लेख

Subrata Roy : लाखो कुटुंबांचा ‘सहारा’ तुटला; मुळशी मावळचा पोशिंदा गेला

Subrata Roy : सहारा इंडिया ग्रुपचे प्रमुख, लोणावळ्या जवळील अँबी व्हॅली सिटीचे मालक सुबरोटो रॉय यांचे मंगळवारी वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. त्यांना बीपी आणि शुगर वाढण्याचा त्रास होता. हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर लखनऊ मध्ये अंतिम संस्कार करण्यात आला. त्यांच्या निधनाने मावळ व मुळशी तालुक्यातील भागांत हळहळ व्यक्त केली जात असून हजारो कुटुंबांचा पोशिंदा हरपल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४८ साली सुब्रतो रॉय यांचा बिहारमध्ये जन्म झाला. आणि त्यांचे शिक्षण कोलकाता आणि उत्तर प्रदेशात पूर्ण झाले. अत्यंत कमी वयात देश दौरा घडत असल्याने संपूर्ण देशच त्यांचे घर बनले होते. म्हणूनच ज्या काळात रस्ता, वीज अशा सोयी सुविधा नसतानाही मुंबई पुण्याच्या मध्यभागी असलेल्या लोणावळ्याच्या आतील बाजूस असणाऱ्या खेडोपाड्यात जाऊन त्यांनी आपले साम्राज्य उभे केले. ज्याला अँबी व्हॅली सिटी अथवा सहारा म्हणून ओळखले जाते.

अँबी व्हॅली सिटी आणि आर्थिक क्रांती :- ही सिटी बनविण्यासाठी त्यांनी जमीन खरेदी केली. त्यानंतर परदेशात असणाऱ्या सर्व हायजेनिक सोयी सुविधायुक्त शहरा प्रमाणे त्यांनी एक सुंदर असे शहर तयार केले. या शहराच्या निर्मितीपासून ते आतापर्यंत त्यांना मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागत होते. यासाठी त्यांनी येथील स्थानिक गावकऱ्यांना रोजगार उभा केला. यामुळे सहारा सिटी च्या आसपासच्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या हाताला काम लागले आणि गावातील लोकांना पैसा दिसू लागला. खिशात पैसे खेळू लागल्याने गावकऱ्यांचे राहणीमान सुधारले. मुलांची शिक्षणे झाली, मुलींची लग्न झाली. पैशाला पैसा जोडून शेतकरी व्यवसाय करू लागले.

अँबी व्हॅली सिटी मुळे जवळपास हजारो कुटुंबांचे जीवन सुखकर झाले. पुढील पिढ्यांचे भविष्य देखील सुधारले. आज या भागात अनेक धनदांडगे लोक आहेत. मात्र प्रत्येकाच्या सुरुवातीला सहाराचा सहारा आहे. केवळ अँबी व्हॅली सिटीच नव्हे तर सुब्रतो रॉय यांचे देशभरात अनेक व्यवसाय होते.

सुब्रतो रॉय यांची एकूण संपत्ती : त्यांची एकूण संपत्ती दोन लाख ५९ करोड रुपये असल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर त्यांच्याकडे पाच कॅम्पस आणि जवळपास ३१ हजार एकर जमीन होती. सुब्रतो रॉय यांची जेट एअरवेज, एअर सहारा अशी स्वतःची एअरलाईन होती. लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये आलिशान हॉटेल्स, एक फॉर्म्युला वन टीम आणि आयपीएल मध्ये देखील त्यांनी पुणे वॉरीयर्स इंडिया नावाने टीम बनवली होती. इतकेच नव्हे तर पुण्यातील गहुंजे क्रिकेट स्टेडियम हे त्यांनी बांधलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम होते. काळाच्या ओघात ते त्यांच्याकडून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे आले.

भारताच्या क्रिकेट जर्सीवर २००१ ते २०१३ पर्यंत सहारा इंडिया असे नाव झळकत होते. १३ वर्षे त्यांनी भारतीय संघाला स्पॉन्सर केले होते. मात्र २०१४ पासून त्यांचा पडता काळ चालू झाला आणि त्यांना स्पॉन्सरशिप आणि आयपीएल टीम बंद करावी लागली. पूढे स्टेडियम देखील गमवावे लागले. सेबीचा ससेमिरा पाठी लागण्याने त्यांना दोन वर्षे कारागृहात देखील जावे लागले. यामुळे सहारा परिवार डबघाईला येऊ लागला होता. यानंतर सहारा परिवारने आजपर्यंत कठीण दिवसांचा सामना केला. अशा कठीण परिस्थितीतही सहारा पूर्णपणे बंद झाला नाही. त्यांनी अडखळत का होईना आपले साम्राज्य सुरूच ठेवले. वाढत्या वयात या काळाचा संघर्ष करीत असतानाच शेवटी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुब्रतो रॉय यांच्या जाण्याने दोन्ही तालुक्यातील भाग शोकसागरात बुडाले असून गावोगावी हळहळ व्यक्त केली जात आहे. बिहारमध्ये जन्मलेला एक तारा महाराष्ट्राच्या खेड्यात येतो. तेथील गरीब कष्टकरी गावकऱ्यांना रोजगार देऊन येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य बदलतो. म्हणून सुब्रता रॉय हा या भागाचा पोशिंदा होता असेही म्हणायला हरकत नाही. एकेकाळी काही नसणाऱ्या घरात आजसर्व काही आणि दारातही गाडी आहे. हजारो लाखो लोकांच्या डोक्यावर छत्रछाया देणाऱ्या सुब्रता रॉय यांच्या निधनानंतर सहारा ग्रुप देखील जणू बेसहारा झाला आहे. म्हणूनच आज लोक म्हणतात, “तो आला पण आम्हाला आणि आमच्या जगण्याला ‘सहारा’ देऊन गेला’.

अशा या लाखोंच्या पोशिंद्याला भावपूर्ण श्रद्धांजली !

संतोष दिवाडकर 8767948054

Subrata Roy passed away

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *