छायाचित्र :- संदेश दाभणे
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज दि.१० ऑगस्ट रोजी लसीकरणासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाल्याचे चित्र पहायला मिळाले. यासाठी काही नागरिक पहाटे चार वाजल्या पासून रांगेत नंबर लावून बसले असल्याचे समजले आहे. आणि याला एकमेव कारण म्हणजे मुंबई लॉकल ट्रेनचा रेल्वेप्रवास.
कोरोनाच्या दुसऱ्या अनलॉकदरम्यान १५ ऑगस्ट पासून सर्वसामान्य नागरिकांना मुंबई लॉकल ट्रेनचा प्रवास करता येणार आहे. मात्र केवळ लसींचे दोन्ही डोस घेतलेले लोकच या प्रवासासाठी पात्र असतील अशी अट शासनाकडून घालून देण्यात आली आहे. रोजच्या धकाधकीच्या प्रवासाला वैतागलेले कल्याण डोंबिवलीकर आता रेल्वे प्रवासासाठी आसुसले आहेत. त्यामुळे शक्य तितक्या लवकर लसीकरण करून घेण्याच्या प्रयत्नात आता कल्याण डोंबिवलीतील चाकरमानी आहेत.

क.डों.म.पा. क्षेत्रात लसीकरणाचा वेग सतत मंदावताना दिसतो. काही खाजगी इस्पितळ तसेच राजकीय नेत्यांच्या शिबिरातुन काही लोक हे डोस घेतात. मात्र कोरोनाने कंबरडे मोडलेले असताना खिशाला न परवडणारे असल्याने काही लोक महानगरपालिकेच्या लसीकरणाची वाट पाहून आहेत. त्यात आज मंगळवारी कल्याण मधील आचार्य अत्रे रंग मंदिर व डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह या दोनच ठिकाणी लसीकरण पार पडले. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील नागरिकांनी पहाटे पासूनच रांग लावायला सुरुवात केल्याचे समजले आहे. यामुळे लसीकरणासाठी आता झुंबड उडताना दिसू लागली आहे. कोरोनाने पिचलेल्या लोकांसाठी शासन कितीही प्रयत्नशील असलं तरीही सेवा तोकडी पडताना दिसत आहे.
-संतोष दिवाडकर