आंबिवली, अटाळी परिसरात पाणी पुरवठा सुरळीतपणे होत नसल्याने शिवसेना अटाळी शाखेच्या वतीने मंगळवारी ‘अ’ प्रभागक्षेत्र कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
आंबिवली, अटाळी परिसरातील नव्वद टक्के भागात दिवसातून एक तास पाणी वितरीत होते. त्यात पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष असुन अनेक वर्ष तक्रार करूनही पाणी पुरवठ्यात सुधारणा होत नसल्याने शिवसेनेचे माजी नगरसेवक दशरथ तरे, शिवसेना शाखाप्रमुख ऋषीकांत पाटील, माजी नगरसेविका हर्षाली थविल, लीलाबाई तरे, माजी नगरसेवक दुर्योधन पाटील आदींसह शिवसैनिकांनी मंगळवारी अ प्रभाग कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करीत पाणी वितरण सुरळीतपणे करण्याची मागणी प्रशासनाकडे केली.
अ प्रभाग क्षेत्रात अनेक वर्षांपासून पाणी पुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता नसल्याने “अ” प्रभागक्षेत्राचा संपूर्ण कार्यभार उप अभियंता संभाळत आहेत. यामुळे त्यांच्यावर कामाचा जास्त भार येतो व ते फोन घेत नाहीत तसेच पाणी पुरवठा संबंधित कामांना गती मिळत नाही. तसेच “अ” प्रभागासाठी मोहेली येथुन ९८ एमएलडी तसेच टिटवाळा येथून ७ एमएलडी पाणी पुरवठा होत असताना देखील पाणी पुरवठ्याचे समान वितरण का होत नाही, पाणी जाते कुठे असा खडा सवाल उपस्थित करीत प्रशासनाला माजी नगरसेवक दशरथ तरे यांनी धारेवर धरले.
केडीएमसीच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रावरून वडवली पाणी पुरवठा लाईनला दैनंदिन होणारा पाणी पुरवठा हा शहाड, वडवली, अटाळी, आंबिवली, नेपच्यून या भागात होत असतो. परंतु या पाणी पुरवठ्याचे सर्व भागात समान वितरण होत नाही. काही भागांना दिवसातील चौदा ते सोळा तास पाणी वितरत होते. तर अटाळी, आंबिवली परिसरातील नव्वद टक्के भागात दिवसाला एकच तास पाणी वितरित होते. पंरतु एक तास होणारा होणारा पाणी पुरवठा सुध्दा कमी दाबाने होत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. अनेक वर्ष याबाबत तक्रार करूनही कुठलीही सुधारणा होत नाही. सर्वांना समान पाणी बील आहे. त्याप्रमाणे पाण्याचे वितरण समान वाटप करावे ही जनतेची मागणी असुन याबाबत प्रशासनाने दखल घेऊन पाण्याचे समान वाटप करावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
“अ” प्रभागक्षेत्र आधिकारी राजेश सावंत यांच्या दालनात झालेल्या बैठकीत पाणी पुरवठा उप अभियंता उदय सूर्यवंशी यांनी तंत्रिक अडचणीमुळे उशीराने पाणी पुरवठा होतो, येत्या आठवड्यात पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांमार्फत ज्या परिसरात पाणी टंचाई होत आहे. त्या बाबत तपासणी करून पाणी पुरवठा सुरळीतपणे होईल याकडे लक्ष दिले जाईल असे आश्वासन दिले. या ठिय्या आंदोलनात माजी नगरसेवक दशरथ तरे, दुर्योधन पाटील, माजी नगरसेविका लीलाबाई तरे, हर्षाली थवील, शाखाप्रमुख ऋषीकांत पाटील शिवसेना पदाधिकारी रमेश पाटील, लता भोईर, चतुर सोनावणे आदींसह स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.
-कुणाल म्हात्रे