कल्याणचे तहसिलदार दीपक आकडे आणि त्यांचे शिपाई मनोहर हरड यांना लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. एकूण एक लाख वीस हजार रुपयांची लाच घेताना ते जाळ्यात सापडले आहेत. या घटनेनंतर महसूल विभागात होत असलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे असे दिसत आहे.
कल्याण तालुका वरप गावातील एका कंपनीचे जमिनीबाबतच्या हरकती वरील सुनावणीचे निकाल पत्रक देण्यासाठी तहसीलदार दीपक आकडे यांनी एक लाखाची मागणी केली होती. तर शिपाई मनोहर हरड व इतर स्टाफ करिता २० हजारांची मागणी २६ ऑगस्टला केली होती. या लाचेची रक्कम स्वीकारताना कल्याण तहसीलदार दीपक आकडे व शिपाई मनोहर हरड यांना ठाणे लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक संतोष शेवाळे यांच्या टीमने रंगेहात सापळा रचून पकडले आहे. यावरून आज कल्याण महसूल विभागाला मोठा झटका लागल्याचे दिसून आले.

आज दुपारी पावणे एकच्या दरम्यान ही मोठी घटना घडली आहे. यावरून महसूल विभागाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर नक्कीच आला आहे असे दिसते. याबाबत तहसीलदारांची अधिक चौकशी सुरू आहे. पुढे त्यांच्यावर काय कारवाई होणार हे देखील स्पष्ट होणार आहे. या संपुर्ण घटनेनंतर भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
-संतोष दिवाडकर
