MSRTC :- यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे १७ ते २० ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या एसटीमधून महामंडळाला १२१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे २० ऑगस्टला एकाच दिवशी तब्बल ३५ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे.
दरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवसातं विक्रमी उत्पन्न मिळत असते. कारण, या दिवशी भाऊ बहिणीकडे किंवा बहिण भावाकडे असे प्रवासी दळणवळण मोठ्या प्रमाणामध्ये होते. परिणामी गेली कित्येक वर्ष रक्षाबंधनच्या दिवशी एसटीला त्या वर्षातील विक्रमी उत्पन्न मिळत आले आहे. यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रक्षाबंधन दिवशी म्हणजे सोमवारी ३० कोटी व दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी तब्बल ३५ कोटी रुपये उत्पन्न एसटीला मिळाले. या दोन दिवसात १ कोटी ६ लाख प्रवाशांनी एसटीमधून सुरक्षित प्रवास केला आहे. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या तब्बल ५० लाख आहे.
रक्षाबंधन सणानिमित्त एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल एसटी महामंडळाने प्रवाशांचे आभार मानले आहेत. तसेच आपल्या घरी सण असून देखील कर्तव्याला प्राधान्य देत अत्यंत मेहनतीने काम करुन विक्रमी उत्पन्न आणणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे देखील हार्दिक अभिनंदन केले आहे.
MSRTC : Ovalani to ST from commuter brothers on the occasion of Rakshabandhan
