‘एक आदर्श घालूया- नियम पाळून श्रीगणेश उत्सव साजरा करु या’ असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज केले. 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत साज-या होणा-या गणेशोत्सवाबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबर दुरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झालेल्या बैठकीत माहिती देतांना त्यांनी हे आवाहन केले.
कोरोनाचे संकट पाहता यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून परवानगी साठी त्याचप्रमाणे फायर एनओसीसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही तथापि सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी तसेच इमारतीमध्ये बसविल्या जाणा-या गणेश मंडळांनी देखील फायर एनओसी घेणे अत्यावश्यक आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

या वर्षीच्या गणेशोत्सवाकरीता महापालिका सज्ज असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वाहतूक शाखा यांचा ना-हरकत दाखला, अग्निशमन विभागाच्या ना-हरकत दाखला, म.रा.वि.वि.कं.लिमिटेड यांच्याकडील तात्पुरती परवानगी व पोलिस स्टेशनच्या ना-हरकत दाखला इ. करीता संबंधित प्रभागक्षेत्र अंतर्गत असणा-या स्थानिक पोलिस स्टेशननिहाय प्रभाग कार्यालयातील कर्मचा-याची नियुक्ती करुन “एक खिडकी योजना” कार्यान्वित करण्यात येत असून परवानगीसाठी 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असेही ते पुढे म्हणाले.
महापालिका परिसरात एकुण 68 विसर्जन स्थळांवर श्रीगणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली असून विसर्जन स्थळी व विसर्जन मार्गांवर 152 सीसीटीव्ही कॅमे-यांची त्याचप्रमाणे 2447 हॅलोजन लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सवा दरम्यान प्रकाश व्यवस्थेसाठी विहित क्षमतेचे एकुण 66 जनरेटर बसविण्यात येणार आहे. कोरोना साथीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यावर्षी देखील “विसर्जन आपल्या दारी” हा उपक्रम महापालिकेमार्फत राबविला जाणार आहे. पोलिसांच्या मदतीने विसर्जनाचे पुर्ण नियोजन करण्यात येत असून गणेशोत्सवापूर्वी पावसाने उघडीप दिल्यानंतर सर्व मुख्य रस्त्यांवरील तसेच विसर्जन मार्गावरील रस्ते बुजविणेबाबतच्या सुचना संबंधित अधिका-यांना देण्यात आल्या असल्याची माहिती देखील आयुक्तांनी यावेळी दिली.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाची साईज 6×8 इतकीच असावी, गतवर्षी गणेशोत्सवानंतर महापालिका परिसरातील कोरोनाची रुग्ण संख्या दुपट्टीने वाढली त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे तसेच कोविड नियमांचे पालन करुन जबाबदारीने, आनंदात पण शिस्तीत त्याचप्रमाणे विहित परवानग्या घेवूनच हा सण साजरा करावा आणि उत्सवादरम्यान जेष्ठ नागरिकांना आवाजाचा त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असेही आवाहन महापालिका आयुक्तांनी या बैठकीत केले. या ऑनलाईन बैठकीसाठी महापालिका क्षेत्रातील सुमारे 92 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला.
-कुणाल म्हात्रे
