टीप :- ज्यांनी सुरुवातीचे चार भाग वाचले नसतील त्यांनी नक्की वाचा अन्यथा कथा आपणास समजणार नाही.पूर्वसूत्र :- मागील भागात आपण पहिले कि करिश्मा आणि गौरव एका सश्याच्या पाठीमागे जाऊन जंगलात हरवतात. तिथे त्यांना एक दहा वर्षाचा लहान मुलगा दिसतो. ज्याला घाबरून ते जंगलात आणखी आत शिरतात. शेकोटी जवळ बसलेले त्यांच्या शोधात निघतात. कॅम्पिंग जवळ सर्वजण गायब झाल्याने सिनियर मंडळी चिंताग्रस्त होतात. आता पुढे….
सर्वांच्या मोबाईलचे टॉर्च सुरू होते. सगळ्यांना घेऊन मी वाट काढीत जंगलातून वरच्या बाजूला निघत होतो. आणि सपकन काहीतरी माझ्या कानाच्या बाजूने गेल्याचे जाणवले. “ए कोणे ? काये?” मी ओरडलो.तसे सगळे काय झालं म्हणून पाहू लागले.तितक्यात आम्हाला समोरून कोणी तरी येत असल्याचे जाणवले. अचानक समोर प्रकाश पेटला. तो प्रकाश एखाद्या जुन्या कंदिलाचा असावा. आणि एक दहा वर्षांचा मुलगा आमच्या दिशेने येऊ लागला. लांब सडक केस, कधीही न धुतलेले, उघडा बंब, मळकी चड्डी. तो आमच्या जवळ आला. “कोण रं तुम्ही ?” त्याने विचारले.”तू कोण आहेस ?” मी विचारले.”थोडक्यात वाचला रं दादा तू. आता माझा बाण लागला असता तुम्हाला. मला वाटलं जनावर आलं म्हणून मी सोडला बाण” तो त्यांच्या कातकरी ट्यून मध्ये म्हणाला.त्यावरून मी ओळखले हा एखादया कातकऱ्याचा मुलगा आहे आणि तो शिकारीला आला आहे. “शिकारीला आलाय का ?” मी विचारले.”शिकारीला आलोय पण काय भेटना आज. फासात तेव्हढा एक ससा गुतलाय. पण मोठं जनावर काय मिळत नाय आज” असे तो म्हणाला.”ए बारक्या इथे कुणी आलं होतं का रे ? म्हणजे एखादा माणूस आणि पोरगा पोरगी ?” अशोकने विचारले.”माणूस नाय ओ माहिती. पण पोरगा पोरगी आलथ इथं” तो म्हणाला”कुठं गेले ते?” संदेशने पटकन विचारले.”अहो इथं माझा फास होता म्हणून काय अडकल बघाय आलो तर मला एक पोरगा नी पोरगी दिसले” तो म्हणाला.”मग कुठे गेले ते ?” ऋषीने विचारले.”मी त्यांच्या जवळ जात होतो तर मला घाबरून इकड वरल्या बाजूला पळाले दोघे” तो म्हणाला.”अरे बारक्या तू दिसतोस असा भुता सारखा. तू आवाज देऊन थांबवायचं ना” विशाल म्हणाला.”आवाज ? आवाज दिला तर जनावर पळून जाईल की” तो म्हणू लागला.”एक काम कर आम्हाला दाखव ते कुठे गेले” स्वप्नील म्हणाला.”अहो हे इथून वर निघा या जाळकांडातुन वाकून पुढं निघा” त्याने बोट दाखवले.”तू चल ना बारक्या आम्हाला नाही ना माहिती” अशोक म्हणाला.”मी कशाला ? इथं जनावर येत. पाण्याचा कोटमा आहे इथं. इथंच असतो मी” तो काही येईना. “अरे चल ना बाळा. आम्हाला काही माहीत नाही रे. तुला पैसे देतो.” प्रसादने खिशातून दहाच्या नोटा काढल्या.”बर चला. माझा कंदील घ्या इकडे.” तो म्हणाला.ऋषीने त्याचा कंदील धरला तसे आम्ही त्याचा मागोमाग जंगलात वरच्या बाजूला निघालो.
“हे मोठं इपरित झालं म्हणायचं” खंडू बुवा म्हणाले.”तुमच्या मालकाला बोलवून घ्या” संदीप सर म्हणाले.”अहो तो मालक गावात राहतो. आणि गाव इथून काय जवळ नाय. एक काम करा तुम्ही तुमची गाडी काढा. आपण मालकाला आणू” खंडू बुवा म्हणाले.तसा जीवन गाडीकडे बघून आला.”अहो सर तो ड्रायव्हर गाडीत नाहीये. त्याला पण नेला वाटत अशोकने” जीवन म्हणाला.”कशाला आणला असला माणूस. ” शिंदे सर वैतागले.”आयला हि काय फालतूगिरीये ? ओ शिंदे सर बघुयात का आपण जाऊन ?” संदीप सर म्हणाले.”नाय नाय तसं करू नका. तुम्हाला माहिती नाय. आणि पोरं पण जाणकार नाय. ती १००% चुकणार आत. कारण जाणकार जरी गेला तरी तो आत गेल्याव सैरभैर होतो. वाट घवत नाय. थांबा आपण सखाराम आबा ला आणू त्याच घर हितून जवळे. ते पक्क हुशारे. रानातलं सगळं माहितीये त्याला.” असे म्हणत खंडू बुवा आत गेले आणि भंडारा घेऊन बाहेर आले. त्यांनी सर्वांच्या माथी भंडारा फासला. “देवा खंडोबा रक्षण कर र बाळ गोपाळाच” असे म्हणत थोडासा भंडारा जंगलाच्या दिशेने फुकुन दिला.
“गौरव मला वाटत आपण इथे दगडाच्या पाठी जरा सेफ आहोत.” असे करिश्मा म्हणते ना म्हणते तेच तिच्या हाताला कसलासा स्पर्श झाला. तिने हात मागे घेतला. “गौरव ? काय झालं?” तिने विचारले.”काही नाही ताई. मलाही वाटत आपण इथे सेफ आहोत. एक काम करू का ? मी ना इथे आग लावतो म्हणजे प्राणी येणार नाहीत” गौरव म्हणाला.दगडाला बिलगलेल्या करिश्माच्या मानेला पुन्हा स्पर्श झाला.”गौरव तू काय करतोयस ?” तिने थोडे रागात विचारले.”अग मी मघाशी बार्बेक्यू पेटवले ना तर माचीस खिशात राहील होत. थांब मी इथे गवत पेटवतो. म्हणजे इशारा मिळेल जो आपल्याला शोधेल त्याला.” उभे राहत गौरव म्हणाला.”गौरव तू तिकडे आहेस ? मग इथे माझ्या बाजूला कोण आहे?” असे म्हणत करिश्मा धावपळ करीत उठली. आणि त्याच्या सोबत उभी राहिली.”काय झालं दीदी आता?” गौरव म्हणाला.”अरे मला वाटलं की तुझा हात मला लागतोय पण तू तर इथे आहेस. तिथे अंधारात कोण आहे बघ बर. ते मघासच पोरग तर नसेल ?” करिश्मा म्हणाली.”अरे पण इथे मला तू दिसत नाहीस. आपण कुठे बसलो तेही दिसत नाहीये.” गौरव म्हणाला.”अरे हे काय इथे समोरच दोन पावलांवर बसलेलो आपण. तू ते माचीस पेटव आणि त्याच्या उजेडावर बघ” करिश्मा म्हणाली.”हा हा थांब” असे म्हणत गौरव ने माचीस पेटवले. आणि जवळ नेले. काहीतरी दिसले आणि तितक्यात माचीस विझले.”गौरव काय आहे तिथे?” करिश्मा घाबरून म्हणाली.”थांब यार काय नीट दिसले नाही.” गौरव म्हणाला.त्याने दुसरी काडी पेटवली. तसा उजेड पसरला. आणि त्या उजेडात त्यांनी जे पाहिले ते पाहून त्यांच्या पाया खालची जमीनच सरकली. दोघेही थरथर कपू लागले. ते दोघे बसलेल्या ठिकाणी एक भले मोठे अजगर बिळातून बाहेर येऊन बसले होते. एनाकोंडा पिक्चर मध्ये असावं अगदी त्यापेक्षा थोडं लहान. पुढ्यात असलेलं अक्राळ विक्राळ अजगर पाहून करिश्माला चक्कर येऊ लागली. दोघे पुन्हा एकदा धावायला लागले. गौरव अंधारातून वाट काढू लागला.
इकडे आम्ही आम्ही चालत चालत एका ठिकाणी आलो. बारक्या क्षणभर थांबला.”आर दादा…. इकड आण जरा कंदील. इथं रान डुक्कर हाय. कुणी मारलं असेल याला ? अर्ध खाल्लं आहे र. बिबट्याने खाल्लं असणार” असे म्हणत तो ते डुक्कर गोणीत भरू लागला.”काय बिबट्या ? पण तुझा केम्पिंगवाला मित्र तर म्हणाला इथं बिबट्या नसतो” संदेशने मला विचारले.”आरं दादा… रानात आलाय तुम्ही. इथे असणारच ना.” तो मुलगा म्हणाला.”ए बारक्या ते जाऊदे आता. ते दोघे कुठे आहेत ते बघू.” अशोक म्हणाला.” थांबा जरा मी गोणी झाडावर ठेवून येतो. मंग घरी जाताना नेता येईल.” तो सरसर झाडावर गेला आणि गोणी ठेवून आला. आणि आम्ही पुढे जायला निघालो.थोडं पुढे आल्यावर आम्हाला मोबाईलचा टॉर्च दिसला.”विशाल अरे मोबाईलचा टॉर्च दिसतोय.” ऋषी म्हणाला. आम्ही त्या उजेडाचा दिशेने निघालो.
इकडे शिंदे सर, जीवन आणि खंडू बुवा सखाराम आबा च्या घरी आले. सखाराम आबाने त्यांच्या नातवाला गाडीवर गणेशला बोलवायला पाठवले. मदतीला चार माणसं मागितली. आणि ते सर्वे वेताळबुवा च्या झाडा जवळ जमले.
“गौरव माझं ऐक. मला त्या एनकोंडा जवळ सोड. मला नाही जमणार आता पळायला. एकदाच काय ते होऊन जाऊ दे ना” करिश्मा रडायला लागली.गौरव देखील घाबरला होता.”ताई एक मिनिटं मी काही तरी करतो.” असे म्हणत त्याने माचीसची काडी ओढली आणि गवतात टाकली. एकच भडका उडाला. सरसर गवताने पेट घेतला. हवेमुळे आग पांगु लागली.
“अरे हा तर गौरवचा फोन आहे” अंकुशने खाली पडलेला फोन उचलला.”आता कुठे गेले असतील ?” अंकुश पुन्हा म्हणाला.”दादा मला वाटत शिकार झाली तव्हा ते इथच होते. म्हणजे ते इथून पळाले असतील. आणि घाबरून फोन पडला असेल.” तो बारक्या सांगू लागला.”तुला काय वाटत कुठे जातील तिथे चल” विशाल म्हणाला.”या माग माग” असे म्हणत आम्ही त्याच्या मागे निघालो.
खंडू आबा, मोरे मेम आणि श्वेता केम्पिंगच्या ठिकाणी काळजी करीत बसले होते.”बाई असं कशाला करायचं यांनी. नसतो आलं ते परवडले असते” मोरे मॅडम म्हणाल्या.”ओ बाबा सापडतील ना ते” श्वेताने विचारले.”हो… मालक आले वाटत बघा. तिकड फटफटीचा आवाज आला. आता घवतील पोर” खंडू बुवा म्हणाले.”काय झालं सर संतोष पण गेलाय का आत रानात ?” बाईकवरून उतरून झाडाखाली थांबलेल्या सरांना गणेशने विचारले.”हो ना… काय मूर्खपणा करताय काय माहीत. एकतर कुणाला काही माहिती नाही.” संदीप सर म्हणाले.पाठीमागून चार पाच टू व्हीलर आल्या. गणेश आठ-दहा पोर मदतीला घेऊन आला.”सर तुम्ही केम्पिंग पाशी थांबा. आम्ही बघतो.” असे म्हणत गणेश, सखाराम आबा आणि त्याचे काही मित्र रानात शिरले. “थांबा मी पण येतो जोडीला” असे म्हणत जीवन देखील त्यांच्या सोबत निघाला.
गौरवने लावलेली आग आता पूर्ण वाढली होती. आगीच्या भीतीने आसपासचे हिंसक प्राणी दूर पळाले होते. पण आता त्याच आगीत ते दोघेही अडकले होते. आगीच्या उजेडाने ते दूरपर्यंत पाहू शकत होते. आणि उजेडात वाट शोधण्याचा प्रयत्न करीत होते.
“आर ह्या काय ? आग लागली का काय ?” संदेशने आगीचा लोट पहिला.”आग लागली नाय र लावली आसल.” बारक्या वेगाने चालू लागला.”कुणी लावली?” अंकुशने विचारले.”तुमच्या मित्रांनी लावली असल. अशी लागत नाही आग. आणि दुसरं कोण येत नाय र इथं. तेच असतील” असे म्हणत आम्ही त्याच्या मागे चालत सुटलो.
जीवन, गणेश आणि त्याचे मित्र पाठीमागून वेगाने डोंगर चढत होते. काट्या कुट्यातून ते वाट काढीत होते.”आबा कुढ गेली असतील पोर ?” गणेशने विचारले.”आर हित जाळी मोडली आहे. वरच्या भागातच असतील. सायरीच्या रानात” असे म्हणत ते ही वाट काढू लागले. गणेशच्या खांद्यावर चापाची बंदूक लोड केलेली होती. अचानक होणाऱ्या कुठल्याही हल्ल्या पासून बचाव करण्यासाठी.
गौरव आणि करिश्मा आगीच्या विळख्यातुन स्वतःची सुटका करतात. दोघेही धुराने काळे झालेले असतात. परंतु ते जीव वाचवून पळत असतात. कारण वणवाही त्यांच्या पाठीमागे वेगाने येत असतो. जर हालचाल केली नाहीतर वणवा त्यांना गाठू शकत होता. नाविलाजाने त्यांनी आणखीन वरच्या बाजूला प्रवास सुरु केला. पाठीमागून येणाऱ्या वनव्याच्या उजेडावर ते पुढचे आणि पाया खालचे सर्व काही पाहू शकत होते.आम्ही देखील आता वनव्याच्या दिशेने पळत होतो. आणि तितक्यात माझा पाय अडखळला आणि मी तोंडावर आपटलो. पण तोंड वाचवण्यासाठी हात मध्ये आणला म्हणून माझ्या हाताला खरचटले. इतक्यात माझ्या पायाला कायतरी पटकन लपेटल्या सारखे झाले. हातातून निसलेला मोबाईल मी उचलला आणि पाहिले तर एका अक्राळ विक्राळ अजगराने माझ्या पायाला विळखा मारला होता.मी बोंबाबोंब सुरू केली. तसे ते पळणारे सर्व थांबले आणि मागे फिरले. अशोक माझ्या जवळ आला आणि तितकाच दूर गेला.भला मोठा अजगर पाहून कुणाचीच पाचावर धार राहिली नव्हती. त्या बारक्या मुलाने पटकन झडप दिली आणि अजगराचे मुंडके धरले.”आर बघू नका साप व्हडा. मी तोंड धरलय.” तो पोरगा ओरडू लागला.सगळे घाबरत होते. तरीही स्वप्नील, संदेश, अंकुश आणि ऋषीने जोर लावला. प्रसाद, अशोक आणि विशालची हिंमत होईना. पण बराच वेळ सुरू असलेली झटापट पाहुन त्या दोघानीही जोर लावला. काही वेळातच अजगर थकला आणि शांत झाला. तसा विळखा सैल झाला आणि मी माझा पाय खेचला.आवळला गेल्याने पायाला मुंग्या आल्या होत्या. “थांबा सोडू नका… मी सांगतो तव्हर.” त्याने सांगितले.तो एका बाजूला आला आणि त्याने एक इशारा केला तसे सर्वांनी अजगराला सोडले. अजगर देखील हळुवारपणे खालच्या बाजूला निघून गेला. मी देखील कसाबसा उभा राहिलो. आणि पुन्हा शोधमोहीम सुरू केली.
“त्या आईच्या गावात ? गण्या ए आरे हिकडं बघ रक्तये कुणाचं तरी?” त्याच्या मित्राने रक्त दाखवले.जीवन आणि गणेश सर्वच धावू लागले.”आर थांबा भ्येता कायला ? जनावरच दिसतंय. शिकार फिकार झाली आताच” सखाराम आबा म्हणाले.”आग बाबो… कसला र वणवा लागलाय. सायरीच्या रानाला?” एकाने वनव्याकडे लक्ष वळवले.”म्हणजे हे सर्व तिकडे आहेत” गणेश जीवन कडे पाहत म्हणाला.”तुम्हाला कस माहिती गणेशजी” जीवन ने विचारले.”जीवन जी हा वणवा अचानक लागू शकत नाही कुनी लावल्या शिवाय. हे सर्व तिकडेच आसपास असणार चला” गणेश म्हणाला आणि सर्व तिकडे चालू लागले.”त्याआयला पोर हिकडं काय रान पेटवून द्यायला आलीत का काय ?” सखाराम आबा देखील पळता पळता बोलू लागले.
त्या बारक्या पोरा माग आमची पळापळ सुरू झाली. आणि समोरून पाच सहा कोल्हे आमच्या दिशेने यायला लागले. बहुतेक आता आपलं खरं नाही असा विचार करून आम्ही सर्वे एकमेकांजवळ बिलगलो. आणि तितक्यात पापणी मिटायच्या आतच एका कोल्ह्याने लांबूनच आमच्यावर झडप घातली.
क्रमशः