कल्याण : कल्याण पूर्व ‘ड’ प्रभाग क्षेत्र येथे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्यात आलेला आहे. मात्र सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून ज्येष्ठांना येथे बसण्यासाठी प्रचंड गैरसोय होताना दिसत आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर या भागात त्यांच्या बसण्याच्या जागेवर शेड उभरावेत या मागणीसाठी मनसेच्या शिष्टमंडळाने नुकतेच मनपा प्रशासनाला निवेदन दिले आहे.
शेड बांधल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांची ऊन आणि पाऊस या दोन्ही काळात होणाऱ्या गैरसोयीपासून सुटका होणार आहे. महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे मनसेचे कल्याण लोकसभा क्षेत्राचे जिल्हा सचिव संदीप नावगे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली व त्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. यावर कार्यवाही करून लवकरच शेड उभारणी करून देऊ असे यावेळी उपस्थित शिष्टमंडळाला आश्वासित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
–संतोष दिवाडकर
