कथा लेख

Shilim Village : गावखेड्यांचा कायापालट; अर्थात हरवलेलं गावपन

Shilim Village भारत देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागला आणि देशातील गावखेडी वेगानं विकसित होऊ लागली. शहर आडवी उभी पसरली तर गावांनी हळूहळू शहरात रूपांतर व्हायला सुरुवात केली. पण यात एक गोष्ट मात्र हरवत चालली आहे. ते म्हणजे गावाचं गावपन. भविष्यात येणाऱ्या पिढ्यांना गाव म्हणजे काय असतं ? हे देखील कळणे कठीणच. जसं पूर्वी शहरात असे म्हटले जाई की ज्याला गाव आहे तो खरंच भाग्यवान. पण भविष्यात गाव उरतील का ? असा संभ्रम तयार झाला आहे.

गावाचे आधुनिकीकरण होत गेले की त्या गावाला शहर म्हटले जाते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एखाद्या शहराच्या अथवा परिसराच्या नावात गाव शब्द असणे. उदा. तळेगाव, गोरेगाव, तिसगाव. आता यांच्या नावातच गाव आहे. याचे मूळ कारण म्हणजे कधी एके काळी हे खरोखरच एक गाव होते. मात्र बदलत्या काळानुसार आज यांना शहर म्हणून बघितले जाते. जसे की तळेगाव शहर, गोरेगाव शहर. बदलाचे हे एक उत्तम उदाहरण आहे पण हा बदल पाहणारी पिढी म्हणजे आपल्या आजी आजोबांची. आता जो बदल मी पाहतोय त्या बद्दल मला सांगावेसे वाटेल. इथून पुढे मी बालपणापासूनच्या काही आठवणी आणि बदलांना उजाळा देणार आहे.

जन्मा पासून कल्याण मध्ये राहत असलो तरी माझे मूळ गाव म्हणजे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शिळीम हे गाव. लहानपणा पासून गावा बद्दल एक वेगळंच आकर्षण असे. शहरी गजबजलेल्या भागातून शांत निसर्गाच्या सानिध्यात जाणे हे म्हणजे स्वर्ग सुखापेक्षा मोठे नाही. त्यामुळे गणपती आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची आतुरतेने वाट आम्ही पाहत असे.

उन्हाळ्याचा दाह आणि शाळेची वार्षिक परीक्षा संपायची वेळ आली की चाहूल लागायची गावाची. शेवटचा पेपर लिहता लिहता गावाला जाण्याबाबत अगोदरच आतुरता लागलेली असायची. कारण बऱ्याच महिन्यानंतर आता गावाची मजा येणार होती. हा काळ असेल साधारणपणे २००३ चा.

ज्या दिवशी गावाला जायचे असते त्याच्या काही दिवसांपूर्वी मी तर नुसते दिवसच मोजत असे. मग गावाला काय काय न्यायचे ? काय काय करायचे ? कुणाला काय काय सांगायचे ? हे सर्व आगोदर ठरलेले असे. मुळात मोबाईल नावाचा प्रकार नसल्याने तिकडे काय काय चालू आहे ? याची कल्पना नसल्याने बरेच काही नवीन ऐकावयास मिळणार हेही माहीत असायचे. त्यामुळे गप्पा मारण्यासाठी पुरेसे विषय जवळ असायचे.

गावाला जाण्याच्या दिवशी सकाळी भल्या पहाटे आपोआपच जाग येई. अंघोळ आवरून तयारी करून घराला कुलूप लावून आम्ही निघे. पप्पा जवळ भल्या मोठ्या बेगी असत. आईकडे एखादी कमी वजनाची बेग आणि आम्ही दोघे बहीण भाऊ मोकळे. रिक्षातून एसटी स्टॅन्ड आणि त्यानंतर एसटी मध्ये चढून आरक्षण केलेल्या सीटवर जाऊन खिडकीत बसणे. एसटी मधली विंडो सीट आम्ही बहीण भाऊ एक एक स्थानकानंतर बदलत असे. आमचा हा क्रम कामशेत येई पर्यंत चालत असे.

कामशेतला आल्या नंतर जुन्या एसटी स्टॅंडवर बराच वेळ बसावे लागे. खूप सारे गावकरी तिथे एसटीची वाट बघत असे. “१२ ची एसटी कव्हा यायची ?” अशा चर्चा तिथे सुरू असत. धोतर, कोपरी अथवा पांढरा शर्ट किंवा सदरा आणि डोक्यावर टोपी घातलेली मंडळी तिथे जास्त असत. आणि मग एसटी आली की चढायची घाई. मग पुन्हा विंडो सीट. आणि मग काही वेळाने सुरू होई माझ्या गावाला पोहोचवणार्या एसटी मधील प्रवास.

कामशेत च्या मुख्य चौकातून एसटी रस्ता पार करून शिळीमच्या मार्गावर लागे. आता या चौकात काही वर्षांपूर्वी फ्लाय ओव्हर बनला आहे. जो त्या काळी नव्हता. त्याकाळी वाहतूक फारशी नसल्याने एसटी आरामशीर रस्ता पार करीत होती. आता इथून पुढे जो रस्ता असे तो एकदम लहान एकेरी आणि पूर्णपणे मोकळा. एसटी व्यतिरिक्त या मार्गावर दुसरे कोणतेही खाजगी वाहन नजरेस पडत नव्हते. क्वचित एखादी जीप गाडी, टेम्पो असे खाजगी वाहन नजरेस पडत असे. आणि राहिला विषय दुचाकीचा तर या काळात बोटावर मोजण्या इतक्याच दुचाक्या या भागात होत्या. त्यामुळे रस्त्यावर लालपरी सोडली तरी सगळा रस्ता सामसूम. आजूबाजूला दिसणारे डोंगर, पिवळी सुकलेली गवत, गावची मोकळी हवा, पवना धरणाचं विहंगम दृश्य हे सर्व नजरेस पडे.

कामशेत नंतर आमची एसटी पवनानगरला येऊन थांबायची. त्या काळी पवनानगर वगैरे असे काही नाव कोणी उच्चारत नसे. ‘कॉलनी आली’ बस एवढंच. आताही कॉलनीच म्हणतात पण तेव्हा फक्त तेवढंच होत. कॉलनीला आल्यानंतर काहीशी दुकान नजरेला पडत. एखाद दोन हॉटेल, काही भाज्यांची दुकानं, आणि काही लोकांची गर्दी इथे नजरेस पडे. यानंतर मात्र पुढील कोणत्याही गावात गजबजाट दिसणार नाही. पुढे जवण गावात फक्त एकच दुकान. एसटी येताच झाडाच्या सावलीत पारावर बसलेली माणसं एसटीत चढून बसत. आणि मग हळूहळू गाव जवळ येई. गावाजवळ एसटी आली की मग रस्त्यावर देवळा शेजारी एसटी उभी राही. एसटीतुन उतरलो की घरातील कोणी तरी घ्यायला येई.

एसटी मधून उतरल्यावर सर्व शुकशुकाट असे. जेमतेम एखाद दोन माणस नजरेस पडत. रस्त्याच्या कडेला लागूनच भैरवनाथाचे मंदिर. एका कडेला मारुती रायाचे मंदिर आणि रस्त्याला फक्त फणसाच्या झाडाची सावली. गावात एक मारवाडीचे दुकान, एक बबन बुवाची टपरी आणि दुसरी भाऊची टपरी. आणि टपरी समोर एक छोटंसं दुकान. बस एवढंच काय ते होत.

आम्ही मंदिरात जाऊन नारळ फोडून हार वगैरे घालून दर्शन घेत. आणि मग जे कोणी घ्यायला येईल त्यांना पप्पा भाऊच्या टपरीतून काहीतरी गोळ्या घेऊन देत. तसं भाऊ आणि पप्पा चांगले गप्पा करायचे. पण ते भाऊ आता कोण होते ? मला काय आठवत नाही. त्यांच्या दुकानात पार्लेच बिस्कीट, पेपरमिंट, हत्ती चिमण्यांच्या गोळ्या, भिंगरीच्या गोळ्या, पिठासारख्या दिसणाऱ्या रंगबेरंगी गोळ्या, ऑरेंज लेमनगोळ्या, सुपारी, बडीशोप असं काही काही मिळत होत. आणि २ रुपयांना जाळीत झाकून ठेवलेला वडापाव. जो त्या काळी महाग वाटत होता. आठण्याच्या आठ गोळ्यांनी खिसा भरून गेला की आम्ही घराकडे निघायचो.

आता त्या काळात शॉर्ट कट म्हणजे भैरीच्या देवळा कडून चिंचेच्या झाडा पासून दोन चार शेत ओलांडून ओसाड पडलेला ओढा ओलांडून एका पांधीतुन वाट काढत आमच्या वाडीत जावे लागायचे. पायी खुपाटा उडवत, एखाद्या करवंदाच्या जाळीच करवंद तोडून हा पायी प्रवास सुखावणारा होता. इथून पुढे आलो की आता सध्या पोल्ट्री लागते. मात्र त्या काळात तिथे असं काही नव्हतं. गावात शिरताना पहिले घर लागायचे ते म्हणजे राऊत यांचं आणि पुढे मारणे. या व्यतिरिक्त तिथे घरं नव्हती. आणि मग पुढे डावीकडे खंडू तात्या शिंदेंच. संपूर्ण गाव शांत वाटत होता. शेमडी बोळातून दोन्ही बाजूला झाडी होती. आणि त्या कमानीतून कृष्णाच्या देवळा पर्यंत चालण्यास वेगळाच फील मिळत होता. मग घरी जाण्या अगोदर कृष्णाच्या देवळात हार घालून पाया पडायचो. त्यावेळी मंदिर आणि पुढील परिसर एकदम रिकामा होता. ना कुठला शेड ना कुठले गेट. मंदिरा समोर फक्त झाडी आणि एका कडेला भेंडीचे झाड बसायला सावली देत होते.

देवाच्या पाया पडून झालं की घराकडे जायला निघत. तेव्हा तिथे कोपरी घालून खंडू शिंदे म्हणजेच गुरुजी सपत्नीक दिसे. मग विचारपूस होत असे. आणखी पुढे आलो की खडकाळ भाग लागत असे. जिथे खडक आणि त्याला गोल गोल असे चार पाच खड्डे. तिथे इंदू आजी असायचा. “आलं दात पडक कोल्ह” असे म्हणत ते मला चिडवायचा. आणि मग त्यांचा नातू विक्रम जो सतत त्यांच्या सोबत असायचा तो ही हसायचा.
“मला आता दात आलेत” असे म्हणून मी उत्तर पण द्यायचो. पण दरवेळी हा ठरलेला प्रश्न आणि उत्तर.

यानंतर मग एका छोट्याशा उंचवट्यावर आमचे मोठे घर वसलेले होते. आता पुढे काय होत असे ? नक्की वाचा पुढच्या भागात.

टीप :- जर संपूर्ण लेख तुम्ही वाचला असेल तर तुम्हालाही तुमच्या भावना आणि आठवणी सांगायची इच्छा नक्की झाली असेल. तुम्हाला वाचून काय वाटलं ? हे मला नक्की सांगा. तुम्ही मला ओळखत असू अथवा नसू. पण मला तुमचे म्हणणे ऐकायला नक्की आवडेल आणि मलाही कळेल की कोणी कोणी वाचले आहे. व्हॉट्सऍप मसेज किंवा कॉल जमेल त्यावर आपले म्हणणे मांडा.

  • संतोष दिवाडकर
    (युवा पत्रकार 8767948054 )

Shilim Village the lost of rurality

श्री कृष्ण मंदिर, शिंदेवाडीचा साधारणपणे ९० च्या दशकातील एक छायाचित्र. हस्तांदोलन राजू दिवाडकर, ताशा वादक नामदेव शिंदे, उजव्या बाजूला खंडू शिंदे आणि इतर काही ग्रामस्थ

About Author

One thought on “Shilim Village : गावखेड्यांचा कायापालट; अर्थात हरवलेलं गावपन

  1. खूपच छान वर्णन केलं आहे….कथा वाचताना डोळ्यासमोर गावचं चित्र उभं राहतं
    Keep going on 👍🏻
    Awaiting for the next chapter.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *