कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक अवघ्या महिन्या भरावर येऊन ठेपलेली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथ सुरू झालेली आहे. यातच मनसेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या डोंबिवलीतुन दोन महत्त्वाचे मोहरे पक्षातून गेल्याने पक्षाने आता अधिक जोर लावला असल्याचे दिसते.
काही दिवसांपूर्वी डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम आणि क.डों.म.पा.चे विरोधी पक्ष नेतेपद भूषविलेले मंदार हळबे या दोघांनीही मनसेला जय महाराष्ट्र करीत शिवसेना आणि भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर मनोज घरत यांना तत्काळ डोंबिवली शहर अध्यक्ष बनविण्यात आले. आणि ‘व्हायचं ते होणारच’ अशा शब्दांत मनसे आमदार राजू पाटील यांनी विरोधकांना चेतावणी दिली.
बुधवारी कृष्णकुंज येथे शेकडो सेना-भाजप कार्यकर्त्यांनी तसेच ५०० उत्तर भारतीयांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशात मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचे योगदान होते. हा पक्षप्रवेश म्हणजे डोंबिवलीचे उत्तर होते का ? असा सवाल त्यांना उपस्थित माध्यमांनी केला होता.
“कल्याण डोंबिवलीचे उत्तर कल्याण डोंबिवलीतच देणार. आठ दहा दिवस थांबा राजू पाटील मोठा पक्ष प्रवेश घडवून आणणार आहेत.” असे त्यांनी माध्यमांना सांगितले.
आठ दिवसांत मनसे कल्याण डोंबिवलीत कोणाला पक्षात आणणार याकडे संपूर्ण मनसैनिक आणि इतर राजकीय पक्ष आताच लक्ष ठेवून आहेत. मनसे बेरजेची गणित जुळवण्याची तयारी करीत असताना इतर पक्षांना वजबाकीचा सामना करावा लागू नये म्हणजे नवलच.