महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांवर हिंदी भाषा लादली जात असल्याचा आरोप करत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने लावण्यात आलेल्या हिंदी जाहिरातीला मराठी एकीकरण समितीने काळे फासले आहे.
महाराष्ट्रात हिंदी भाषेचे आक्रमण हे जागोजागी पहायला मिळत आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा अफवेवर विश्वास ठेवून महाराष्ट्र राज्यातील मराठी नागरिक गपगुमान हिंदी भाषेचं आक्रमण सहन करतं आहे. कायद्यानुसार पाहिलं तर कलम ३४३ नुसार भारत देशाला कोणतीही अधिकृत राष्ट्रभाषा नाही त्याउलट मराठी राजभाषा अधिनियम २०१५(सुधारित)नुसार स्थानिक स्वराज्य संस्था अर्थातच महानगरपालिका ह्यांना १००% कारभार हा मराठी भाषेत करणे बंधन कारक आहे. केंद्राकडून येणारी कोणतीही जाहिरात ही महाराष्ट्र राज्यात मराठी भाषे मध्ये अनुवादित करणे बंधनकारक आहे.
असे असतांना कल्याण डोंबिवली महानगरपालिका सर्रास पणे रस्त्यावर मराठी भाषेला गुळखोबरं देऊन कल्याण डोंबिवलीकरांवर हिंदी भाषा लादत आहेत. ह्याची वारंवार विनंती करून सुद्धा कल्याण डोंबिवली महानगरपालिका मराठी भाषेत जाहिरात करतं नाही म्हणून मराठी एकीकरण समितीच्या कल्याण डोंबिवलीच्या शिलेदारांनी महानगरपालिका ह्यांच्या वतीने जागोजागी केलेल्या हिंदी जाहिरातीला काळे फासून मराठी भाषेची मागणी केली. या आंदोलनात मराठी एकीकरण समितीचे संदीप पाटील, रुपेश भोईर, भावेश पाटील, संभाजी चव्हाण आणि मराठी एकीकरण समितीचे कल्याण शहर समनव्यक भूषण पवार सहभागी झाले होते.
कायद्यानुसार मराठी भाषेत जाहिरात समजून घेण्याचा हा महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे पण कल्याण डोंबिवली महानगरपालिका मराठी भाषेला दुय्यम स्थान देऊन मराठी भाषेचा अपमान करत आहे. महानगरपालिका ह्यांना केवळ मराठी भाषेत कारभार करणे बंधनकारक असतांना सुद्धा हिंदी भाषा लादली जाते ते कुठे तरी थांबले पाहिजे असे मराठी एकीकरण समितीचे कल्याण शहर समनव्यक भूषण पवार यांनी सांगितले.
-कुणाल म्हात्रे