टीप :- ज्यांनी या आधीचे भाग वाचले नसतील त्यांनी नक्की वाचा अन्यथा कथा आपणास समजणार नाही.पूर्वसूत्र :- मागील भागात आपण पहिले कि ज्या मुलाला भूत समजून करिश्मा गौरव जंगलात पळतात तो भूत नसून शिकारी असतो. त्यांना शोधायला निघालेल्या माझ्या टीम सोबत तोही सामील होतो. करिश्मा गौरवचा सामना अजगराशी होतो. त्याच अजगराचा सामना लेखकाशी होतो. जंगलात गेलेल्या मुलाच्या शोधात कॅम्पिंग जवळ सर्व बैचेन होतात. जीवन,गणेश आणि काही लोक देखील शोधकार्यात पडतात. इतक्यात कोल्ह्यांचा एक टोळक लेखक आणि त्याच्या समवेत असणार्या लोकांच्या अंगावर येते. आता पुढे वाचा कथेचा शेवटचा टप्पा…..
त्या बारक्या पोरा माग आमची पळापळ सुरू झाली. आणि समोरून पाच सहा कोल्हे आमच्या दिशेने यायला लागले. बहुतेक आता आपलं खरं नाही असा विचार करून आम्ही सर्वे एकमेकांजवळ बिलगलो. एका कोल्ह्याने लांबूनच आमच्यावर झडप घातली. पुन्हा एकदा माझ्या कानाजवळून सपकन काही तरी गेल्याचा आवाज झाला. आणि मी पाहिले तर तो कोल्हा जमिनीवर तरफडू लागला होता. नंतर मला समजले की त्या बरक्याचा बाण पुन्हा एकदा माझ्या जवळून गेला. कारण तो आवाज दुसऱ्यांदा कानावर पडला होता. त्याच्या बाणाने थेट कोल्ह्याच्या तोंडाचा वेध घेतला होता. त्यानंतर तो मुलगा आमच्या पुढ्यात गुडघ्यावर बसला. त्याने पाठीमागे हात नेत एक बाण काढला आणि विजेच्या वेगाने समोर सोडला. एका मागोमाग एक त्याने आणखी दोन कोल्ही उतानी केली. ते पाहून बाकीची पळून गेली. आमच्या समोर तीन कोल्हे मरून पडले होते.”बारक्या तू नसता ना आज आमचं सगळ्यांच कामच झालं असत” अशोक त्याच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला.”आज तुमच्या मुळ शिकार झाली. नायतर मी कोटम्याव रातभर बसून एक ससा नेला असता तेवढा.” तो ही खुश झाला. त्याने ते मेलेले कोल्हे एका ठिकाणी ठेवले. आणि आम्ही पुन्हा वनव्याकडे पळ काढला.
“एक मिनिटं सगळ्यांनी वरून व्हा” सखाराम आबाने पोरांना अचानकपणे थांबवले.”काय झालं आबा ?” गणेशने खांद्यावरची बंदूक काढली.”आर माझ्या कडचा बेटरीचा फोकस लय डेंजर. हे बघ काय” त्याने टॉर्च मारली.”आग बाबो… कसल मोठं जनवार आहे ते… हे तर माणूस गिटिन एखादा” एक मुलगा म्हणाला.”केमेरा पण नाही नाहीतर या अजगराचा फोटो व्हिडीओ घेतले असते. फोन पण नाही आणला शीट” जीवन तळमळ करू लागला.”पाव्हन माझा फोन देऊ का ?” गणेशच्या मित्राने विचारले.”अरे पण त्याच्या जवळ कोण जायचं. केमेरा असता तर झूम केलं असत.” जीवन म्हणाला.”चला वरून व्हा पोराव. लवकर बघू तिकड जाऊन” असे म्हणत पुन्हा पळापळ सुरू झाली.
करिश्मा आणि गौरव धावत धावत एका ठिकाणी आले. तिथे वणव्याची फिकीर नव्हती. पण उजेडावर त्यांना सर्व काही दिसत होते. आणि आम्हालाही ते दोघे दिसत होते.”आर दादा ते दोघ सापडले र” बारक्या पळता पळता थांबला.”कुठंय?” घामाने भिजलेले आम्ही धापा टाकत एक सुरात म्हणालो.”ते बघा तिकडं लांब पायथराला शिखराच्या” असे म्हणतात आम्ही वर पाहिले.वर जाणे आता शक्य नव्हते. वर आता एक उंच शिखर दिसत होते. आता वरती जायचं म्हणजे थेट शिखराच्याही वरती असे तो बारक्या म्हणत होता. “गौरव….” अंकुशने आवाज दिला. “दादा वणव्याचा आवाज हाय र… तिथं आवाज पोहोचायचा नाही.” बारक्या असे म्हणाला आणि त्या दिशेने निघाला. आम्ही त्याच्या मागे निघालो.
“देवा खंडोबा रक्षण कर र पोरांचं” खंडू बुवा सारखे भंडारा फुकत होते. “अहो शिंदे मला वाटतंय वणवा लागलाय रानात. दिसतंय का तुम्हाला?” असे म्हणत संदीप सर केम्पिंग पासूनच पाहू लागले. दूरचे पाहण्यासाठी शिंदे सरांनी चष्मा काढला आणि शर्टाला पुसू लागले. तोच पाठीमागून धक्का लागला आणि हातातला चष्मा सटकून तो खाली पडला. तसा त्याच्या काचा फुटल्या. “अहो मॅडम काय हो” शिंदे सर म्हणाले.”अहो अप्पा मी नाही मी इथे आहे” मोरे मॅडम म्हणाल्या.”मग मला धक्का कुणी दिला?” असे म्हणत शिंदे सर मागे वळले.हातात बाटली घेऊन ड्रायव्हर सम्राट डुलत डुलत पाहत होता. “ही ही ही सॉरी हा सर जी. गलती से मेरा पैर फिसला और धक्का लगा” ड्रायव्हर हसत बोलू लागला.शिंदे सरांनी त्याच्या हातातली बाटली खेचली आणि लांब धरणाकडे फेकून दिली.”हराम** तू काय ठरवलंय का मला त्रास द्यायचं” शिंदे सर वैतागले.”आरे बाबा तू जा इथून तुला हात जोडतो मी सम्राट जी” संदीप सरांनी त्याला पुन्हा तिथून जायला सांगितले. शिंदे सरांनी चष्म्याची फ्रेम उचलून खिशात ठेवली.
आता आम्ही देखील गौरव करिश्मा जवळ पोहोचलो होतो. “ए करिश्मा ताई…. ते बघ ते… संतोष,विशाल, संदेश… सगळे आलेत आपल्याला शोधत” गौरवने आम्हाला पाहिले.करिष्माने मान वळवली आणि आम्हाला पाहून ती रडायला लागली. तिला आम्हाला पाहून अश्रू अनावर झाले. दोघेही उठले आणि हळूहळू आमच्या दिशेने यायला लागले आणि आम्ही त्यांच्या. दमलो असल्याने अगदी हळुवारपणे आम्ही चालत होतो. वणव्याचा प्रकाशात सर्व काही दिसत होते. “ए बारक्या इथे हाड हाड का पडलेत रे बघावं तिथं” ऋषीने विचारले.”ओ या भागात कुणी येत नाही किंवा आलं नाही कधी. मी स्वतः पहिल्यांदा येतोय” तो बोलला.”बापरे आपण मग चांगलीच एडव्हेंचर केलंय आज” अंकुश म्हणाला.”आ…. आर दादा… शssss आवाज करू नका…” त्याने आम्हाला थांबवले आणि तो कावरा बावरा होऊन आजूबाजूला पाहू लागला. “ए बाबा काय झालं भुताडकी आहे का इथं?” मी विचारले.”आर दादा आपण शिखरा पाशी आलोय. आणि इथं हडक पण आहेत.” तो मागे पाहून म्हणाला.”म्हणजे?” विशालने विचारले.”म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे” असे म्हणत ऋषी हसायला लागला आणि खिशातील पुडी काढली.”बरोबर बोलला र दादा” बारक्याने ऋषीला सांगितले.”ए काय बरोबरे ? तुला काय म्हणायचंय ते सांग नक्की?” विशालने विचारले.”म्हणजे दादा इथं वाघ आहे” बारक्या दबक्या आवाजात म्हणाला.वाघ म्हणताच आम्हाला परत घाम फुटला. सर्वांना धड धड व्हायला लागली. आम्ही इकडे तिकडे नजर फिरवू लागलो.”म्हणजे आता नसेल ना तो?” विचारता विचारता ऋषीच्या हातातली पुडी निसटून खाली पडली. “आता हाड दिसतायत ना इथं. मग वाघ पण इथंच आहे” बारक्या म्हणाला.आम्ही पुरते घाबरलो. संदेशने दोघांना पटापट येण्याचा इशारा केला. “असू द्या घाबरू नका. आख जंगल हिंडलो. काय झालं का ? बारक्या सोबत आहे ना?” अशोकने धीर दिला.
गौरव आणि करिश्मा आमच्या दिशेने येत होते. आणि वाटेतच त्यांच्या डाव्या बाजूला एक भलेमोठे भगदाड होते. “अय्या हे काय ?” करिष्माने गौरवला ते भगदाड दाखवत विचारले.”काय माहिती ? भुयार बियार असेल” गौरव म्हणाला. “इथे खजिना असेल का रे?” करिश्माने हसतच विचारले.”हो का…. त्या लोकांना बघून लय जोर आला वाटत तुला?” गौरव म्हणला.ते पुढे निघणार तितक्यात आतून आवाज आला.”कसला आवाज हा ?” करिष्माने विचारले.”हा आवाज पहिल्यांदा ऐकलाय. पण हा आवाज ऐकल्या सारखे वाटते. पिक्चर मध्ये” गौरव म्हणाला.”गौऱ्या…. हे भुयार नाही…. ही गुहा आहे..” करिश्मा शांतपणे म्हणाली.”आणि तो आवाज नाही ती डरकाळी होती” गौरव देखील शांतपणेच म्हणाला.दोघेही जोरात ओरडले आणि आमच्या दिशेने पळू लागले.
“आरं ए गणेश खाली आरडाओरडा झाला का र ?” सखाराम आबाने कानोसा घेतला.”आबा आबा पोर दिसतायत पलिकडे” जीवन ओरडला.तसे वरच्या म्हणजेच गुहेच्या बाजूने ते सर्व धावत येऊ लागले. एक मोठी डरकाळी फोडत एक भलामोठा वाघ गुहेतून उडी घेऊन बाहेर आला. बापरे मी टीव्ही आणि राणीच्या बागेत पाहिला त्यानंतर आता पाहिला. एक पट्टेदार वाघ. अतिशय धिप्पाड. लांब लांब मिश्या , भलेमोठे तोंड. आणि तितकाच मोठा त्याचा जबडा व त्यातून दिसणारे सूळया सारखे त्याचे दात. पाहताक्षणी एखादा चक्कर यावा असा तो वाघ. तुम्ही या ठिकाणी मोगली चित्रपटातला शेरखान आठवलात तरी चालेल.
गौरव आणि करिश्मा पुढे पळत होते. त्या वाघाने एकवार नजर टाकली. पंजाने जमिनीवर पाय विखुरले आणि त्यांच्या पाठीमागे तो लागला. पळता पळता करिष्माचा पाय अडखळला आणि ती पडली. गौरव तिला उचलत होता. तोच वाघ त्यांच्या अगदी जवळ येऊन थांबला. दोघेही त्या वाघाकडे पाहत होते. त्यांच्यात जेमतेम दहा बारा पावलांचे अंतर उरले होते. वाघाने त्यांच्या कडे पाहत गदागदा मान हलवली आणि आकाशात पाहत डरकाळी फोडली. त्या आवाजाने सारे जंगल दुमदुमले.”ओह माय गोड” अंकुश उद्गारला.इतक्यात बारक्या गुडघ्यावर बसला. तसा आमच्या जीवात जीव आला.”कम ऑन बारक्या” कपाळावरून घाम टिपत संदेश म्हणाला.बारक्याने धनुष्य हातात धरला. आणि एक हात मागे नेत बाण चाचपडला.”बारक्या बाहुबली ची स्टाईल बंद कर आणि सोड बाण” अशोक बोलला.”आर दादा चार बाण होते… संपले” बारक्या पुन्हा उठला.”आरे तीन कोल्हे मारले… चौथा बाण काय केला ?” विशालने विचारले.”अहो दादा पहिलाच बाण तुमच्या बाजूने नाय का गेला?” त्याने माझ्या कडे पाहिले. आता म्हटलं काही खरं नाही. आता काय करावं सुचेना.
वाघाने चार पावले मागे घेतली.”चालला वाटत?” अंकुश हळूच म्हणाला. तितक्यात मला अक्षय कुमारचा डायलॉग आठवला.’शेर जब चार कदम पिछे जाता हे तो वो झपटने के लिये’ असं आठवलं आणि म्हटलं आता संपलं. तितक्यात वाघाने एक उंच झडप घेतली. त्या दोघांनी डोळे मिटले. आम्ही देखील माना वळवल्या. तोच एक जोरात बार झाला. आणि धाडकन वाघ कोसळला. आम्ही माना वर करून पाहिले. समोर पाहतो तर काय ? वाघाच्या मागे काही अंतरावर गणेश उभा आणि त्याच्या खांद्यावर बंदूक. नेम धरून तो तसाच उभा होता. वेळेवर येऊन त्याने आम्हाला वाचवले होते. करिश्मा गौरव दोघेही उठून उभे राहिले.
“आरे तुम्ही काय पागल आहेत का रे ? इथे कशाला आलात ?” जीवन वैतागून म्हणाला.”ओ जीवन शेठ इथं काय बोलू नका. खाली जाऊन बोलू. नक्की काय झालं ते तिथे गेल्यावरच समजेल.” विशालने जीवनला शांत केले. “ठेंक्स गणेश बरे झाले तू इथे आलास वेळेवर. नाहीतर आता आमचं काही खरं नव्हतं.” मी त्याचे आभार मानले.तो मात्र सैरभैर झाला होता.”संतोष चला इथून” त्याने सर्वांना चलायला सांगितले. “तू असा का पाहतोयस ?” मी विचारले.”अरे गोळी लागली पण वाघ कुठे गेला ?” गणेश असं म्हणताच सर्वांची पुन्हा एकदा घाबरकुंडी उडाली. फार काही न बोलता आम्ही तिथून पावलं उचलीत घाईने निघालो. “काय नाय गोळी लागल्यावर पळाला असेल” ऋषी घुटकी गिळत म्हणाला.पुन्हा एकदा माझ्या डोक्यात फिल्मी डायलॉग आला. ‘जखमी शेर और खतरनाक होता हे’ आम्ही सर्व काळजीपूर्वक चालत होतो.
अचानकच वरच्या बाजूने वेगाने वाघाने हल्ला केला आणि त्याने थेट गणेशवर झडप घातली. काही कळायच्या आतच गणेश खाली कोसळला आणि घरंगळत खाली गेला. त्याच्या खांद्यावरची बंदूक देखील निसटून एका बाजूला पडली. त्याच्या डोक्याला थोडा मार लागला व रक्त यायला लागले. वाघाच्या देखील पाठीला गोळी लागल्याने तो ही रक्तबंबाळ झालेला. दोघेही एकमेकांसमोर उभे होते. वाघ एक एक पाऊल त्याच्या दिशेने जात होता. तो एक एक पाऊल मागे टाकत होता. वरतून आम्ही सर्वे पाहत होतो. “आर यार दादाने आमचा जीव वाचवून स्वतःचा जीव धोक्यात घातला.” करिश्मा रडकुंडीला येत म्हणाली.गौरवने तिचे उद्गार ऐकले आणि त्यानेही खाली उडी घेतली. “गौऱ्या…. ” करिश्मा जोरात ओरडली.गणेशच्या हातातून निसटलेली बंदूक गौरवने उचलली. “ए पोरा बंदूक आन लवकर वर एकच बार आहे त्यात. डबल बारीची आहे ती. घालतो वाघावर. आन इथे” सखाराम आबाने हाक दिली. वरती आम्ही खाली वाघ आणि गणेश आणि मध्यभागी बंदूक घेऊन गौरव उभा असे चित्र होते. सगळं काही वनव्याच्या उजेडावरच सुरू होत आणि दिसत होत.
सखाराम आबा पर्यन्त बंदूक आणून देई पर्यन्त गणेशच्या नरडीचा घोट वाघ घेणार होता. म्हणून गौरवने बंदूक स्वताच्या खांद्यावर ठेवली. “ओ तेरी… हा काय करतोय ?” अंकुश आश्चर्य व्यक्त करीत एक पूल पुढे आला.”याला बंदूक चालवता येते ? हा वाघ मारेल का?” गणेशच्या एका मित्राने आम्हाला विचारले.”याने कधी ऑफिसमध्ये मुंगळा नाही मारला हा वाघ कधी मारणार ?” संदेश हळूच बोलला.”याने दिवाळीत पण बंदूक नाही चालवली” मी असं म्हणताच सखाराम आबा चक्कर येऊन खाली पडले. गणेशची पावलं थांबली. एका झाडाला येऊन गणेश थांबला. आता त्याला मागे जाता येईना. म्हणून त्याने गुडघ्यावर बसून घेतले आणि स्वतःला त्याच्या स्वाधीन केले. आता आमची दुसरी नजर गौरव वर खिळली. वाघ अगदी गणेशच्या जवळ गेला. गौरवच्या नेम धरणार पण थरकाप उडाल्याने त्याच्या खांद्यावरून बंदूक निसटली आणि खाली पडली. “अरे यार….” जीवनने डोक्याला हात लावला.
“सखाराम आबा खाली जा उठा” चक्कर येऊन पडलेल्या आबाला पोर उठवू लागली. गौरवने पुन्हा बंदूक उचलली. वाघाने गणेशच्या अगदी जवळ आला. त्याने गणेशचा वास घेतला. आणि जिभेने त्याच्या डोक्यावरचे रक्त चाटले. आणि तसाच तो मागे फिरला. पण आठ दहा पावले मागे वळताच गणेशने डोळे उघडले. मागे आलेला वाघ पुन्हा त्याच्या दिशेने धावला. एक उंच झेप त्याने घेतली. आणि डरकाळी फोडत गणेशच्या अंगावर झेपावू लागला. गणेशने डोळे पुन्हा मिटले आणि हात वर केले. इकडे मी जोरात ओरडलो.”गौरव किल….”किल शब्द ऐकताच गौरवने बंदुकीचा चाप ओढला. गोळी बंदुकीच्या नळीतून बाहेर पडली. काही कळण्याच्या आतच गोळी वाघाच्या डोक्यात शिरली. गोळी लागताच वाघ खाली कोसळला. आणि गतप्राण झाला.
“येह…. फट्टासा हेडशोट” असे म्हणत गौरव जोरात ओरडला. आम्ही सगळे काहीवेळ पाहतच राहिलो. गणेश देखील एक वेळ वाघाकडे, एकवेळ गौरवकडे आणि आमच्याकडे पाहू लागला. आम्ही सर्वांनी धपाधप खाली उड्या घेतल्या. गणेशच्या मित्रांनी गौरवला उचलून घेतले आणि नाचायला लागले. मी त्याच्या डोक्यावर जोरजोरात कुरवाळून शाबासकी दिली. आम्ही क्रिकेट मॅच सारखं सेलिब्रेशन करू लागलो. सखाराम आबा शुद्धीवर आले आणि त्यांना काय झाले कळेनाच. ते पुन्हा बेशुद्ध झाले. “आरे तू होळीला बंदूक वापरीत नाय. आन तुला कस जमलं हे ?” जीवन हसतच गौरवला विचारू लागला. “हा रे कसं काय ? ते पण डायरेक्ट डोक्यात हेडशोट ?” अंकुशने ही विचारले.
“भाई पबजी…. ” गौरव उद्गारला.”पबजी ??” विशालने विचारले.”पब्जीचा अनुभव कामी आला. संतोष किल म्हणाला आणि पब्जी समजून मी नेम धरला. किल….” गौरव म्हणाला.आम्ही सगळे हसायला लागलो. त्यानंतर आम्ही सर्वे उठलो आणि केम्पिंग कडे निघालो. रात्रभर काय झालं हे सगळं आम्ही केम्पिंग कडे येऊन कथन करीत होतो. आमची चित्तथरारक गोष्ट ऐकून सगळे भारावून गेले होते. जो तो आपला आपला किस्सा सांगत होता. की त्यांनी काय काय पाहिलं. जो ससा पाहून गौरव करिश्मा रानात गेले तो बारक्याच्या फासात अडकला होता. आणि बारक्याला घाबरूनच पुढे जे घडले ते घडले. बारक्याने गौरव आणि करिश्माला तो ससा दिला. आणि रान डुक्कर घेऊन तो त्याच्या घरी गेला. सकाळ होत आली. आम्हाला रात्रभर झोप नसल्याने आम्ही दमलो होतो. पण आता झोपलो तर केम्पिंग ची मजा येणार नव्हती. तरी गणेश म्हणाला तीन चार तास झोपा आपण करूच मजा. आणि आम्हाला रूम मध्ये बिछाना घालून दिला.
शिंदे सर टॉयलेट कडे गेले. पण पाहता तर आमचा ड्रायव्हर त्या संडासात पिऊन आडवा झालेला.”आरे बाबा तू काय माझी पाठ धरलीस ? चल उठ हो बाहेर” शिंदे सर जोरजोरात आरडाओरडा करू लागले. पुन्हा संदीप सर हसत हसत तिथे गेले आणि त्यांनी ड्रायव्हरला तिथून बाहेर नेले. दुसऱ्या दिवशी आम्ही केम्पिंग मध्ये खूप धमाल केली. पण खरं सांगतो खरं एडव्हेंचर ना रात्रीच आजमावल होत. अगदी जीवावर बेतणार एडव्हेंचर. जे आमच्या या आठवणीत कायम बसणार होत.धन्यवाद !
टीप :- वरील कथा पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाशी त्याचा कसलाही संबंध नाही. कथेतील काही पात्र ही लेखकाच्या परिचयाची असून इतर पात्रे तयार करण्यात आली आहेत. मनोरंजनाच्या दृष्टीने लिहलेली ही कथा काल्पनिक असल्याने कोणत्याही वन्य प्राण्यांची हिंसा होणे देखील काल्पनिकच आहे. वन्य प्राण्यांची हत्या करणे कायद्याने गुन्हा असून आम्ही त्याचे समर्थन करीत नाही. याउलट प्राणी मित्र म्हणून आम्ही निसर्गाचे ऋणी आहोत. त्याचबरोबर २०२० ची हि शेवटची कथामालिका देखील इथेच संपत आहे. भेटूयात नव्या वर्षात नव्या उमेदीत आणि काही नव्या कथा व संकल्पनासह. तो पर्यंत धन्यवाद !!!!