राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी कल्याण डोंबिवलीमध्ये या महाविकास आघाडीत केडीएमसी निवडणुकीच्या आधी फुट पडण्याची चिन्हे दिसत आहेत. याचे कारण हि तसेच असून शिवसेनेचा भाग असलेल्या युवा सेनेतील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला जोर आला आहे.
कल्याण पश्चिममधील शिवसेना युवा सेना कार्यकर्त्यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री अदिती तटकरे, चिपळूणचे आमदार शेखर निकम व कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कल्याण डोंबिवली जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.वंडारशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र प्रदेश कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (युवा सेना) कल्याण पश्चिम येथील युवासेना विभाग अधिकारी निखिल कदम, युवासेना उपविभाग अधिकारी रिकी चक्रवर्ती, युवासेना उपशाखा अधिकारी रोहन सोनवणे, समाजसेवक ब्रिजेश कांबळे यांच्यासह युवासेनेच्या गट अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
झालेल्या या प्रवेशामुळे आगामी काळात होणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला एकप्रकारे सुरवात झाली असून निवडणुकीत शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र लढणार कि स्वतंत्र याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान शिवसेना युवासेनेतील स्थानिक राजकारणाला कंटाळून या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची विचारसरणी पटली आहे. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद कल्याण मध्ये अधिक प्रमाणात वाढेल यात तिळमात्र शंका नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र प्रदेश कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांनी यावेळी दिली.
-कुणाल म्हात्रे