कल्याण पूर्व कोळसेवाडीतील संजल अशोक गावंडे या तरुणीची अमेरिकेतून लाँच होणाऱ्या यानातील टीममध्ये निवड झाली आहे. संजल गावंडे हिने कोळसेवाडी, कल्याण-पूर्व ते सातासमुद्रापलिकडे अमेरिकेत मिशिगन, शिकागो, कॕलिफोर्निया आणि आता सियाटेल असा प्रवास करणारी ही तरुणी आकाशपरी नावाने ओळखू लागली आहे.
अमेरिकेत सियाटेल येथील ब्ल्यु ओरिजीन जी एक एरो स्पेस नामंकित कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीतर्फे २० जुलै २०२१ ला न्यू शेपर्ड हे यान लाँच होत आहे. या मिशनसाठीच्या टीम मध्ये संजलची निवड झाली आहे. लहानपणापासून तिचे जे स्वप्न होते गगनाला गवसणी घालण्याचे, जे ध्येय होते, ते स्वप्न ते ध्येय आता खऱ्या अर्थाने पूर्ण होत असल्याची भावना तिच्या आईने व्यक्त केली आहे.
कल्याण मध्ये जन्मलेली संजल कोळसेवाडीतील माॕडेल इंग्लिश हायस्कूल मध्ये दहावी पर्यत शिकली. त्या नंतर तिचे बारावी पर्यंतचे शिक्षण बिर्ला कॉलेज तर १२ वी नंतर वाशी येथील फादर अॕग्नेल काॕलेज येथे शिक्षण घेत २०११ ला संजलने मुंबई युनिव्हरसिटी मधून प्रथम श्रेणीत पास होवून मॕकेनिकल इंजिनियरची पदवी प्राप्त केली. हा अभ्यासक्रम पार पाडतानाच तिने जीआरई, टोफेलसारख्या कठीण परिक्षा दिल्या त्यातही ती चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली. या सर्व परिक्षांच्या गुणांवर तिने अमेरिकेतील मिशिगन टेक युनिव्हरसिटी येथे एमएस साठी अर्ज केला.
मिशिगन टेक युनिव्हरसिटी येथे संजलचे पुढील शिक्षण सुरू झाले. २०१३ ला प्रथम श्रेणीत पास होवून संजलने मॕकेनिकल मध्ये मास्टर आॕफ सायन्सचा पदवी प्राप्त केली. २०१३ ला संजलला विस्काॕनसिन मधील फॉन्ड्युलेक येथीलमर्क्युरी मरीन या नामंकित कंपनीत जाॕब लागला. तिच्या मनासारखा तिला जॉब मिळाला पंरतु तिचे लक्ष मात्र अवकाशाकडे होते तेव्हा ती जमिनीवर शांत बसणारी मुलगी नव्हती. जॉब करता-करता शनिवार-रविवार सुट्टी मध्ये आराम न करता तिने विमान चालवण्याचे प्रशिक्षण चालू केले. विमान शिकण्यासाठी तिला तिचा मॕकेनिकल अभ्यासक्रम कामी आला. अखेर तिची मेहनत कामी आली. १८ जून २०१६ ला तिला वैमानिक म्हणून लायसन मिळाले आणि ती विमानाने उंच भरारी मारु लागली.
तिचे कॕलिफोर्नियाला जाण्याचे स्वप्न होते. तशी संधी ही चालून आली. कॕलिफोर्निया मधील आँरेज सिटी येथील टोयोटा रेसिंग डेव्हलपमेंट या नामंकित कंपनीतून तिला कॉल आला. याठिकाणी मॕकेनिकल डिझाईन इंजिनियर म्हणून कामाला सुरूवात झाली. रेसिंगच्या गाड्यांचे इंजिन ती डिझाईन करत होती. अत्यंत कठोर मेहनतीने अखेर संजलला २०१८ ला कमर्शिअल पायलट चे लायसन्स मिळाले. इतकेच नव्हे तर नायंटी नायंटी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ वूमन्स पायलट या संस्थेची ती चेअरमन झाली.
सॉफ्टवेअर हार्डवेअर कौशल्यामध्ये पारंगत असलेल्या संजलला ब्ल्यू ओरिजिन या कंपनीने न्यू शेपर्ड या मिशनसाठी तिला सिलेक्ट केले असून २० जुलै २०२१ या दिवशी लाँच होत असलेल्या न्यू शेपर्ड या यानातील टीममध्ये निवड झाल्याने संजलचे तिचे लहानपणापासूनचे जे स्वप्न होते ते खऱ्या अर्थाने पूर्ण झाले असल्याची प्रतिक्रिया तिची आई सुरेखा गावंडे यांनी दिली आहे. कल्याणच्या या आकाशपरीला २० जुलैच्या गगणभरारीसाठी MH मराठी कडून खूप साऱ्या शुभेच्छा.
-कुणाल म्हात्रे