कल्याण :- प्रवासी बनून पती पत्नी अंबरनाथ येथून रिक्षात बसले. त्यांनी रिक्षाचालकाला बोलण्यात गुंतवून कल्याण मध्ये आणले. याच दरम्यान त्यांचे आणखी तीन साथीदार रिक्षात बसले. केडीएमसी च्या ‘ड’ प्रभाग कार्यलयाजवळ असलेल्या सामसूम जागेत त्यांनी रिक्षा थांबवायला सांगतली. यानंतर पाचही जणांनी रिक्षा चालकास बेदम मारहाण करीत त्याच्याकडील मोबाईल, रोकड आणि रिक्षा घेऊन ते पसार झाले. या प्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी सहा तासाच्या आतच सीसीटीव्हीच्या सहय्याने चार आरोपींना अटक केली आहे. तर अन्य एका आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.
अंबरनाथ पश्चिमेत राहणारा जावेद शेख हा रिक्षा चालवितो. २९ तारखेच्या रात्री एक पती पत्नी त्याच्याकडे आले होते. आम्हाला एका ठिकाणी जायचे आहे. तिथे घेऊन चल तुझे काय भाडे होईल ते देऊ असे सांगत ते रिक्षात बसले. ही रिक्षा उल्हासनगरात पोहचताच या दोघांचे अन्य तीन साथीदार आले आणि ते ही रिक्षात बसले. रिक्षा थेट कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली परिसरात असलेल्या केडीएमसी च्या ‘ड’ प्रभाग प्रभाग परिसरात पोहचली. याठिकाणी या पाचही जणांनी रिक्षा चालकास एका ठिकाणी थांबवून नशापान केले. त्यानंतर जावेद शेख याला बेदम मारहाण करीत त्याला खाली पाडले. आणि त्याची रिक्षा घेऊन हे पाचही जण पसार झाले. या प्रकरणी रिक्षा चालक जावेद शेख याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
कल्याणचे एसीपी उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख, पोलिस अधिकारी हरीदास बोचरे यांच्या तपास पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला. एका ठिकाणी रस्त्यात रिक्षातबसून रिक्षा जात असल्याचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला. त्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटविली. अवघ्या सहा तासांच्या आत उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या चार जणांना पा्ेलिसांना ताब्यात घेतले. यामध्ये करण दखनी हा सराईत गुन्हेगार आहे.
करण दखनी विरोधात एकट्या उल्हासनगर सेंट्रल पोलीस ठाण्यात १४ गुन्हे दाखल असून अंबरनाथ मध्ये देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याची पत्नी चैताली पाटील, मित्र कुणाल जाधव आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौघांपैकी तिघांना आज कल्याण न्यायालयात हजर केले असता कल्याण न्यायालयाने तिघांना पोलिस कोठडी सुनावली आहे. तर एका अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात केली जाणार आहे. त्याच बरोबर एका फरार आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.
-रोशन उबाळे