केडीएमसी ९-आय प्रभागा अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान संपन्न

कल्याण : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने केंद्र सरकार मार्फत “स्वच्छता ही सेवा” अभियान देशभरात राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्वच्छता ही फक्त प्रशासकीय जबाबदारी नसून प्रत्येक जन आपले घर जसे स्वच्छ ठेवतो तेसेच त्याने आपली गल्ली व आपले शहर स्वच्छ ठेवले पाहिजे या साठी चाललेला हा उपक्रम आहे.

आपल्या देशाला जनजागृतीची सर्वात जास्त गरज आहे. सर्व प्रथम लोकांना या देशात आपले अधिकार समजायला हवेत. देशाचा पाया हा १४० कोटी लोकसंख्येच्या हाती आहे. आपलं घर स्वच्छ असावं असे वाटणाऱ्या नागरिकांना आपलं शहर देश स्वच्छ असावं असं का वाटतं नाही? आपला देश हा सर्व सुविधा पुरवत असताना आपल्या देशाला अस्वच्छ देश असं आपलीच माणसं का बोलतात ही जबाबदारी प्रत्येक जन्माला आलेल्या या भारत देशातील नागरिकांची आहे, की आपण आपलं घर जसं स्वच्छ ठेवतो तसंच आपला शहर गल्ली स्वच्छ झाला पाहिजे. मग देश स्वच्छ होण्यासाठी किती दिवस लागतील?

आज केडीएमसी ९ आय प्रभागात झालेल्या स्वच्छता जनजागृती अभियानात आमदार गणपत गायकवाड, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, सहा.आयुक्त हेमा मुंबरकर, स्वच्छता अधिकारी, शिवसेना युवासेनेचे मधुर म्हात्रे, एल.एल.घुटे, स्वच्छता निरिक्षक मोहन दिघे, चेतना शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच विद्यार्थी, संतोष खामकर उप विभाग प्रमुख, स्वच्छता निरिक्षक रोहिदास पाटील व शेखर उज्जैनवाल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे १०० कर्मचारी, फेरीवाला संघटनेचे सदस्य सह अनेक समाजसेवक, नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे अभियान चेतना शाळा, बुद्ध विहार, एसार पेट्रोल पंप ते नांदिवली कमान, नांदिवली गाव तलाव, आर्य गुरुकुल स्कूल येथे राबवण्यात आले. या वेळेस उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रियांद्वारे जनतेला आवाहन केले आहे की स्वच्छ्ता ही आपली सेवा आहे.

संतोष दिवाडकर

‘Swachhta Hi Seva’ campaign under KDMC 9-I Ward concluded

Dombivli Building Collapse : आयरे गावात कोसळली इमारत; मलब्यात अडकले दोन रहिवाशी

Dombivli Building Collapse : आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी ५:४० दरम्यान डोंबिवली पूर्वेतील आयरे गावातील आदिनाथ बिल्डिंगचा (G+3) काही भाग कोसळला असल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. घटनास्थळी क.डों.म.पा. अग्निशमन दलाचे जवान, फायर इंजिन, आपत्ती व्यवस्थापन टीम, TDRF दाखल असून सदर ठिकाणी मलबा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

सदर इमारतीतील नागरिकांना या अगोदर इमारत खाली करण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाली असल्याची माहिती नसून प्रशासन घटनास्थळी कामकाज करीत असून महापालिका आयुक्तांनी देखील प्रत्यक्ष भेट दिली होती. मात्र या इमारतीच्या मलब्यात दोन रहिवासी अडकले असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

इमारत खचत असताना रहिवासी आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाले. मात्र याच इमारतीत राहत असलेले ७० वर्षीय वृद्ध आणि एक ४५ वर्षीय महिला आजारी असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. आणि काही वेळातच पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इमारत कोसळली. या दोन्ही रहिवाशांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

संतोष दिवाडकर

Dombivli Building Collapse : Building collapsed in Ayre village

Navbharat Saksharta Abhiyan : कल्याण डोंबिवलीत निरक्षरांचे झाले सर्वेक्षण; शिक्षकांची झाली पुरती दमछाक

Navbharat Saksharta Abhiyan : महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार शिक्षण विभागाचे उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या अधिपत्याखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये “नवभारत साक्षरता अभियान उपक्रम २०२२ -२७ अंतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याचे काम दि. १७.०८.२०१३ ते ३१.०८.२०२३ या कालावधीत करण्यात आले. महापालिका क्षेत्रातील ४४६ शाळांतील २३०६ शिक्षकांमार्फत सर्व वार्डातील सर्व कुटूंबाचे सर्वेक्षण यातून करण्यात आले.

शिक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणाद्वारे निरक्षरांचे नाव, लिंग, संवर्गनिहाय माहिती संकलीत करण्यात आली. सर्व प्रभागातील लोकांचे सर्वेक्षण करून निरक्षरांची संख्या निश्चित करून त्यांना ऑनलाईन व ऑफलाईन पदधतीने साक्षर करणे हा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. निरक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण दि. १७.०८. २०२३ ते ३१.०८.२०२३ या कालावधीत शिक्षक सर्वेक्षक, म्हणून आपल्या कुटुबांचे सर्वेक्षण करून निरक्षरांची संख्या निश्चित करणार आहेत.

या कालावधित वय वर्ष १५ ते ३५ आणि ३५ वर्षाच्या पुढील सर्व स्त्री आणि पुरूष दिव्यांग आणि पारलिंगी यांचे सर्वेक्षण करून विगतवारी करून निरक्षर संख्या निश्चित करावयाची आहे. तसेच शाळाबाहय मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल केले जाणार आहे. या सर्वेक्षण उपक्रम अंतर्गत जिल्हास्तर, तालुकास्तर, सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, सिआरसी प्रमुख यांना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र शाळाबाहय व निरक्षर मुक्त करण्यासाठी प्रशासन अधिकारी रंजना राव यांनी सहकार्य करणेकामी महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना आवाहन केले होते. मात्र हे सर्वेक्षण करण्याचे काम शाळेतील शिक्षकांना देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना शिकवण्या बरोबरच घरोघरी फिरून शिक्षकांची चांगलीच दमछाक झाल्याचं दिसून आले. त्याचबरोबर सर्वेक्षणापूर्वी नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देतानाच शिक्षकांच्या नाकी नऊ आले होते.

संतोष दिवाडकर

Navbharat Saksharta Abhiyan : A survey of illiterates was conducted in Kalyan Dombivli

क.डों.म.पा. क्षेत्रातील पदपथांवर सर्रास अतिक्रमणे; पत्रकार धमकी प्रकरणी तहसीलदारां मार्फत राष्ट्रपतींना निवेदन

कल्याण : शहराच्या पूर्व भागातील पूना लिंक रोडवर असलेल्या पदपथावर एका बांधकाम विकासकाने आपले काही सामान मांडून ठेवले होते. याबाबत पत्रकार आनंद गायकवाड यांनी वृत्त प्रकाशित केले होते. यामुळे सदर विकासकांनी त्यांना धमकी दिली असल्याची तक्रार आनंद गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात दिली. यानंतर पत्रकार सुरक्षा कायदा २०१९ अंतर्गत कोळसेवाडी पोलिसांनी संबंधित विकासकांवर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास थेट सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे हे स्वतः करीत आहेत.

विकासकाने फुटपाथवर बांधकामाचे सामान ठेवल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर महानगरपालिकेने विकासकाला दंड ठोठावला होता. मात्र दंडात्मक कारवाई नंतरही पदपथ मोकळा न झाल्याने पत्रकार आनंद गायकवाड यांनी पुन्हा चित्रीकरण केले. याचदरम्यान विकासकांकडून धमकी दिली गेली असल्याचे आनंद गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष दिल्या नंतर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

देशभरात पत्रकारांवर होणारे हल्ले पाहता या घटनांना आळा घालण्यासाठी पत्रकार संघटना पुढे येत असतात. आता या प्रकरणी देखील पत्रकार संघटनेने कल्याण तहसीलदार यांच्या मार्फत थेट राष्ट्रपती व राज्यपाल यांना निवेदन दिले आहे. महानगरपालिकेने गांभीर्याने लक्ष दिले असते तर हा गुन्हा दाखल झाला नसता अशा भावना पत्रकार आनंद गायकवाड यांनी व्यक्त केल्या.

शहरातील पदपथांवर व्यापाऱ्यांचा ताबा?

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पादचाऱ्यांना चालण्यासाठी असलेले पदपथ हे जवळपास गायब झाले असल्याचे चित्र आहे. पूना लिंक रोड सारख्या मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर असलेल्या पदपथावर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केल्याचे चित्र संपूर्ण शहरभरात दिसत आहे. मग हे पदपथ नक्की नागरिकांना चालण्यासाठी आहेत? दिखाव्यासाठी आहेत? की व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी दिलेत? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

पदपथावर अतिक्रमण केल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यावर उतरून चालावे लागते. यामुळे वाहतूक कोंडी तसेच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि या अगोदर असे अपघात झालेही आहेत. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन पदपथावर होणारी अतिक्रमणे रोखणार का? की फक्त दंडात्मक कारवाई करून पुढे परिस्थिती जैसे थे असणार? असा केविलवाणा सवाल आता स्मार्ट सिटीतील नागरिकांना पडला आहे.

संतोष दिवाडकर

Statement to Kalyan Tehsildar of Journalist Association

तहसीलदार व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिक्रिया

ज्येष्ठ नागरिक कट्टा भागात शेड उभारण्यासाठी मनसेचं क.डों.म.पा. ला निवेदन

कल्याण : कल्याण पूर्व ‘ड’ प्रभाग क्षेत्र येथे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्यात आलेला आहे. मात्र सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून ज्येष्ठांना येथे बसण्यासाठी प्रचंड गैरसोय होताना दिसत आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर या भागात त्यांच्या बसण्याच्या जागेवर शेड उभरावेत या मागणीसाठी मनसेच्या शिष्टमंडळाने नुकतेच मनपा प्रशासनाला निवेदन दिले आहे.

शेड बांधल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांची ऊन आणि पाऊस या दोन्ही काळात होणाऱ्या गैरसोयीपासून सुटका होणार आहे. महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे मनसेचे कल्याण लोकसभा क्षेत्राचे जिल्हा सचिव संदीप नावगे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली व त्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. यावर कार्यवाही करून लवकरच शेड उभारणी करून देऊ असे यावेळी उपस्थित शिष्टमंडळाला आश्वासित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

संतोष दिवाडकर

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणूक ‘या’ महिन्यांत होण्याची शक्यता

महानगरपालिका निवडणूक : महाराष्ट्रातील लांबणीवर पडलेल्या महानगरपालिका निवडणुक केव्हा होणार असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. राज्यातील चार महानगरपालिका वगळता सर्व महानगरपालिकांचा कार्यकाळ संपून त्या ठिकाणी प्रशासकीय राजवट सुरू आहे. मात्र आता राज्यातील सत्ता संघर्षानंतर हालचालींना वेग आला असून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून असे संकेत देण्यात आले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रात निवडणुकीचा उल्लेख करण्यात आल्याने सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणूकांचा धुरळा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकींसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी अधिसूचित काढण्यात येत असल्याचा देखील उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे अडीच वर्षे लांबलेल्या निवडणुका आता लवकरच पार पडण्याची शक्यता आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे संकेत दिले होते.

मागील वर्षी २०२२ पर्यंत २७ पैकी २३ महानगरपालिकांचा कार्यकाळ पूर्ण झाला. तर त्याअगोदरच २०२० साली कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि आणखीन तीन मनपाचा कार्यकाळ संपला होता. राज्यातील राजकारणात मागील पाच वर्षांत प्रचंड उलथापालथ झाल्याने आता महानगरपालिका निवडणूकीत कोणता पक्ष याचा फायदा घेईल हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवसेना भाजपाची युती तुटणे, पुढे महाविकास आघाडी तयार होणे, पुन्हा शिवसेना व राष्ट्रवादीचे विभाजन होऊन भाजप सोबत सत्तेत जाणे या सर्व गोष्टींचे पडसाद महापालिका निवडणुकीत उमटणार आहेत.

संतोष दिवाडकर

Municipal elections in Maharashtra are likely to be held in these months

Raj Thackeray in Kalyan : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा कल्याण डोंबिवली दौरा ठरला

Raj Thackeray in Kalyan : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अलीकडेच कोकण दौऱ्यावर असल्याचे पहायला मिळाले होते. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता १२ तारखे पासून ते ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. याच जिल्ह्यात सर्वाधिक बळ असलेल्या कल्याण डोंबिवलीचा दौरा ते १४ आणि १५ तारखेला करणार आहेत. अशी माहिती ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी बदलापूर येथे झालेल्या आढावा बैठकीत मनसे पदाधिकाऱ्यांना दिली.

जवळपास अडीच वर्षे प्रलंबित असलेली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक यावर्षी होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने मनसे आता या शहरात सक्रिय होत असल्याचे संकेत मिळत आहेत. मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी बदलापूर येथे मनसे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी राज ठाकरेंच्या दौर्याविषयी माहिती दिली. रविवार दि.१४ मे रोजी ते कल्याण मधील पदाधिकार्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. तर सोमवारी १५ मे रोजी डोंबिवलीतील मनसे पदाधिकार्यांची ते भेट घेऊन चर्चा करणार आहेत. पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी हा दौरा असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.

कल्याण डोंबिवली प्रमाणेच राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्रितपणे पार पडण्याची शक्यता आहे. मात्र मागील महापालिका पंचवार्षिक निवडणूकित मनसेची सर्वाधिक ताकद ही याच महानगरपालिकेमध्ये आहे. मनसेचे या महानगरपालिकेत १० नगरसेवक तसेच विरोधी पक्ष नेतेपद होते. शिवाय याच मनपा क्षेत्रात मनसेचे आमदार देखील आहेत. मनसेला याच मनपा क्षेत्रात दोन वेळा आमदारपद मिळाल्याने कल्याण डोंबिवलीत असलेली मनसेची ताकद आणखीन वाढविण्यासाठी मनसे आता काय प्रयत्न करणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

संतोष दिवाडकर

Raj Thackeray in Kalyan: MNS President Raj Thackeray’s Kalyan Dombivali Tour

KDMC Corona Update : कल्याण डोंबिवली शहर बनले १००% कोरोनामुक्त

KDMC Corona Update : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र हे जवळपास २ वर्षे ९ महिन्यांनंतर १००% कोरोना मुक्त झाले आहे. आतापर्यंत आलेल्या तिन्ही लाटांमध्ये कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत होता. यानंतर हळूहळू कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आलं. सध्या महापालिका क्षेत्रात बोटावर मोजण्या इतके रुग्ण आढळत होते. मात्र नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार महापालिका क्षेत्रात आता ० सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

कल्याण डोंबिवली शहर आता १००% कोरोना मुक्त झाली आहेत. मात्र त्याचबरोबर भारतात चौथ्या लाटेची शक्यता निर्माण झाल्याने हा शून्याचा आकडा पुन्हा फुटण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. त्यामुळे पहिला रुग्ण सापडल्या नंतर आता प्रथमच शहरात ० सक्रिय रुग्ण संख्या झाल्याचे दिसत आहे.

नव्या वर्षात कोरोनाची चौथी लाट स्वागताला उभी असून तिचा सामना करण्यासाठी आता केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर मागील तिन्ही लाटांदरम्यान महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सत्तेतून पायउतार झाल्यानंतर नव्या शिंदे भाजप सरकार समोर हे आव्हान असणार आहे. महानगरपालिका निवडणुका लांबणीवर पडल्याने कल्याण डोंबिवलीचे नवे शासक आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनाही शहराचा आकडा नियंत्रीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागू शकतात.

संतोष दिवाडकर

KDMC Corona Update : Kalyan Dombivli city became 100% corona free

Kalyan Dombivli : खड्डे बुजवण्यासाठी वाहतूक पोलिस रस्त्यावर

Kalyan Dombivli : कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा केला आहे. पावसाने उसंती देत नसल्याने खड्डे भरण्याचे कामाला अडथळा ठरला आहे का असा प्रश्न उपस्थित होऊन शहरातील रस्त्यावरील खड्डे पाहता हा दावा आता संशोधनाचा विषय ठरला आहे. शहरातून जाणाऱ्या एमएसआरडीसी पीडब्ल्यूडी अंतर्गत असलेल्या रस्त्यावर देखील खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. एकंदरीतच संबधित यंत्रणांकडून खड्डे बुजवण्याचे काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय. त्यामुळे वाहतुकीस अडचण आणि परिणामी होणारी वाहनाची संथ गती आता खड्डे भरण्यासाठी वाहतूक पोलीसच सरसावले आहेत.

नागरिक खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आहेत. तर दुसरीकडे वाहतूक पोलिसांची वाहतूक कोंडी सोडवता सोडवता दमछाक होतेय. त्यामुळे आता कल्याण डोंबिवली शहरात वाहतूक पोलिसांनी खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.

डोंबिवली पूर्वकडील टिळक चौक ते शेलार नाक्यापर्यत पडलेले खड्डे बुजवन्यासाठी पुन्हा वाहतूक पोलीसच सरसवल्याचे आज दिसून आले. वाहतूक व्यवस्थेबरोबर रस्त्यावर अपघात होऊ नये याकरता वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर खडी टाकून तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवून वाहनचालकांना थोडा का होईना पण दिलासा देत प्रशासनाला शिकवण दिली आहे.

-रोशन उबाळे

Kalyan Dombivli : Traffic police on roads to plug potholes

Maratha Morcha : मंगळवारी कल्याण मध्ये मराठा जनआक्रोश मोर्चा

Maratha Morcha : मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी कल्याणमध्ये सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या संदर्भात कल्याणच्या शासकीय विश्राम गृहात नुकतीच बैठक पार पडली. मंगळवारी सकाळी १० वाजता कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे.

या मोर्चाच्या माध्यमातून ५० टक्क्यांच्या आतील मराठा आरक्षण ओबीसी मधून, इडब्ल्यूएस आरक्षण, शासकीय सेवेमधील विद्यार्थ्यांना नियुक्तीचा अडचणीबाबत, सारथी संस्थेमधील विद्यार्थ्यांचे प्रश्न, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचा प्रश्‍न व इतर मागण्यांसाठी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, दिवा, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी, कर्जत, कसारा, मुरबाडसह  संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील सर्व मराठा समाजातील नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

Maratha Morcha: Maratha Janakrosh Morcha in Kalyan on Tuesday