कल्याण :- ऐतिहासिक कल्याण नगरीत श्री शिवप्रताप फाउंडेशन तर्फे भव्यदिव्य शिवप्रताप दिन तिथीनुसार साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या दिवशी अफझल खानाचा वध केला होता. या समरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
कल्याण पूर्वेतील साकेत कॉलेज जवळ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मयुरेश धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली असंख्य मान्यवर व शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. कार्यक्रमातील पोवाड्यांच्या गजराने संपूर्ण ऐतिहासिक नगरी दुमदुमली होती. महाराजांचा इतिहास जगभरात पोहोचवणारे शिवशाहीर देवानंद माळी यांच्यासह त्यांचे सहकारी देखील उपस्थित होते ज्यांनी पोवाडा सादर केला.
नरवीर शिवा काशीद यांचे वंशज आनंदराव काशीद (किल्ले पन्हाळा), सरदार कान्होजी जेधे यांचे वंशज युवराज जेधे व प्रमुख उपस्थिती म्हणून श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे मठाधिपती मोडक महाराज, वीर जिवाजी महाले पुरस्कृत शंकरजी गायकर, कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड, पश्चिमेतील माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.
श्री शिवप्रताप फाउंडेशन आयोजित शिवप्रताप दिन सोहळ्यात विशेष आकर्षण म्हणून कालीपुत्र कालीचरण महाराज उपस्थित राहिले होते. समस्त कल्याण करांच्या वतीने त्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. दरम्यान कालीचरण महाराजांनी या विशेष दिनाचे औचित्य साधत तमाम शिवप्रेमींना आपल्या भाष्या द्वारे संबोधित केले. यानंतर कालीचरण महाराजांनी प्रेरित शिवभक्तांना शुभाशीर्वाद तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कल्याण पूर्वेतील समाजसेवक संजय बाबुराव मोरे यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन देखील कालीचरण महाराजांच्या हस्ते करण्यात आले.
-संतोष दिवाडकर