छाया – कुणाल म्हात्रे
कल्याण : कल्याण मधील वाढत्या अमली पदार्थांच्या विक्री व सेवना पाठोपाठ वाढणाऱ्या गुन्हेगारी बाबत शासन तसेच पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांनी कल्याण पूर्वेतील काटेमानिवली येथे आंदोलन केले.
कल्याण शहरातील पूर्व भागात वारंवार होणारी गुन्हेगारी व दहशतीचे वातावरण नुकत्याच वयात आलेल्या मुलांना व्यसनाच्या आधीन लावणारे व त्या अनुषंगाने होणारी अंमली पदार्थाची विक्री व सेवन ही चिंताजनक बाब बनली आहे. या सर्वांना वाचा फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टी आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी कल्याण मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्या नियोजनात आंदोलन छेडून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

मागील काही काळापासून कल्याण पूर्वेत अश्या अनेक घटना समोर येत आहेत. रातोरात लोकांच्या गाड्या फोडणे, चोऱ्या माऱ्या, लुटमार, मारहाण, टोळके करून रस्त्यांवर धिंगाणा घालणे अशा घटना वारंवार पुढे येत आहेत. या घटनेत प्रामुख्याने घरच्यांनी मोकाट सोडलेली ऐन विशीतील नुकतेच मिसरुट फुटलेल्या नवतरुणांचा सर्वाधिक समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्थानकात अश्या अनेक तक्रारी देखील प्राप्त होऊ लागल्या आहेत. आणि आणखीन धक्कादायक बाब म्हणजे याच गुन्हेगारांच्या पाठीमागे काही राजकीय नेतेमंडळी देखील हस्तक्षेप करीत असतात. त्यामुळे कुणाच्याही दबावाला न जुमानता गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी शक्य तितकी कठोर पावलं उचलावी आणि संबंधित गुन्हेगारांना अद्दल घडवावी अशी अपेक्षा भाजपा कल्याण पूर्व कडून केली जात आहे. तर पालकांनी देखील आपला पाल्य घराबाहेर काय करतो ? कुठे जातो ? याचाही सुगावा आताच लावलेला बरा. अन्यथा भविष्यात पश्चाताप करायची वेळ येऊ नये म्हणजे मिळवलं.
-संतोष दिवाडकर