कल्याण :– कल्याण पूर्वेतील सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे सरचिटणीस अरुण दिघे यांचे आज हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले आहे. त्यांच्या अचानकपणे जाण्याने त्यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण कल्याण पूर्वेतील सामाजिक तसेच राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार अरुण दिघे हे कारने आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. मात्र त्यांना प्रवासा दरम्यानच हृदय विकाराचा तीव्र झटका आला होता. यानंतर त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आलं. मात्र इस्पितळात त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सामाजिक तसेच राजकिय क्षेत्रातील नेत्यांनी,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इस्पितळाकडे धाव घेतली. त्यांच्या निधनाच्या बातमी नंतर कल्याण पूर्वेत शोककळा पसरली आहे.
अरुण दिघे हे पूर्वापार सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. याचबरोबर ते राजकीय पक्षाचे देखील पदाधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत होते. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांनी असंख्य गरजूंना मदत केली आहे. यासाठी अनेकदा त्यांनी पक्ष बाजूला ठेवून समाजकार्य केल्याचे देखील बोलले जाते. काही मंडळ,संस्था यांच्याशी देखील ते संलग्न होते. तर क्रीडा क्षेत्रासाठी देखील त्यांचे अत्यंत मोलाचे योगदान लाभले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ते भारतीय जनता पार्टी असा एक त्यांचा राजकिय प्रवास. मात्र असे असतानाही पक्ष बाजूला ठेवून त्यांनी हितसंबंध जोपासले होते. कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड आणि माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. सर्वांना एकत्रित बांधून सलोख्याचे संबंध त्यांनी निर्माण केले होते. म्हणूनच इतर राजकीय पक्षांत देखील त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पक्षाची कोणतीही आंदोलने, मेळावे, कार्यक्रम यात ते हिरहिरीने पुढाकार घेत. याचबरोबर सार्वजनिक जयंती, उत्सव, शिबिरे आणि विविध उपक्रमात त्यांचा पुढाकार असे.
समर्थक आणि विरोधक या दोघांनाही हसऱ्या चेहऱ्याने उत्तर देण्याची त्यांची एक कला होती ज्यातून त्यांनी असंख्य मनांवर अधिराज्य केले होते. मात्र कल्याण पूर्वेचा हाच उमदा आणि हसरा चेहरा निखळल्याने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे असे त्यांचे निकटवर्तीय आता म्हणू लागले आहेत. अश्या या व्यक्तीमत्वास ‘एम एच मराठी’ कडून ‘भावपूर्ण श्रद्धांजली’.
-संतोष दिवाडकर