कल्याण-डोंबिवली घडामोडी

कल्याणच्या लोकवस्तीत आढळले अजगर आणि घुबड

नैसर्गिक अधिवासात घुसखोरी केलेल्या काँक्रीटच्या जंगलांमुळे वन्य जीवांची घालमेल होऊ लागली आहे. पशु आणि पक्षांचा अशा काँक्रीटच्या जंगलात स्वैरसंचार होऊ लागला असून अशाच भरकटलेल्या अजगरासह कावळ्यांच्या तडाख्यातून एका शृंगी घुबडाची प्राणी-सर्पमित्रांनी सुखरूप सुटका करण्यात यश मिळविले आहे.

 रविवारी दुपारच्या सुमारास कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या भाल गावातल्या गावदेवी मंदिराजवळ तेथिल तरूण ओमकार घुले याला साप आढळून आला. ओमकार याने मदतीसाठी कळविल्यानंतर मुंबई पोलिस दल व मुंबई हायकोर्ट येथे मानद पशु कल्याण अधिकारी म्हणून कार्यरत असलेले पोलिस शिपाई मुरलीधर जाधव हे त्यांचे सहकारी सर्पमित्र कुलदीप चिखलकर यांच्यासह भाल गावात गेले. सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरलीधर जाधव आणि कुलदीप चिखलकर यांनी तेथे असलेल्या दोन फूट लांबीच्या अजगराला पकडण्यात आले. इंडियन रॉक पायथोन जातीच्या या अजगराला पुढील कार्यवाहीसाठी कल्याण वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या अजगराला निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले.

तर माणेरे गाव रोडला असलेल्या साईकृपा नगरात एका घुबडाच्या मागे कावळ्यांचा थवा लागला होता. हा प्रकार पाहून निसर्गप्रेमी निखिल गवई या तरुणाने कावळ्यांच्या तडाख्यातून या घुबडाला वाचविले. त्या निमित्ताने परिसरातील रहिवाश्यांना प्रथमच सर्वात मोठे घुबड पहायला मिळाले. डोळ्यावर असलेल्या शिंगासारख्या पिसांमुळे शृंगी घुबड म्हणतात. हे घुबड दिवसा किंवा रात्री कधीही उडू शकते. त्यामुळे इंग्रजी भाषेत त्याला ईगल आऊल असेही म्हणतात. याच्या आहारात उंदीर, साप, छोटे प्राणी यांचा समावेश असतो. या घुबडाला सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केल्यानंतर वन विभागाने त्याची निसर्गाच्या सान्निध्यात मुक्तता केली.

-कुणाल म्हात्रे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *