कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेता परराज्यातून कल्याण रेल्वे स्थानकावर येणा-या नागरिकांनी अगोदर ॲन्टीजेन टेस्ट करावी मगच शहरात यावे अशी सख्त भूमिका पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली आहे. असे न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा विचार असल्याची माहिती आयुक्त सूर्यवंशी यांनी आज दिली आहे.
परराज्यातून कल्याण रेल्वे स्थानकावर येणारे नागरिक
कोणत्याही प्रकारची कोविडची टेस्ट न करताच शहरात दाखल होत असल्याची बाब निदर्शनास येताच आज महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांचे समवेत कल्याण रेल्वे स्थानकात आयोजिलेल्या पाहणी दौऱ्याचे वेळी महापालिका आयुक्तांनी ही माहिती दिली. ११ एप्रिल रोजी २४०० पर्यंत गेलेली कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या आता २०० पर्यंत आलेली आहे. आपण कोरोनाची रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यास यशस्वी झालो आहोत पण परप्रांतातून विशेषतः युपी, बिहार, वेस्ट बंगाल येथे गेलेले नागरिक कल्याण रेल्वे स्थानकात परत येत असून त्यांच्याकडून कोविडचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असल्यामुळे रेल्वेचे एरिया मॅनेजर डॉ. प्रमोद जाधव, स्टेशन मॅनेजर अनुपकुमार जैन यांचे समवेत पाहणी करून परराज्यातून येणाऱ्या तसेच प्रत्येक नागरिकाचे टेस्टिंग कसे करता येईल याचे नियोजन करीत असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. कल्याण रेल्वे स्थानकावर आता ३ ते ४ ठिकाणी टेस्टिंग करण्याची व्यवस्था करण्यात येत असून त्यामधून प्रत्येक नागरिकाचे टेस्टिंग केले जाईल असे ते पुढे म्हणाले.
‘ब्रेक द चेन’ च्या अंमलबजावणीसाठी रेल्वे प्रशासन पूर्णपणे सहकार्य करणार असून परराज्यातून कल्याण स्टेशनवर दाखल होणा-या प्रवाश्यांकडे आरटीपीसीआर किंवा अँन्टीजेन टेस्ट रिपोर्ट नसल्यास त्यांची ॲन्टीजेन टेस्ट करुनच त्यांना शहरात घेतले जाईल. तसेच “माझे कुटूंब, माझी जबाबदारी” या मोहिमेच्या अनुषंगाने प्रत्येकाने चाचणी करुन घेणे आवश्यकच आहे असेही उद्गार रेल्वे एरिया मॅनेजर डॉ. प्रमोद जाधव यांनी यावेळी काढले.
या पाहणी दौ-यात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी ,रेल्वे एरिया मॅनेजर डॉ. प्रमोद जाधव, आरपीएफ कमांडंट शहेनशहा, स्टेशन डायरेक्टर यशवंत व्हटकर ,स्टेशन मॅनेजर अनुपकुमार जैन,महापालिका साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील,क प्रभागक्षेत्र अधिकारी अक्षय गुडधे तसेच इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.
परराज्यातून येणाऱ्या नागरिकांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील असाच काहीसा उपाय सुचवला होता. असाच पेटर्न आता कल्याणमध्ये आयुक्त विजय सूर्यवंशी राबवत आहेत असे म्हणता येईल.