महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे नुकसान झाल्याची टीका कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे. कल्याण पूर्वेतील सूचकनाका येथे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कल्याण पूर्व अध्यक्ष संजय मोरे, महिला जिल्हाध्यक्षा रेखा राजन चौधरी, नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, गणेश भाने, माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के, नरेद्र सूर्यवंशी, पांडुरंग भोसले, यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ आज कल्याणध्ये तीन ठिकाणी भाजपच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन करणा:या काही कार्यकर्त्यांनी पोलिसांनी अटक करुन नंतर सोडून देण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षणरुपी हक्क हिरावून घेतला, त्याविरोधात ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढा द्यायला आज श्रीराम चौक, सूचक नाका, कल्याण पूर्व येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ओबीसी समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या हक्कासाठी आम्ही अशाच प्रकारे यापुढे देखील संघर्ष करीत राहू अशी प्रतिक्रिया आमदार गणपत गायकवाड यांनी दिली.
-कुणाल म्हात्रे