कल्याण पूर्व भागात अंतर्गत रस्ते रुंदीकरण होणे तसेच दुरुस्ती होणे सध्या फार गरजेचे ठरत आहे. मुख्य रस्ता ते अंतर्गत रस्ते कनेक्टिव्हिटी समाधानकारक नसल्यामुळे वाहतूक कोंडीला कल्याण पूर्वेच्या जनतेला नेहमीच सामोरे जावे लागत आहे.

प्रभाग क्रमांक १०० तिसगाव गावठाणचे मा. नगरसेवक देवानंद गायकवाड तसेच प्रभाग क्रमांक ८८ संतोष नगरचे मा. नगरसेवक महेश गायकवाड यांनी आमराई ते तिसगाव पर्यंत जाणाऱ्या रस्ता दुरुस्तीसाठी महानगरपालिका प्रशासन व आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येत आहे. चिंचपाडारोड, विजय नगर मार्गे आता शंभर फुटी रोड तसेच तिसगाव गावठाणात जाणे आता या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे सोयीस्कर होणार आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू असली तरी कल्याणमधील अनेक ठिकाणच्या रस्त्याचे डांबरीकरण व खडीकरण होत असल्याने नागरिकांना यातुन दिलासा मिळतोय.