कल्याण :- कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी पालिका आयुक्तांनी कृती आराखडा तयार केला आहे. या अनव्ये कारवाईसाठी पालिका क्षेत्रातील प्रभाग क्षेत्र अधिकार्याची खांदेपालट करून पालिकेची अनधिकृत बांधकामा प्रकरणी मलीन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. काही प्रभाग क्षेत्र अधिकार्याची अन्य प्रभागात बदली करण्यात आली तर तीन विद्यमान प्रभारी प्रभाग क्षेत्र अधिकार्याची उचलबांगडी केली आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिका हि अनधिकृत बांधकामांची बजबजपुरी म्हणून ओळखली जात असून गेल्या दोन दीड दशकात लाखो अनधिकृत इमारती व चाळी उभारल्या गेल्या आहेत. कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील आरक्षित जागेवर रात्री अपरात्री अनधिकृत इमलेच्या इमले अनधिकृत पणे उभारले जात असून त्याला पालिकेच्या काही अधिकार्यानाचा छुपा आशीर्वाद असल्याने अनधिकृत बांधकामे हि प्रभाग क्षेत्र अधिकार्यांना भ्रष्टाचाराची कुरणे बनली आहेत असा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे. प्रभाग क्षेत्रपदी विराजमान होण्यासाठी सर्वच खाबुगीरि करणार्याची धडपड सुरु असते. अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या अतिक्रमान विभागाचे कर्मचारी व प्रभाग क्षेत्र अधिकार्यांना वेळे प्रसंगी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
पालिका आयुक्तांनी पालिकेतील अनधिकृत बांधकामांना वेसण घालण्यासाठी तसेच बेकायदेशीरपणे उभारल्या गेलेल्या बांधकामावर कारवाई साठी कृती आराखडा तयार केला असून या बेकायदेशीर बांधकामावर येत्या १५ दिवसात कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज झाली आहे. पालिका आयुक्तांनी गेल्या अनेक वर्षा पासून प्रभारी प्रभाग क्षेत्र अधिकारी पदावर चिटकून बसलेल्या अधिकार्यांना आता नारळ दिला आहे तर काही प्रभाग क्षेत्र अधिकार्यांची अन्य प्रभागात प्रभागक्षेत्र अधिकारी पदी बदली केली आहे. अनधिकृत बांधकामांना आळा बसत असल्याने आता काळा मलिदा खाणारे पालिका अधिकारी, बांधकाम व्यावसायिक हडबडून गेले आहेत. तर बांधकामांच्या तक्रारी करून ब्लॅकमेलिंग करून पैसा खाणारे स्वयंघोषित समाजसेवक यापुढे कसे गुजारण करावे या विचारात पडलेले आहेत. मात्र अनधिकृत बांधकाम बंद झाली तर शहरांचा विकास हा निश्चितच होऊ शकतो.
-रोशन उबाळे