आज पासून राज्यात शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यास सरकारने परवानगी दिल्या नंतर बहुतांश शाळा आणि महाविद्यालये सुरु झाले आहेत. आज कोरोना काळानंतर पहिल्यांदा विद्यार्थी शाळेत अथवा महाविद्यालयात आल्याने या सर्वांमध्ये उस्त्साहाचे वातावरण होते. अशाचप्रकारचा उत्साह डोंबिवलीतील मॉडेल कॉलेजच्या विद्यार्थ्यामध्ये पाहायला मिळाला.
कोविड १९ च्या प्रादुर्भाव काळात बंद असलेल्या शाळा व महाविद्यालये सुरु करण्याबाबत शिक्षण विभागाकडून मिळालेल्या सुचनेनुसार शाळा कॉलेज उघडण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कोरोनाचा धोका लक्षात घेता कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करणारे फलक महाविद्यालयात लावण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश देतांना कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करून महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारावरच विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले. यानंतर सॅनिटायजरद्वारे हात निर्जंतुकीकरण करत विद्यार्थ्यांना आत प्रवेश देण्यात आला.

वर्गामध्ये देखील प्रत्येक बाकावर एका विद्यार्थ्याला बसविण्यात आले.विशेष म्हणजे शाळा कॉलेजचा आज पहिला दिवस असल्याने शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प आणि चॉकलेट देत स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये देखील आनंद पाहायला मिळाला. डोंबिवलीच्या मॉडेल कॉलेजमध्ये एक हजारच्या आसपास विद्यार्थी असून प्रत्येक तुकडीचे दोन गट करण्यात आले आहेत. यामुळे प्रत्येक बाकावर एका विद्यार्थांला बसविले जाणार असून सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची पूर्ण काळजी घेतली जाणार असल्याचे प्राचार्य डॉ. रवींद्र बांबार्डेकर यांनी सांगितले.
कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयात विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत
तब्बल दीड वर्षानंतर कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयातही शाळेची घंटा वाजल्यानंतर विद्यार्थ्याचे शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ शाळा व्यवस्थापनाच्या विद्यमाने या शाळेच्या शिक्षकांनी ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांवर पुष्प उधळून व औक्षण करून जंगी स्वागत केले. इयत्ता आठवी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी फक्त घड्याळी तीन तासाचे वर्ग भरविले जाणार असून विद्यार्थ्यांचे काही दिवस समोपदेशन केले जाणार असल्याचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी सांगितले. शासन परिपत्रकाप्रमाणे सर्व अटी शर्तीचे पालन करण्यात येईल असे संस्थेचे अध्यक्ष म्हणाले. विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर आल्यावर काही विद्यार्थी भावूक होऊन त्यांचे डोळे आनंद अश्रूने ओले झाल्याचे दिसून आले.
-कुणाल म्हात्रे