्वभावाची माणसं गावाला जाऊन आल्या सारखं च वाटलं मला”

– कादंबरी गोसावी

“ज्यांनी हे जगले त्यांच्या चेहऱ्यावर शेवट पर्यंत एक छान स्मितहास्य नक्किच राहत असनार. शिळीम गावच्या आठवनीत. व्यावं पुन्हा लहान आणि जगावं ते बालपण परत. काळाची पावलं मागं नेता आली असती तर किती बरं झालं असतं ना.”

– उज्वला पवार

“खरंच मला त्या काळात गेल्यासारखं वाटलं. क्षणभर सगळं काही ठळकपणे आठवलं. लग्ना नंतरचे आठवत नाही. पण बालपण आठवलं. मस्त लेख आहे.”

– भावना दिवाडकर

“२ रुपयांना जाळीत झाकून ठेवलेला वडा पाव. खरंच बालपण किती छान होत. त्या काळी खिशात २ रुपये जरी असले तरी खूप वाटायचे आणि आता. काय सुख होत त्या बालपणात. आता गूगल पे ने पूर्ण अकाउंट कितीही पैश्यानी भरुदे पण त्या बालपणासारखे सुख नाही कुठेच.

– ओमकार चासकर

“छान वाटलं. जुन्या आठवणी खरच ताज्या झाल्या. क्षणभर अस वाटलं अजून मी तिथेच आहे का. वाचता वाजता रुळून गेली.

– पुजा कदम

“खूप छान लिहलय. आता मोबाईल मुळे गावाचे गावपण हरवल आहे. गावा सारखी मज्जा शहरात नाही घेता येत.”

– अश्विनी इंगळे

“मस्तच! मस्त रमलो जुन्या आठवणीत. पण आज गावाचं गावपण हरवत चाललं आहे. गावांचाही विद्रुप शहरीकरण होत चाललंय. आणि खेदाची बाब म्हणजे आपण यालाच विकास समजतोय. गावाशी जुळलेली नाळ आणि भावना नष्ट होत चालल्या आहेत. आठ वाजताच निद्रिस्त होणारे गाव मध्यरात्री पर्यंत पण मोबाइलच्या स्क्रीनमुळे काजव्याप्रमाणे चमकत आहे. सगळं काही आपल्या हातातून सुटत चाललंय, हि खूप मोठी धोक्याची घंटा आहे.”

– गोपाळ दंडगवळे

“दादा तुमचा लेख वाचला. सत्य परिस्थितीचें वर्णन केले आहे. तुम्ही खरच मावळच काय अशी अनेक पुण्या नजिक गाव आहेत जी आता गाव म्हणून ओळखणे कठीण होत आहे .सतत चालणारे काँक्रिटीकरण, झाडं मुळासकट उखडून टाकली जात आहे खेडी लोप पावत आहेत. मी मूळची कोकणातली पण महाड पोलादपूर जिथे माझ गाव होत तिथे फक्त आता शहरी सांगाडा दिसत आहे. गाव कुठे तरी हरवला आहे. खूपच वाईट वाटत आहे. येणाऱ्या पिढीला गाव काय असतं कधी कळेल का??? हे विचार करूनच खंत वाटत आहे.”

– रोहिणी जाधव

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *