कल्याण-डोंबिवली लेख

Durgadi Fort : भारतीय नौसेना दिन, शिवराय आणि कल्याणचे ऐतिहासिक महत्त्व

भारतीय नौसेना दिन हा दिवस ४ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौसेनेचे जनक म्हणून संबोधले जाते. ( Durgadi Fort ) आजकाल समाज माध्यमांवर याबाबत सर्वाना अवगत झाले आहे. शिवाजी महाराजांनी समुद्री आरमाराची स्थापना केली असल्याने त्यांना नौसेनेचे जनक म्हटले जाते. मात्र त्यांनी हे आरमार कुठे स्थापन केले ? याबद्दलची माहिती सर्वाधिक लोकांपर्यंत आज गेलेलीच नाही.

आरमाराआधीचे कल्याण :- छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्री आरमाराची सुरुवात कल्याण मधून केली. महाराजांच्या जन्मापूर्वी या शहरात परकीय राजवट राज्य करीत होते. पोर्तुगीजांनी पश्चिम किनारपट्टीवर कब्जा केला होता. त्याकाळी कल्याणमध्ये लाकूड आणि वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू होता. कल्याण शेजारील भिवंडी शहरात वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणावर चालत असे. हातमागावर तयार झालेला कपडा जलमार्गाने देखील सर्वत्र पोहोचत असे. याच शहरात शेतीच्या अवजारांची निर्मिती होत असे. यानिमित्ताने व्यापार करण्यासाठी आलेल्या पोर्तुगीजांनी ठाणे खाडी किनारी वखारी बांधल्या. आणि त्याच्या आडोशाला गढी चौक्या देखील उभ्या केल्या.

कल्याण ताब्यात घेऊन किल्ल्याची निर्मिती :- हिंदवी स्वराज्याचा विस्तार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी २४ ऑक्टोबर १६५७ रोजी आदिलशाहीच्या ताब्यात असलेले कल्याण शहर जिंकले आणि स्वराज्यात सामील करून घेतले. खरंतर हा दिवस कल्याण शहर वासीयांसाठी स्वातंत्र्य दिवसच म्हणावा लागेल. कल्याण पाठोपाठ भिवंडी शहर देखील स्वराज्याचा भाग बनले. शिवाजी महाराजांनी कल्याण काबीज केल्यानंतर ठाणे परिसरातील समुद्रातून आत येणारे खाडीमार्ग अभ्यासपूर्ण हेरून घेतले. पोर्तुगीज आणि त्याच बरोबर इंग्रजांचा दूरदृष्टीने विचार करून त्यांनी कल्याणच्या खाडी किनारी दुर्गाडी किल्ला उभारायचे ठरवले. पुढे आबाजी महादेव यांना किल्ला बांधताना अमाप द्रव्ये सापडली. देवीची कृपादृष्टी म्हणून या किल्ल्याला दुर्गाडी असे नाव मिळाले. याच दुर्गाडी किल्ल्यावर आश्रय घेऊन शिवाजी महाराजांनी समुद्री आरमाराची स्थापना केली. अनुभवी आणि कौशल्य असलेल्या तरबेज लोकांकडून त्यांनी जहाजे बांधून घेतली.

जहाजांची निर्मिती :- छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ल्यावरून समुद्री आरमाराची सुरुवात केली. यासाठी त्यांनी गोदी निर्माण केली. जिथून ही जहाजे बनविण्यात आली. त्यांच्या आरमारात तरांडी, तारवे, शिबाडे, गुराबा, पगारा, तिरकाठी, मचवा, पाल, संगमीऱ्या, फत्तेमाऱ्या अशी निरनिराळी जहाजे, गलबते उभी राहिली. त्यांची जहाजे ठाणे खाडीतून दाभोळ, रत्नागिरी, राजापूर आणि कारवारपर्यंत ये जा करत होती. ही जहाजे अरुंद होती व नाळेचा भाग निमुळता असल्याने पाणी कापून वेगही धरत होती. ही जहाजे शत्रूला चकवा देऊन सहज पुढे निघून जात होती. समुद्री स्वराज्याच्या संरक्षणासाठी शिवाजी महाराजांचे आरमार पूर्णपणे सज्ज झाले होते. पुढे याच आरमाराने पोर्तुगीज, इंग्रज, डच, सिद्धी आदींवर जरब बसवली होती.

आरमाराच्या मदतीने कोकण किनाऱ्यावर असलेले किल्ले ताब्यात घेणे आणि ते दुरुस्त करणे, नव्याने काही किल्ले बांधणे असे उपक्रम त्यांनी सुरु केले होते. जस-जशी मराठ्यांची आरमारी ताकद वाढू लागली तसे त्यांचे शत्रू अधिक हालचाली करू लागले.

आरमाराच्या मदतीने समुद्रात साम्राज्य :- १६६० ते १६६४ या काळात सुवर्णदुर्ग , विजयदुर्ग, रत्नदुर्ग, सिंधुदुर्ग असे जलदुर्ग बांधले गेले किंवा त्यांची पुर्नबांधणी केली गेली. कुलाबा आणि खांदेरी हे जलदुर्ग राजांनी १६७८-७९ नंतर बांधले. मराठा आरमार ह्या जलदुर्गांच्या ताकदीवर समुद्रात फिरे. शत्रूस जेरीस आणणे आणि गरज पडल्यास माघार घेत जलदुर्गांच्या आश्रयाला येई. पश्चिम किनारपट्टीच्या सुरक्षेबरोबर राजांनी सागरी व्यापार सुरु केला. त्यासाठी मीठ वाहून नेणारी जहाजे बांधली. मुघलांशी राजकारण करून थेट मस्कतपर्यंत व्यापार सुरु केला. आता आरमार आणि व्यापार एकमेकांच्या जोडीने वाढू लागले. सुरक्षा असेल तर व्यापार वाढतो आणि व्यापारातून झालेल्या फायद्यामधून अधिक प्रबळ आरमार उभे करता येते.

१६६५ पर्यंत संपूर्ण कोकण मराठ्यांच्या ताब्यात आलेले होते. आदिलशहाची सत्ता उखडली गेली होती. मात्र जंजिर्याच्या जोरावर दंडा-राजापुरी सिद्दी धरून होता. मुंबईमध्ये इंग्रज (इस्ट इंडिया कंपनी) अजून स्वतःचे बस्तान बसवत होते आणि गोव्याला पोर्तुगीझ आपली राजधानी राखून होते. शिवाय ठाणे – वसई भाग त्यांच्या ताब्यात होताच.

नवीन जहाजांची निर्मिती :- स्वतःची जशी जमिनीवरची युद्धपद्धती ठरवली होती तशी आता समुद्रावरची युद्धपद्धती ते ठरवत होते. सुरवातीची पद्धत अतिशय सोपी होती. खोल समुद्रात संचार न करता जलदुर्गांच्या संरक्षणाखाली राहून, किनाऱ्या-किनाऱ्याने शत्रूला हुलकावणी देऊ शकतील अश्या बोटी बनवण्याच्या मागे ते लागले होते. तेंव्हा ‘गुराबे’ आणि ‘गलबते’ बनवायची तयारी जोमाने सुरु झाली होती. गुराब हे १५० ते ३०० टन इतकी वजन क्षमता असलेले मध्यभागी रुंद आणि टोकाला निमुळते होणारे असे जहाज असते. ह्यावर २-३ डोलकाठ्या असतात. एकावेळी १५०-२०० सैनिक आणि खलाशी ह्यातून प्रवास करू शकत. गलबत हे आकाराने असून लहान असते. ७०-८० टन क्षमता असलेले हे जहाज फारतर १०० सैनिक वाहून नेत असे. मात्र जलद हालचालीच्या दृष्टीने हे अत्यंत उपयुक्त असे जहाज होते.

व्यापारासाठी धोरण निश्चित :- जस-जसे आरमार सजू लागले तशी त्याची व्यापारी धोरणे सुद्धा निश्चित केली गेली होती. सागरी व्यापारातून मिळणारे सर्व उत्पन्न सरकारी तिजोरीत जमा केले जाई. आरमारात काम करणाऱ्या प्रत्येकाला महिना पगार मिळायचा. कोणालाही सागरी उत्पन्नातून हिस्सा घेण्याची मुभा नव्हती. सर्व सुभ्यांना स्पष्ट ताकीद होती की विविध बंदरामध्ये येणाऱ्या जहाजांना कुठलीही तोशीश लावता कामा नये. त्यांना योग्य ती सुरक्षा देणे हे आरमाराचे काम होते. जर बंदरेच नाही राहिली तर व्यापार कुठून होणार आणि कुठून मिळणार जकात हे साधे तत्व होते. मिळणाऱ्या जकातीवर आणि अधिक व्यापारावर आरमार सजवीत जावे असे राजांचे धोरण होते. फक्त बंदरातच नाही तर दर्यामध्ये देखील उगाच कोणा व्यापारावर उपद्रव करू नये अशी स्पष्ट ताकीद सर्वांना होती. जर चुकून शत्रू पक्षाकडील व्यापाराचे जहाज कुठल्याही बंदरात आले तरी ते लुटू नये, सुभेदारांनी जाऊन त्याची परीक्षा करावी आणि योग्य ते समाधान करावे, त्यांना अधिकाधिक आपल्या कडील जिन्नस विकावे आणि योग्य जकात वसूल करावी असे कागदपत्रांमध्ये म्हटले आहे.

शून्यातून राज्याचे एक नये अंग सजू लागले होते. फक्त पायदळ आणि घौडदळ असलेल्या मराठा फौजेकडे आता आरमार सुद्धा तयार झाले होते. त्याच्या जोरावर ते आता शत्रूला आव्हान देण्यास सज्ज झाले होते.

संकलित लेखन :- संतोष दिवाडकर

संदर्भ :-
https://www.maayboli.com/node/31679

https://www.google.com/amp/s/maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/shivramaya-armaram-thane-creek-and-portuguesa/amp_articleshow/64429383.cms

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *