नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी समर्थन करण्यासठी कल्याण डोंबिवलीतील सर्व पक्षीय पदाधिकार्यांनी सर्वपक्षीय कृती समिती समर्थन संघटना स्थापन केली असून नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देणेच नैसर्गिक न्याय हक्काचे असल्याचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
नवी मुंबई विमानतळाला मा.दि.बा.पाटील यांचे नाव देणे हे रायगड जिल्ह्यातील शेतकरी भूमिपुत्रांचा नैसर्गिक हक्क आहे. नवी मुंबई निर्माण करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील शेतकरी भूमित्रांच्या जमीनी महाराष्ट्र सरकारने बंदुकीच्या जोरावर हिसकावून घेतल्या. त्यांचे राहते घर सोडून संपूर्ण जमीनी जबरदस्तीने ताब्यात घेऊन त्यांना भूमिहीन केले. व त्यांची पारंपरिक वडिलोपार्जित असलेली शेती, मच्छीमार, मिठागरे ही उत्पन्नाची साधने देखील हिरावून घेतली व त्यांना कायमस्वरूपी बेरोजगार करून उध्वस्त केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या या जुलमी जमीन संपादन प्रक्रियेच्या विरोधात दि.बा.पाटील यांनी शेतकरी भूमिपुत्रांचा एक ऐतिहासिक व क्रांतिकारक आंदोलन, लढा उभा केला. त्या आंदोलनावर तत्कालीन सरकारने लाठीमार केला,अश्रुधुर सोडले, गोळीबार केला व पाच शेतकरी भूमिपुत्र ठार मारले. त्यात दि.बा. पाटील देखील रक्तबंबाळ झाले होते. नवी मुंबई स्थापन करण्यासाठी सरकारने रायगड जिल्ह्यातील पाच शेतकरी ठार मारलेच शिवाय लाखो शेतकरी भूमिपुत्रांना भूमिहीन करून त्यांचा जीवंतपणीच बळी घेतला आहे. आणि नवी मुंबईतून भूमिपुत्रांचे अस्तित्वच उध्वस्त केले आहे. व त्यांच्यावर घोर अन्याय केला आहे.
सरकारच्या या अन्यायकारक कृती विरोधात आणि भूमिपुत्रांच्या पुनर्वसनासाठी दि.बा.पाटील हे अतिशय प्रामाणिकपणे जीवनाच्या शेवटपर्यंत लढले. व तेथील भूमिपुत्रांना साडे बारा टक्के विकसित प्लाँट परत देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाकडून पदरात पाडून घेतला. परंतु सिडको प्रशासनाने व राज्य सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे आजही प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या उर्वरित मागण्या मान्य केल्या नाहीत. वाढीव प्लाँट, गावठाण विस्तार योजना, गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करणे, नोकऱ्या,रोजगार इत्यादी मागण्या प्रलंबित ठेवल्या आहेत.
त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रास्तावित असल्यापासून तेथील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे हि मागणी वेगवेगळ्या प्रकारे करत आहेत. हा त्या सिडको प्रकल्पग्रस्तांचा नैसर्गिक हक्क आहे. त्यामुळे नवी मुंबई प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा मान राखून नवी मुंबई विमानतळाला “लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ” असे नाव देऊन सिडको प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना व अखिल बहुजन समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी सर्व पक्षीय कृती समिती समर्थन संघटनेने मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
या संघटनेत काँ. काळू कोमास्कर, काँ. आत्माराम विशे, कॉ. पी के लाली, रवी भिलाने, ज्ञानेश पाटील, आनंद नवसागरे, काँ. जी आर पाटील, शैलेंद्र दोंदे, ज्योती बडेकर, गणेश सोस्टे, बाबा रामटेके, संजय शिंदे, संजय गायकवाड, अमित दुखंडे, काँ. महेश आवारे, संदीप पवार, विलास डिके आदींचा समावेश आहे.
-कुणाल म्हात्रे