पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यातील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. उरवडे येथील क्लोरिफाईड कंपनीत ही घटना घडली. या दुर्घटनेत १५ महिला व दोन पुरुष कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे. संबंधित कंपनीचं नाव ‘एसव्हीएस एक्वा टेक्नॉलॉजिस’ असं आहे. मृतांची संख्या अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आग कशामुळं लागली हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.
मुळशी मधील उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या रासायनिक कंपनीला आज दुपारी दोनच्या दरम्यान आग लागली. या ठिकाणी पंधरा ते वीस कामगार अडकून पडले असल्याची प्राथमिक माहिती होती.
या केमिकल कंपनीत सकाळी ४१ कर्मचारी कामासाठी आले होते. या ४१ पैकी १७ लोकं मिसिंग आहेत. त्यापैकी १५ महिला आणि दोन पुरुष आहेत. आतापर्यंत आठ ते दहा मृतदेह जळून खाक झालेल्या अवस्थेत मिळाले, अशी माहिती स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांनी एका वृत्तसंस्थेला दिली. आग लागलेली कंपनी आहे त्या कंपनीत सॅनिटायजर तयार केले जाते. सॅनिटायजर सारखा ज्वलनशील पदार्थ असल्याने यंत्रणा कितपत काम करते हे पाहाव लागेल, असं आमदार संग्राम थोपटे म्हणाले.
कंपनीला लागलेली आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. केमिकल कंपनीत सॅनिटायझर निर्मिती होत असल्यानं आग मोठ्या प्रमाणावर भडकल्याची शक्यता आहे. आग लागलेलं ठिकाण शहरी भागापासून लांब असल्यामुळे अग्निशमन दलाची वाहनं पोहोचण्यास उशीर लागत होता.मात्र सध्या आग आटोक्यात आली असून कुलिंगचे काम सुरू असल्याची माहिती आहे.